माधुरी पेठकरअमूक गोष्ट करण्याची आता ही वेळ नाही, उशीर झाला फार... असं म्हणून एखादी गोष्ट सोडून देण्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतात. इतकेच कशाला आपल्या आयुष्यातही वेळ निघून गेली म्हणून करायची राहून गेलेली एखादी गोष्ट असतेच. अशा राहून गेलेल्या गोष्टींना कृतीत उतरवण्याची संधी शोधा... हाच संदेश ९७ वर्षांच्या कॅथरेन कोल नावाच्या आजी देतात. अमेरिकेतील उटाह राज्यातील हना या त्या शहरात राहतात. तेथील ताबिओना पब्लिक स्कूलमध्ये मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचे काम त्या करतात.
१९४०ची गोष्ट. दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता. कॅथरेन कोल टेक्सास राज्यातील फेअरव्ह्यू या शहरात राहत होत्या. त्या तेव्हा हायस्कूलमधील शेवटच्या वर्षाला होत्या. हायस्कूल ग्रॅज्युएट ही पदवी मिळणार होती. पण, अंतिम परीक्षा सुरु होती आणि त्याच दिवशी त्यांचे आजोबा वारले. कोल यांना परीक्षा देताच आली नाही. त्यानंतर कुटुंबात अशी परिस्थिती निर्माण झाली की घराला आधार देताना त्यांचे शिकण्यावरचे लक्ष उडाले. आपल्या जबाबदाऱ्यांना महत्त्व देणाऱ्या कोल यांच्या मनात हायस्कूल ग्रॅज्युएट पदवी मिळाली नसल्याचे शल्य कायमच राहिले.
शिक्षण सुटले तरी त्यांची वाचनाची आवड कायम राहिली. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या हातात पुस्तक असायचे. घरातल्यांना त्यांनी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. लहान मुलांना सुवाचनाची आवड असायला हवी, त्यासाठी आपण काहीतरी करायला हवे असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी त्या ताबिओना पब्लिक स्कूलमध्ये जाऊ लागल्या. तिथे त्या शाळेतील मुलांसोबत तासनतास पुस्तके वाचायच्या. पुस्तकांबद्दल मुलांशी बोलायच्या. हे काम वयाची नव्वदी पार केल्यानंतरही सुरूच आहे. आजी वर्षानुवर्षे मुलांसोबत पुस्तके वाचताय. त्यांचे हे काम हायस्कूलची डिग्री मिळवण्याइतके मोठे आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून शाळेने त्यांना मानद हायस्कूल ग्रॅज्युएट ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. कोल
आजींचे पदवी मिळवण्याचे राहून गेलेले स्वप्न पूर्ण झाले.आता त्या ९७ वर्षांच्या आहेत आणि आपण ग्रॅज्युएट झालो याचा त्यांना आनंद आहे.