श्वेता नाईक
नुकताच सायकल दिन साजरा झाला. माझ्या लेकीचं कौतुक म्हणून नाही पण ठरवलं आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर लहान मुलंही किती उत्तम सायकलिंग करु शकतात हे शेअर करायचं म्हणून हा लेख. माझी लेक,मुग्धा नाईक. तिने नुकताच १००० किलोमीटर सायकलिंगचा टप्पा पूर्ण केला आहे. ती फक्त ९ वर्षांची आहे पण तिचं सायकल चालवण्याचं पॅशन आणि मेहनत मात्र विशेष आहे.
ती ज्युनिअर केजीमध्ये असताना तिला आजीने नवरात्रीमध्ये गिफ्ट म्हणून छोटी साईडला चाक असलेली सायकल घेऊन दिली आणि त्यासोबत हेल्मेटपण. ती सोसायटीमध्ये आपली आपली सायकल खेळत असे. नंतर मात्र साधारण वर्षभरानंतर त्या छोट्या सायकलची चाक काढून टाकली आणि तिथून तिचा सायकल शिकायचा प्रवास सुरु झाला. सोसायटीमधल्या मित्र मैत्रिणीने सायकलवर बॅलन्सिंग करायला शिकवले. काही दिवसांनी त्या छोट्या सायकलवरुनच बाबासोबत ७.५ किलोमीटरची राईड केली. मग मात्र ती सायकल छोटी पडायला लागली त्यामुळे वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून मार्च२०२३ ला डिकॅथलॉनमधून एमटीबी सायकल घेतली. तेंव्हा काही ती एवढ्या मोठ्या राईड करेन असे काहीच ठरले नव्हते. पण नव्या सायकलवर बाबांसोबत पहिली राईड केली ती १५ किलोमीटरची आणि नंतर २२ मार्च ला पाडवा होता म्हणून २२ किलोमीटरची ! या राईड करताना बाबाने गिअर कसे बदलायचे, सायकल चालवताना काय काळजी घ्यायची, सायकल घेऊन रस्ता क्रॉस करायचा असेल तर काय काळजी घ्यायची स्वतः ला हायड्रेट कसे ठेवायचे हे सांगितले. पण तरीही सकाळी जरी राईडला गेलो तर उलट्या दिशेने वाहन चालवत येणारी लोक किंवा सायकलिंगसाठी सगळीकडे वेगळा रस्ता नसल्याने काहीवेळा टेंशन यायचं भीतीही वाटायची, तिलाही आणि आम्हालाही.
या सायकल राईड सुरू असताना मग पंढरपूर सायकल वारी जमेल तेवढी करून बघायचे ठरले. सरावासाठी म्हणून मग ती आणि आम्ही दोघांनी २०/३०/ ४० किलोमीटरच्या राईड केल्या. ट्राफिकची सवय व्हावी अंदाज यावा म्हणून उशिरा उन्हातपण राईड केल्या. रिमझिम पावसातही केल्या. कधीकधी राईड केल्यानं ती उन्हामुळे दमली तर काही वेळेस सकाळी उठायचा कंटाळा पण केला! मात्र टप्प्याटप्प्याने किलोमीटर वाढवले. ज्या मोठ्या राईड केल्या त्यात पुणे ते टेंभुर्णी, पुणे यवत पुणे,पुणे ते डोणजे ,पुणे ते मुळशी आणि पुण्यात काही ५० किलोमिटरच्या राईड्स केल्या आहेत. पंढरपूर सायकल वारीही केली.
आणि आता १००० किलोमीटरचा सायकलिंगचा टप्पा पूर्ण झालेला आहे.
लवकरच पुणे शिवनेरी, पुणे ते लोणावळा या राईड्स पण करायच्या आहेत. सायकलने तिला एक नवीन ताकद दिली आणि आनंदही!