१७ फेब्रुवारी २०२३ रोजी लंडनमधील ब्रिटन येथे लंडन फॅशन वीक मोठ्या दिमाखात पार पडला. या लंडन फॅशन वीकमध्ये लंडनमधील फॅशन डिझायनर व्हिक्टोरिया जेनकिन्सने एका अनोख्या फॅशनची आगळीवेगळी जादू सर्वांसमोर प्रदर्शनास आणली.फॅशन डिझायनर व्हिक्टोरिया जेनकिन्सने (Fashion Designer Victoria Jenkins) सर्वात पहिल्यांदा लंडन फॅशन वीकमध्ये अपंग व्यक्तींसाठी बनविलेल्या स्टायलिश कपड्यांचे अनावरण केले. "अनहिडन : अ न्यू एरा इन फॅशन" ("Unhidden: A New Era in Fashion) या इव्हेंडमध्ये व्हिक्टोरिया जेनकिन्सने शारीरिक अपंगत्व असणाऱ्या एकूण ३० मॉडेल्सना सहभागी करुन घेतले. शारीरिक अपंगत्व, दिव्यांग, दीर्घकालीन आजाराने ग्रासलेल्या अशा अनेक शारीरिक व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी हे कपडे परिधान करून मोठ्या दिमाखात रॅम्पवर चालत रॅम्प वॉक केला.
लंडन फॅशन वीकमध्ये बोलताना फॅशन डिझायनर व्हिक्टोरिया जेनकिन्सने सांगितले की, अनहिडन हा एक असा अनुकूल फॅशन ब्रँड आहे जो केवळ शारीरिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या पेहेरावाबाबत किंवा त्यांच्या फॅशनवर लक्ष केंद्रित करतो. व्हिक्टोरिया जेनकिन्स ही स्वतः २० वर्षांची असताना जिने अपंगत्व स्विकारुन, अपंग व्यक्तींना देखील स्टाईल, फॅशन करता यावी यासाठी धडपड करणाऱ्या व्हिक्टोरिया जेनकिन्सची अनोखी कहाणी(Fashion Brand 'Unhidden' Brings Clothes Made for All Bodies to London Fashion Week).
कल्पना कशी सुचली ?
आपल्याला ही कल्पना कशी सुचली सांगताना अनहिडन फॅशन ब्रँडच्या कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक असलेल्या व्हिक्टोरिया जेनकिन्स सांगतात, २०१६ साली जेव्हा त्या स्वतः हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी ऍडमिट होत्या तेव्हा त्यांच्या बाजूच्या बेडवर कॅन्सरने ग्रस्त एक महिला होती. "माझ्या या आजारपणामुळे मला हवे तसे कपडे घालता येत नाही". असे या महिलेने व्हिक्टोरिया जेनकिन्स यांना सांगितले. तेव्हा व्हिक्टोरिया जेनकिन्स यांच्या मनात एक विचार आला की आपण अशा दीर्घकालीन आजाराने ग्रासलेल्या किंवा शारीरिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांना हवे तसे कपडे नक्कीच तयार करु शकतो. दीर्घकालीन आजाराने ग्रासलेल्या किंवा शारीरिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांना काही त्रास न होता मोकळे वावरता यावे किंवा त्यांचे मनपसंत कपडे घालता यावे. यासाठी आपण काहीतरी करायला हवे.
Fashion brand 'Unhidden' brings clothes made for all bodies to London Fashion Week https://t.co/ZoZeH1pfUSpic.twitter.com/uYFTd6UYae
— Reuters (@Reuters) February 18, 2023
ब्रँडची स्थापना कशी झाली ?
मग तिने यासंदर्भात माहिती गोळा करण्यास सुरुवात केली काही रिसर्च केले. या रिसर्च नंतर तिच्या लक्षात आले की, टॉमी हिलफिगरसह काही मोजकेच असे ब्रँड्स आहेत जे शारीरिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी कपडे तयार करतात. त्यानंतर व्हिक्टोरिया जेनकिन्स या गारमेंट टेक्नॉलॉजिस्ट असून त्यांना फॅशन उद्योगातील १४ वर्षांचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी "अनहिडन : अ न्यू एरा इन फॅशन" या ब्रँडची स्थापना केली. अपंगत्व किंवा शारीरिक व्याधी असणाऱ्या लोकांसाठी स्टायलीश किंवा फॅशनेबल कपडे तयार करणे ही संकल्पनाच मुळात फारशी अस्तित्वात नव्हती. त्यामुळे लोकांना त्याची गरज समजणे हा एक संघर्ष सुरूच आहे असंही त्या सांगतात.
कपड्यांचे डिझाइन करण्यासाठी कोणत्या प्रकारचे संशोधन झाले?
कपड्यांच्या डिझाइनबद्दल बोलताना त्या सांगतात, गेल्या २ ते ४ वर्षात मी स्वतः भरपूर रुग्णांशी, परिचारिका आणि डॉक्टरांशी खूप बोलायचे. त्यानंतर, २०१८ मध्ये, मी सोशल मीडियावर लोकांना काय हवे आहे आणि हवे आहे हे विचारण्यास सुरुवात केली आणि माझ्या शक्य तितक्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी शक्य तितक्या कल्पनांमध्ये सुधारणा करु लागले.
रॅम्प वॉक वरील कपड्यांचे प्रदर्शन...
ज्या लोकांना ब्रेन स्ट्रोक किंवा तत्सम आजार आहेत, अशा लोकांना कपड्यांचे बटण लावताना खूपच त्रास होतो. तो त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सहज काढता व घालता येणारा एक निळ्या रंगाचा टीशर्ट तयार केला आहे.उपचार घेताना रुग्णाला कपडे काढावे लागू नयेत म्हणून त्यांनी सहज वर खाली करता येतील अशा हलणाऱ्या बाह्यांची निर्मिती केली आहे. कृत्रिम पाय वापरणाऱ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्राउझर, पँट्स त्यांनी तयार केल्या आहेत. जेनकिन्सच्या कलेक्शनमध्ये व्हीलचेअर वापरणाऱ्या रुग्णांसाठी लांब बॅक असलेले शर्ट तसेच टेलर मेड सूट यांचा देखील समावेश आहे.