अचिंता शेऊली वेटलिफ्टिंग ७३ किलो गट, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता हा तरुण. फक्त वीस वर्षांचा. पश्चिम बंगालमधील देऊलपूर या छोट्या गावचा. लहानसं पडकं घर, खायला अन्न नाही अशा परिस्थितीत हा तरुण वेटलिफ्टिंग करतो आणि सुवर्णपदक जिंकतो ही त्याच्या जिद्दीची कमाल आहे. त्याच्या एकट्याच्याच नाही तर त्याच्या आईच्याही. अचिंता सांगतोच, मी आज जो कुणी आहे त्या साऱ्याचं श्रेय फक्त दोन माणसांना माझी आई आणि माझे कोच आत्मन दास. मी काय, माझ्या आईनेही कधी विचार केला नव्हता की, देशासाठी गोल्ड मेडल जिंकता येईल! आज जेवलो उद्याचं काय, आत्ता खाल्लं रात्री जेवायला काय? एवढाच विचार आम्ही करायचो. खायचं काय हाच खरा प्रश्न होता. खरं सांगतो एकेक घास आम्ही अक्षरश: कष्ट करून कमवत होतो. त्यातही माझी आई माझी आणि माझा भाऊ अलोकची काळजी घेत होती. वडील सनस्ट्रोकने २०१३ साली गेले. त्यानंतर आईचा एकच ध्यास होता आम्ही दोन्ही मुलं जगलो पाहिजे. तिला तर माहितीच नव्हतं वेटलिफ्टिंग काय असतं.
(Image : google)
अचिंताची आई पूर्णिमा. साधी बाई. जिला फक्त एकच कळत होतं की आपली लेकरं जगली पाहिजे, वाढली पाहिजे. म्हणून ती एकटीनं खूप कष्ट करायची. जरीच्या कारखान्यात काम करायची. तिथंच अचिंता आणि आलोक ही मुलंही काम करत. तिची अजिबात इच्छा नव्हती लहान वयात मुलांनी ते काम करावं. पण नाही केलं तर खाणार काय? दोघं भाऊ गाड्या लोड-अनलोड करतात त्या हमाली कामावरही जात. तिथंच तर तो बोजा उचलायला लागला.अचिंताची आई सांगते, ‘जगात कशाचंच दु:ख नाही पण आपली पोरं रात्री जेवायला नाही म्हणून न जेवता उपाशी झोपली हे दु:ख कोणत्याच आईच्या वाट्याला येऊ नये.’ त्याच्या आईनं मुलाला मिळालेल्या सर्व ट्रॉफ्या, मेडल फाटक्या साडीत गाठोडं बांधून ठेवले होते. आता ती आलोकला म्हणाली की, आपण कपाट घेऊ, लोकांना पाहायला बरं पडेल अचिंताचे मेडल्स...मुलानं आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकल्यावर तरी त्या माउलीचे दिवस पालटतील अशी आशा आहे.