कॅन्सर डिटेक्ट झालाय, हे समजलं आणि मला धक्काच बसला.. खूप खूप रडले.. काही सुचत नव्हतं तेव्हा, असं झालंच कसं असं वाटतं होतं सारखं सारखं.. कारण मी दरवर्षी माझ्या सगळ्या तपासण्या करून घ्यायचेच. आराेग्याबाबत हयगय मी कधीच केली नव्हती.. तरी कॅन्सर झाला हे ऐकून खूप घाबरले आणि रडायला लागले.. शेवटी माझी बहीण मला रागवली, पण तरीही... अशा शब्दांत अभिनेत्री महिमा चौधरी (Actress Mahima Chaudhari) हिने तिच्या मनातल्या भावनांना आणि कॅन्सर झालाय, या दु:खाला वाट करून दिली..
गोड चेहरा आणि तेवढंच लाघवी हास्य, मानेवर- खांद्यावर रुळणारे तिचे लांबसडक केस.. असा तिचा चेहरा आपल्या अगदी सवयीचा. पण हीच महिमा जेव्हा आता व्हिडिओमध्ये पुर्ण केस गळालेल्या अवस्थेत समोर येते, तेव्हा क्षणभर काळजात चर्रर्र होतंच.. अगदी प्रत्येकाच्याच. ज्येष्ठ अभिनेने अनुपम खेर (Anupam Kher) यांनी तिचा हा व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये कॅन्सर झाला तिथपासून ते अनुपम खेर यांनी त्यांच्या चित्रपटासाठी तिला ऑफर दिली इथपर्यंत सगळं काही सांगितलं आहे. यामध्ये अनेक क्षणी बोलता बोलता महिमा अचानक इमोशनलदेखील झाली होती..
आजाराविषयी माहिती देताना महिमा म्हणाली की ती दर वर्षी संपूर्ण बाॅडी चेकअप करायची. तसंच मागच्यावर्षीही करायला गेली. चेकअप झाल्यानंतर तिच्या ब्रेस्टमध्ये काही वेगळेच सेल्स वाढलेले तिच्या डॉक्टरांना दिसून आले. त्या डॉक्टरांनी तिला त्या विषयातल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला सांगितला. त्यानुसार ती प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मंदार यांच्याकडे गेली. त्यांनी तपासणी करून तिला बायोप्सी करण्याचा सल्ला दिला पण हे सेल्स कॅन्सरचे नसावेत, असा त्यांचाही अंदाज होता. पण अखेर त्यांचाही अंदाज खोटा ठरला आणि महिमाला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं.
मला कॅन्सर झाला आहे, ही गोष्टच मला पुर्णपणे हादरवून टाकणारी होती. त्यामुळे मी प्रचंड घाबरले होते. कॅन्सर पहिल्याच स्टेजमध्ये आहे आणि तो पुर्णपणे बरा होऊ शकतो, हे डॉक्टर आणि तिची बहिण पण तिला वारंवार सांगत होते. पण तरीही मनातली भीती मात्र कमी होत नव्हती असं महिमा म्हणाली. या आजाराशी लढताना खरी हिंमत आणि बळ मिळालं ते केमोथेरपीच्यावेळी तिथे आलेले काही पेशंट बघून असं महिमाने सांगितलं. ती म्हणाली की मी माझ्या आजाराने हतबल होऊन गेले होते. पण केमो घेण्यासाठी आलेल्या अनेक जणी मात्र हिंमतवान होत्या. तिथे हॉस्पिटलमध्ये त्या केमो घ्यायच्या आणि पुन्हा त्यांच्या कामावर जाण्यासाठी तयार असायच्या. त्यांच्याकडे पाहूनच हिंमत आली, आजाराशी लढणं तर दूर पण आधी त्याला सामोरं कसं जायचं याचंही बळ आलं..
कॅन्सर झाला म्हणून सुरुवातीला घाबरलेली महिमा आता मात्र त्यातून पुर्णपणे बरी झाली आहे. आपले केस गळाले आहेत. वीग लावून शुटींगला जावं लागणार या सगळ्या गोष्टी तिला खरंतर खूप जड जात आहेत. तो विचार करून रडूही येतंय. पण तरीही ती उभी आहे, लढते आहे. म्हणूनच तर या व्हिडिओच्या शेवटी अनुपम खेर तिचं 'माय हिरो' म्हणून कौतूक करत आहेत.