तापसी पन्नू. ती बोलते रोखठोक. दिसतेही एकदम वेगळी. फिल्मी सौंदर्याचे मापदंड, वागण्याच्या कचकडी पद्धती तिने बाजूला ठेवल्या आणि चारचौघींसारखी ती जगते, बेधडक बोलते आणि आपल्याला आवडतील तेच सिनेमे करते. म्हणून तापसी वेगळी दिसते. नुकतंच एका मुलाखतीत तिने किती सहज सांगून टाकला तरुण मुलींचा एक प्रॉब्लम. आणि ते सांगताना ना तिच्या बोलण्यात गिल्ट होता ना सांगण्यात. स्वत:चा विचार आधी करा असं ती सहज सांगून गेली आणि म्हणाली विसरुन जा, लोक काय म्हणतील! तुमचं आयुष्य तुम्हाला स्वत:ला जगायचं आहे की लोक येणार आहेत मदतीला (Taapsee Pannu Life Lesson To Women's)?
'लल्लन टॉप'ला दिलेल्या मुलाखतीत तापसी जरा स्पष्टच बोलली. अगदी रोखठोक. म्हणाली, मुलींच्या आयुष्यात सगळ्यांना प्राधान्य असतं, फक्त स्वत:ला शेवटी ठेवतात. सब को प्रायॉरिटी देते है बस खूद को लास्ट में खडे करते है! मुलींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लम काय असतो? त्या सगळ्यांना प्रायॉरिटी देतात. पण स्वत:ला सगळ्यात शेवटी मोजतात. स्वत:ला, स्वत:च्या आयुष्याला प्राधान्य कधी देणार? ज्यादिवशी आपण स्वत:ला प्राधान्य द्यायला लागू, ज्यादिवशी स्वत:चा विचार करुन त्यादिवशी गोष्टी आपोआप बदलायला लागतील. आयुष्य बदलायला लागतील.
पण असा विचार करायचा म्हणजे मग लगेच पुढचा प्रश्न, लोक काय म्हणतील?
विसरुन जा ते! काय म्हणतील लोक? लोक काय येतात आणि जातात, बोलतात आणि लागतात आपलं आयुष्य जगायला? पण आपलं काय?
आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे. आपण ठरवायचं आपल्याला काय करायचं? आपले प्रॉब्लम आपल्याला सोडवायचे असतात तेव्हा कुणी नाही येत मदतीला. आपण आपल्याला मदत करायची, आपण आयुष्य जगायचं. लोक काय म्हणतील हा विचार कशाला करत बसायचा? तापसी असं तडतडून सांगत असते. प्रश्न एवढाच आहे की हे पटत असलं तरी स्वत:चं जगणं स्वत:च्या हातात घेऊन मनासारखं जगायला किती जणींना जमतं?
जमेल?