शिक्षण झालं की नोकरी आणि मग लाईफ सेट अशी आपली सामान्य संकल्पना असते. एकदा नोकरी लागली की आपण त्यामध्ये स्थिरावून जातो. मग थोडी वेगळी वाट करुन काही करावे याचा विचारही आपल्या मनात येत नाही. दर महिन्याला बँकेत जमा होणारा पगार आणि त्यात बसवावी लागणारी गणिते यामध्ये आपले आयुष्य बांधले जाते. अशी स्थिर नोकरी सोडण्याचा विचार क्वचितच कोणी करत असेल. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रियंवदा म्हाडदळकर या भारतात तेराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. प्रियंवदा यांनी हातातली नोकरी सोडत लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरवले. अतिशय अनिश्चित असलेल्या करिअरमध्ये आपल्या कष्टाने यश संपादन करत त्यांनी स्वत:ला सिद्ध करुन दाखवले. IAS व्हायचे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.
प्रियंवदा मुळच्या रत्नागिरीच्या असून त्यांचं शिक्षण मुंबईत झालं आहे. त्यांनी व्हिजेटीआय मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी आयआयएम बँगलोर मधून एमबीए केलं. त्यानंतर सहा वर्षे त्यांनी इनव्हेस्टमेंट बँकींगमध्ये नोकरी केली. मात्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हते. त्यामुळे अखेर मनाचा दृढ निश्चय करुन २०२० मध्ये प्रियवंदा यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडल्याचे 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. प्रियवंदा यांना लहानपणापासूनच IAS ऑफिसर होण्याची इच्छा होती. मात्र काही ना काही कारणाने त्यांचे हे स्वप्न मागे राहत होते. प्रियंवदा यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्याकडूनच प्रियंवदा यांना शासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली. विशेष म्हणजे मनापासून कष्ट घेत दुसऱ्याच प्रयत्नात प्रियंवदा यांनी आपले स्वप्न सत्यात उतरवले.
भरपूर सराव आणि अभ्यासातला नियमितपणा हे त्यांच्या यशाचं खरं गमक आहे. वैकल्पिक विषयाचा आवाका मोठा असल्याने त्यावर खूप भर दिल्याचं त्या सांगतात. मुलाखतीच्या बाबतीत त्या सांगतात, वैयक्तिक माहिती आणि करंट अफेअर्स या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मुख्य परीक्षा झाल्यावर मी त्याचा दोन ते तीन महिने नीट अभ्यास केला. मुख्य परीक्षेत एखाद्या गोष्टीवर लिहायचं असतं. मात्र मुलाखतीत हेच सगळे अतिशय आत्मविश्वासाने बोलायचे असते, त्यावेळी अगदी मुद्देसूद बोलावं लागतं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी अभ्यास केला. आपल्या यशात आपले आईवडिल, नवरा आणि सासरच्यांचा खूप मोठा वाटा असल्याचं त्या आवर्जून सांगतात.