प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरचा सामना करत असल्याचे आपल्या सगळ्यांना माहित आहे. याविषयी तिने अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवादही साधला आहे. कॅन्सरसारख्या असाध्य आजाराशी लढा देणे वाटते तितके सोपे नाही. मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या थकवणारा हा आजार आपल्याला पार थकायला लावतो. कॅन्सरच्या उपचारांनंतरही शरीरावर त्याचे काही परिणाम दिसून येतात. सोनालीने नुकतेच याविषयी भाष्य केले असून या उपचारांचा आपल्यावर काय परिणाम झाला याविषयी तिने सांगितले आहे.
कॅन्सर उपचारांनंतर आपल्या मेंदूला एकप्रकारचे धुके आले, ज्यामुळे आपण वैयक्तिक आयुष्यतील काही गोष्टी सतत विसरतो असे ती म्हणाली. अशावेळी आपल्याला नेमकं काय होतंय हे कळत नाही. तर सात वर्षांच्या गॅपनंतर सेटवर काम करताना आपल्याला बरीच आव्हाने आली असेही ती म्हणाली. आपल्या कॅन्सर आधीच्या काळातील गोष्टी बऱ्याच वेगळ्या होत्या असे तिचे म्हणणे आहे. पूर्वी एखादा डायलॉग दोन ते तीन वेळा वाचला तरी माझ्या लक्षात राहायचा आता तसे होत नाही. त्यामुळे मला माझे डायलॉग लक्षात राहतील का याविषयी चिंता वाटते. अॅक्टींग ही आयत्या वेळची गोष्ट नसते, त्यासाठी थोडी तयार लागते. तर रिअॅलिटी शोचे जजिंग करत असताना तुम्हाला जे वाटते ते तुम्हाला बोलायचे असते त्यामुळे याठिकाणी स्क्रीप्ट लक्षात ठेवावी लागत नाही.
सोनाली म्हणते, “ब्रेन प्लॅस्टीसिटीसाठी असणारे सेम टेक्निक मी वापरते. तुझ्याकडे प्लास्टीसिटी आहे त्यामुळे तु अमुक गोष्ट करु शकशील असे मी माझ्या मेंदूला सांगते. डायलॉगच्या सगळ्या ओळी दोनदा वाचून समजून घेणे महत्त्वाचे असते हे मी स्वत:ला समजावले आहे. मला माझ्या डायलॉगवर काम करण्यासाठी वेगळी पद्धत अंगीकारावी लागणार आहे हे मला समजते. काम करण्याची आताची पद्धत जास्त एक्सायटींग आहे. मी आता बऱ्याच काळाने कामात परत आले आहे, त्यामुळे मी आता चांगली स्क्रीप्ट, चांगला आवाज आणि एखादी नवीन गोष्ट सांगण्याच्या प्रयत्नात आहे. माझा मुलगाही आता मोठा झाल्याने मी माझा वेळ कामासाठी देऊ शकते. माझ्या आजाराविषयी आता मला क्लॅरीटी आली असून मी कॅमेराच्या समोर एखादी गोष्ट सांगण्याच्या कलात्मक कामाशिवाय दुसरे काहीही एन्जॉय करु शकत नाही. मी अपघाताने अभिनेत्री झाले असले तरी आता मात्र मी ज्या लोकांना भेटते, त्यांच्याशी संवाद साधते, ज्या गोष्टी ऐकते त्यात मी स्वत:ला पाहते.”