वयाची शंभरी पार केल्यानंतर एवढं दीर्घ आयुष्य जगायला मिळालं म्हणून शंभरी पार व्यक्ती आयुष्याबद्दल समाधानी आणि कृतज्ञ असतात. आता सगळं मिळालं, काहीच अपेक्षा नाही अशी भावना निर्माण होते. पण केरळमधील कोट्यम येथील थिरुवंचूर गावातील कुट्टीयाम्मा या आजची गोष्टच वेगळी. या आजी आहेत 104 वर्षांच्या. या वयात त्यांनी लिहिण्या-वाचण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं.
गेल्या शंभर वर्षांपासून कुट्टीयाम्मा आजींची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी लवकर उठणं, घर आवरणं, स्वयंपाक करणं, गोठ्यातील गायींना चारा पाणी करणं, खुराड्यातील कोंबड्यांना दाणे घालणं या सर्व कामात आजी व्यस्त असायच्या. पण आता त्यांच्या या दिनचर्येत आणखी एका कामाची भर पडली आहे . तशी तर त्यांची कोणत्याच कामाविरुध्द तक्रार नाही. पण आता या वयात आणखी एक काम म्हणजे जरा जास्तच वाटतं. पण हे काम आजीच्या आवडीचं आहे. ते म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पेपर टाकणार्या मुलाने मलायला मनोरमा हा स्थानिक वृत्तपत्र टाकलं की आजी पेपर घेऊन बसतात. पुढचे दोन तास संपूृण वृत्तपत्र बारकाईनं वाचून काढतात. जगात कुठे काय चाललं आहे याबाबतचा माहिती मिळवून झाली की मग कुट्टीयाम्मा आजी आपल्या पुढच्या कामाला वळतात.
Image: Google
आपल्याला लिहिता वाचता यायला हवं ही कुट्टीयाम्मा आजीची लहानपणापासूनची इच्छा होती, पण ती पूृर्ण होण्यास 100 वर्ष लागले. आता एप्रिल महिन्यात त्यांना चांगलं लिहायला वाचायला यायला लागलं. इतकंच नाही तर ‘केरळ राज्य साक्षरता मिशन परीक्षा’ यात त्यांनी 100 पैकी 89 गुण मिळवले तर गणितात 100 पैकी 100 गुण मिळवलेत.कुट्टीयाम्मांना कायम जगात काय चाललं आहे, याबद्दलची उत्सुकता असायची. पण वाचता येत नसल्यानं त्या स्वत:वरच चरफडायच्या. तर कधी घरातील शाळेत जाणार्या लहान मुलांना ‘अरे हे वाचून तर दाखवा’ म्हणत त्यांच्याकडून वाचून घ्यायच्या. यामुळे त्यांना आनंद होत असला तरी आपल्यालाही वाचता यायला हवं, आपलं नाव , पत्ता आपल्या हातानं लिहिता यायला हवा ही त्यांची तीव्र इच्छा होती. ही इच्छा त्यांच्यात आता निर्माण झाली नव्हती. लहानपणापासून त्यांना शिकण्याची आवड होती. पण घरी परिस्थिती तशी नव्हती. एकतर 100 वर्षांपूृवी मुलींनीही शिकावं असं काही वातावरण नव्हतं. आणि गावातील मुलंही नववीनंतर शिक्षण सोडून कामाला लागायचे. कुट्टीयाम्मा ज्या घरात जन्माला आल्या त्या घरात दारिद्रय खूप. शिवाय कुट्टीयाम्मा धरुन 14 भावंडं. आई-वडील शेतमजूर होते. पोट चालवण्यासाठी वीतभर जमिनीचा तुकडाही नसल्यानं संपूर्ण कुटुंबाचं पोट मजुरीवरच चालायचं. अशा परिस्थितीत शिकणं अवघडच. आई वडील सकाळी कामाला गेले की घर आवरणं, स्वयंपाक करणं, लहान भावंडांना सांभाळणं या कामातच कुट्टीयाम्मा व्यस्त असायच्या. ही कामं करत असतानाच कुट्टीयाम्मा लहानाची मोठी झाली.
Image: Google
16 व्या वर्षी टीके कोंथी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. ते वनस्पतीजन्य औषधं विकायचे. कुट्टीयाम्मा यांना 5 मुलं झालीत. कुट्टीयाम्मा आपल्या संसारात आनंदी होत्या. पण त्यांना कुठलीतरी गोष्ट हरवल्यासारखी वाटत होती. ती गोष्ट म्हणजे लिहिण्या वाचण्याचं कौशल्य. आपल्या वाचता-लिहिता यायला हवं हे त्यांचं स्वप्न भरपूर वर्षांच्या संसारानंतरही कायम राहिलं.कुट्टीयाम्मा यांच्या स्वप्नाला बळ मिळालं ते एक वर्षापूर्वी. रेहाना जॉन या 34 वर्षीय साक्षरता प्रशिक्षकामुळे कुट्टीयाम्मा आजीला लिहिणं-वाचणं शिकण्याची प्रेरण मिळाली. आपल्या नातवंडांच्या शिकण्याबद्दल कुट्टीयाम्मा यांना असलेली जिज्ञासा, कुतुहल हे रेहाना यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी कुट्टीयाम्मा यांना काही पुस्तकं देऊ केली. मग आजीलाही ती वाचण्याची इच्छा निर्माण झाली . त्यासाठी रोज संध्याकाळी रेहाना आजीला वाचायला शिकवायला लागली.
104 वर्षं वय असताना कुट्टीयाम्मा आजींची शिकण्याची उत्सुकता नक्कीच कौतुकास्पद आणि वाखाणण्यासारखी असली तरी या वयात लिहिणं वाचणं शिकणं ही गोष्ट त्यांच्यासाठी सोपीही नव्हती. कमी दिसणं, कमी ऐकू येणं या समस्या असतानाही त्यांची चिकाटी मात्र त्यांना शिकण्याचं बळ देत होती. रेहाना या त्यांच्या शिक्षिकेलाही आपल्या सर्वात वयस्कर अशा विद्यार्थीनीच्या प्रयत्नांचं भारी कौतुक आहे. आपण यायच्या आत कुट्टीयाम्मा वही, पेन , पुस्तक असं सगळं काढून तयार बसाच्या. मग मस्त हसत खेळत शिकणं चालायचं. दोघींमधल्या गप्पांमुळे, हास्य विनोदामुळे दोघींमधील शिक्षक विद्यार्थिनी हे नातं गळून पडलं . रेहानाला तर कुट्टीयाम्मा आपल्या आईच वाटू लागल्या आहेत. कुट्टीयाम्माही रेहानाकडून शिकण्यासोबतच रेहानाच्या आवडी निवडीही जपायच्या. तिला आवडतं ते खायला करुन ठेवायच्या. हसत खेळत शिक्षण चालल्यामुळे कुट्टीयाम्मा आजी वाचायला आणि लिहायला शिकल्या.
Image: Google
साधारणत: वयाच्या नवव्या वर्षी मुलं चौथीत शिकतात. पण आता 104 वर्षांच्या कुट्टीयम्मा यांना चौथीची परीक्षा द्यायची आहे. आता त्यांना मल्याळम, इंग्रजी, परिसर अभ्यास आणि गणित हे विषय असणार आहेत. कुट्टीयाम्मा यांना केवळा मल्याळम लिहिता वाचता येतं. पण इंग्रजी शिकणं ही काही त्यांना दुर्लभ गोष्ट वाटत नाही. सर्व विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवण्याचा आजीचा मानस आहे.
Image: Google
कुट्टीयाम्मा यांच्या या शिकण्याच्या जिद्दीचं केरळचे शिक्षणमंत्री व्ही.सिवनकुट्टी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊण्टवरुन कौतुक केलं आहे. ज्ञानाच्या जगात शिरण्यासाठी वयाचा अडथळा नसतो असं म्हणून त्यांनी कुट्टीयाम्मासारख्या वयस्कर विद्यार्थ्यांनी शिकण्याप्रती दाखवलेल्या चिकाटीला शुभेच्छा दिल्या आहेत.
कुट्टीयाम्माची शिक्षिका रेहाना जॉन यांना कुट्टीयाना आजीच्या शिकण्याप्रतीच्या आवडीचं कौतुक वाटतं. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून या दोघी न चुकता भेटतात आणी पुस्तक वाचन करतात, कुट्टीयाम्मा अक्षरं गिरवतात. आपण शिकतोय म्हणून कुट्टीयाम्मा घरातल्या इतरांकडून स्वयंपाक करुन घेत नाही. त्यांचा स्वयंपाक त्याच करतात. स्वयंपाक. घर आवरणं या सर्व गोष्टी आजी कोणाच्याही मदतीविना करतात आणि सोबतच शंभर वर्ष उराशी बाळगलेल्या शिकण्याच्या इच्छेसाठी आवर्जून वेळही काढतात.
Image: Google
कुट्टीयाम्मा आजींना अजून खूप शिकायचं आहे.तसेच्या आपल्या पतवंडांना चांगलं शिकून नोकरी लागल्याचं बघायचं आहे. कुट्टीयाम्मा यांच्यात असलेली जिद्द आणि आशावाद बघता त्या त्यांचं स्वप्न पूर्ण करतील असं आता त्यांच्या घरातल्यांना आणि गावातल्यांनाही वाटू लागलं आहे.