२६ वर्षाची एक तरुणी आणि तिच्यापेक्षा लहान असलेल्या तिच्या दोन बहिणी मिळून एक व्यवसाय करतात आणि वर्षाला २५ लाखांचे उत्पन्न मिळवतात. असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही. पण केरळमधील तीन बहिणींनी हे सत्यात उतरवून दाखवले आहे. एमबीएपर्यंत शिक्षण झालेली वर्षा, तिच्या कुटुंबाचाही व्यवसाय असल्याने घरात व्यवसायासाठी पूरक वातावरण होते. त्यामुळे तिनेही आपण व्यवसायाच करायचा असे ठरवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर कोणता व्यवसाय करायचा याचा शोध घेताना तिने अनेक उत्पादनांचा अभ्यास केला. आणि हिंगाचा व्यवसाय करायचे ठरवले. भारतात विशेषत: दक्षिणेकडे पदार्थांमध्ये हिंगाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र त्या प्रमाणात हिंग आपल्याकडे पिकत नाही आणि वापरासाठी तयारही होत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन वर्षाने हिंगाची माहिती घ्यायला सुरुवात केली.
हिंग म्हणजे फेरुला वनस्पतीच्या मूळांपासून काढलेल्या डिंकाची राळ असते. हिंग आपण स्वयंपाकात तर वापरतोच पण काही औषधांसाठीही त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये हिंगाला अतिशय महत्त्व असून भारतात हिंग मोठ्या प्रमाणात वापरले जाते पण त्याची निर्मिती मात्र अफगाणिस्तान आणि इराणमध्ये होते. म्हणून वर्षाने हिंगाची निर्मिती करायचे ठरवले. इतकेच नाही तर तिने आपल्या दोन लहान बहिणींनाही आपल्यासोबत या व्यवसायात घेतले. २०१९ मध्ये सुरू केलेल्या या उद्योगसमूहाला या तिघींनी 3vees असे नाव दिले आहे. मागील ३ वर्षात त्यांनी आपला व्यवसाय भरपूर वाढवला असून आता त्या विविध प्रकारच्या करी पावडर आणि नाश्त्याचे पदार्थ यांची विक्री केली जाते. त्यांची उत्पादने तयार होण्याचा कारखाना एर्नाकुलम येथे आहे. वर्षा व्यवसायातील दररोजच्या गोष्टी सांभाळते तर तिची लहान बहिण विस्मया चार्टर्ड अकाऊंटन्सीचा अभ्यास करत असल्याने ती आर्थिक बाबींकडे लक्ष देते. तर बीबीए झालेली वृंदा डिजिटल मार्केटींग आणि सोशल मीडिया प्रमोशन या गोष्टी सांभाळते. त्यांची आणि सरला आणि वडिल प्रशांथ हे या तिघींसाठी खंबीर पाठिंबा असल्याचे त्या सांगतात.
बेटर इंडिया या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत वर्षा सांगते, सुरुवातीला मी एकटीने कंपनीची सुरुवात केल्याने सोल प्रोप्रायटरशिप होती, पण आता माझ्या बहिणीही पूर्णवेळ कंपनीचे काम पाहत असल्याने आम्ही ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. आता आमच्याकडे ३० जण कामाला असून उत्पादन आणि वितरणाचे काम हे लोक पाहतात. हा व्यवसाय सुरू करण्याआधी मी तामिळनाडूतील काही उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना भेट दिली, एक ट्रेनिंग प्रोग्रॅमही केला असे वर्षा सांगते.
वृंदा सांगते, सुरुवातीला हिंगाचे उत्पादन करताना त्याची चव आणि वास नेहमीच्या हिंगासारखी नसल्याची तक्रार लोकांनी केली. त्यानंतर आम्ही त्यामध्ये बदल केले आणि आम्हाला नेमकी चव आणि वास सापडला. आता आम्हाला थेट मागणीबरोबरच इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन येणारी मागणीही मोठी असल्याचे डिजिटल मार्केटींगचे काम सांभाळणारी वृंदा सांगते. इतर स्पर्धक कंपन्यांच्या हिंगापेक्षा आपल्या हिंगाची किंमत थोडी कमी असल्याचेही ती सांगते.
सुरुवातीला एका भाड्याच्या खोलीत सुरु केलेल्या या व्यवसायाने आता चांगलीच भरारी घेतली असून आता त्यांच्या मालकीची ५० लाख रुपयांची मशिनरी आहे. आता वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आमचे उत्पादन राज्यात पोहचवत असल्याचे मॅनेजिंग डिरेक्टर वर्षा सांगते. याबरोबरच रेडी टू कूक नाश्त्याचीही बरीच उत्पादने असून त्यांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे सांगते. प्रत्येक महिलेने आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे ते करायला हवे असा सल्लाही ही लहानगी उद्योजक सर्वांना देते.