Join us  

women's cricket world cup 'लेडी शेन वॉर्न' म्हणून जीची चर्चा आहे ती अलाना किंग नेमकी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2022 3:32 PM

शेन वाॅर्नकडे बघून आपणही क्रिकेटमध्ये 'वाॅर्न'सारखी कामगिरी करावी हे स्वप्न बघणाऱ्या अलाना किंगनं वाॅर्नला वाहिलेल्या श्रध्दांजलीनं जगाचं लक्ष वेधलं!

ठळक मुद्देअलाना किंग ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघात ऑल राउंडर खेळाडू असून लेग स्पिनर बाॅलर ही तिची मुख्य ओळख आहे. वाॅर्नसारखी बाॅलिंग टाकण्याचं स्वप्न पाहात असतानाअलानानं क्रिकेटचा सराव नुकताच सुरु केला होता. तेव्हा तिचा मुख्य खेळ  क्रिकेट नसून टेनिस होता.आज अलाना जेव्हा मैदानावर बाॅलिंग करते तेव्हा टेनिस्, बेसबाॅल आणि क्रिकेट या तिन्ही खेळातलं कौशल्य वापरुन आपला बेस्ट परफाॅर्मन्स देण्याचा प्रयत्न करत असते.

अलाना किंग 11 वर्षांची होती  तेव्हा... शेन वाॅर्ननं आंतरराष्टीय कसोटी क्रिकेटमधला 700 वा बळी मिळवला होता. वडील आणि भावासोबत अलाना तो सामना बघण्यासाठी स्टेडियममध्ये बसलेली होती. शेन वाॅर्नच्या कामगिरीचा जल्लोष बघून अलानाला वाटलं,  हे असं शेन वाॅर्नसारखं आपल्यालाही आपल्या आयुष्यात करता यायला हवं.. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात आपलंही  नाव व्हावं हे स्वप्न त्या चिमुरडीनं तेव्हा पाहिलं होतं. तिच्यापेक्षा तीन वर्षानं मोठा असलेला तिचा भाऊ मार्क तेव्हा क्रिकेट खेळायचा. त्याच्यासारखंच अलानानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. ज्या शेन वाॅर्नला बघून ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात स्थान मिळवण्याचं स्वप्न अलानानं पाहिलं त्या आपल्या प्रेरणास्थानाला अलानानं खास तिच्या लेडी वाॅर्न स्टाइलमध्ये इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात श्रध्दांजली वाहिली. न्यूझिलंडमध्ये महिला विश्व चषकाचा तिसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये  रंगला होता. शेन वाॅर्नला श्रध्दांजली म्हणून खेळाडू उजव्या हातावर काळी फित बांधून खेळत होते. इंग्ल्डची प्रमुख बॅटर टॅमी ब्लूमोरला अलानानं वाॅर्न स्टाइलमध्ये बाॅल टाकत आउट केलं आणि दंडाला बांधलेल्या काळ्या फितीला स्पर्श करत शेन वाॅर्नला अनोखी श्रध्दांजली वाहिली. 

Image: Google

 अलाना किंग ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघात ऑल राउंडर खेळाडू असून लेग स्पिनर बाॅलर ही तिची मुख्य ओळख आहे. अलाना बाॅलिंग टाकताना असा काही चेंडू वळवते की बॅटरला चकवाच मिळतो. बॅटरची चेंडू वळवून फसगत करण्याची तिची ही स्टाइल शेन वाॅर्नसारखीच. म्हणूनच अलाना किंगला 'लेडी वाॅर्न'म्हणून ओळखलं जातंय. अलाना किंगनं आपल्या आयडाॅलला खास त्याच्या स्टाइलमध्ये श्रध्दांजली वाहिली याचं कौतुक जगभरात होतंय.

Image: Google

पाच वर्षांपूर्वी अलाना किंग ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट जगतात काहीच नव्हती. तिचं उद्दिष्ट ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात प्रवेश करण्याचं होतं. तेव्हा अलानाला कोणीतरी विचारलं होतं, की पुढच्या पाच वर्षात तू क्रिकेटमध्ये कुठे असशील? तेव्ह क्षणाचाही विलंब न लावताना अलानानं आत्मविश्वासानं आपण पुढच्या पाच वर्षात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील नियमित खेळाडू असू. जगातली नाही पण आपल्या देशाच्या संघातली यशस्वी खेळाडू म्हणून आपलं नाव नक्कीच असेल असा विश्वास अलानाला पाच वर्षांपूर्वी होता आणि आज खरोखर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातली चमकदार खेळी करणारी खेळाडू म्हणून अलानानं जगाचं लक्ष स्वत:कडे खेचलं आहे. 

Image: Google

27 वर्षाच्या अलानानं 20जानेवारी 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लड या टी 20  सामन्यात खेळून आंतरराष्टीय पातळीवर आपल्या कारकिर्दीला दिमाखात सुरुवात केली. याच महिन्यात तिची मार्च 2022 च्या न्यूझिलंड येथे होणाऱ्या महिला  विश्व चषकासाठीच्या ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली.  27 जानेवारी 2022 रोजी ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लड महिला ॲशेस कसोटी सामान्यात तिने आंतरराष्टीय क्रिकेट कसोटी सामन्यात खेळण्यास प्रारंभ केला. 14 दिवसांच्या अंतरावर आंतरराष्टीय क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये बॅटिंग, बाॅलिंग आणि फिल्डिंगमध्ये चमकदार कामगिरी अलानाला करता आली ती तिच्यात खच्चून भरलेल्या आत्मविश्वास आणि आशावादानं. अलानाच्या समोर अर्धा रिकामा ग्लास असेल तर त्याला अर्धा भरलेला ग्लास म्हणण्याची अलानाची सवय तिला यशापर्यंत खेचून आणते हे तिच्या आई वडिलांसोबतच तिच्या प्रशिक्षकांचंही तिच्याबाबतीतलं निरीक्षण आहे .

  

Image: Google

अलानाचं कूळ मूळ हे भारतातील चेन्नईमधलं आहे. तिचे आई आणि वडील मूळ चेन्नईचे असून 1985 नंतर वडील  लेराॅय किंग हे मेलबर्नमध्ये गेले होते. त्यांना तिथे शेफ बनायचं होतं. पण वर्णद्वेषाचा सामना करत ते पुन्हा भारतात आले. लग्न झाल्यानंतर शेफ बनण्यासाठी पुन्हा मेलबर्नला गेले. तेव्हा तीन वर्षाचा मार्क आणि नुकतीच जन्मलेली अलाना किंग पती पत्नींसोबत होते. अलानाचे वडील शेफ नाही पण ट्राम ड्रयव्हर झालेत. वडिलांना, आपल्यालाऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा सामना करावा लागला असं अलाना म्हणते ते शोषिताच्या किंवा बळीच्या भूमिकेतून नव्हे. आपला रंग वेगळा होता त्यामुळे आपल्याला त्याचा सामना करावा लागला इतक्या सहज दृष्टीकोनातून ती तिला सामना कराव्या लागलेल्या वर्णभेदाच्या अनुभवाकडे पाहाते. आता तर ती माझी स्किन बाराही महिने टॅन असते असं म्हणत स्वत:च्या रंगाकडे मज्जेने बघते आणि संघातील वातावरण हसत खेळत ठेवते. 

Image: Google

वाॅर्नसारखी बाॅलिंग टाकण्याचं स्वप्न पाहात असताना अलानानं क्रिकेटचा सराव नुकताच सुरु केला होता. तेव्हा तिचा मुख्य खेळ  क्रिकेट नसून टेनिस होता. तिला टेनिस कोर्टवर आपल्या कामगिरीनं राज्य करायचं होतं. पण 14 वर्षांची असताना तिला जाणवलं की आपण कितीही प्रयत्न केले तरी टेनिसधील सर्वोत्तम जागा आपण नाही मिळवू शकत. तेव्हा जडावलेल्या अंतकरणानं तिनं टेनिस सोडलं होतं. पण हातात क्रिकेटच्या बॅटनं आणि बाॅलनं जम बसवला होता. वयाच्या 12 वर्षी तिच्यातली चमक बघून बेसबाॅल खेळण्यासाठी तिची निवड झाली. पण तिला बेसबाॅल खेळायचा नव्हताच.क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याची संधी म्हणून ती बेसबाॅल खेळली.

आज अलाना जेव्हा मैदानावर बाॅलिंग करते तेव्हा तिन्ही खेळातलं कौशल्य वापरुन आपला बेस्ट परफाॅर्मन्स देण्याचा प्रयत्न करत असते. टेनिस खेळताना मागील शरीर हलवत नजर खेळत्या बाॅलवर स्थिर ठेवण्याचं, सतर्क राहाण्याचं कौशल्य तिला फिल्डिंग करताना कामास येतं. तर सरळ रेषेत पूर्ण अंगाचा वापर करत बाॅलिंग करण्याची क्षमता तिच्यात बेस बाॅल खेळण्याच्या सरावातून निर्माण झाली. आपल्यातल्या कौशल्यामुळे आपण ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातली किंग लवकरच होवू असा विश्वास अलानाला आहे . तिच्या चौकटी भेदण्याच्या सवयीतून तिचं हे स्वप्नही नक्की पूर्ण होईल.. तूर्तास तरी लेडी वाॅर्न बनत तिनं जगाचं लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिला