‘मी गाणी म्हणते, माझे विचार व्यक्त करते तेव्हा लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा ‘‘एक वेगळा चष्मा’’ असतो. भाजप नेत्याची पत्नी या चष्म्यातून लोक माझ्याकडे पाहतात. पण मी जे व्यक्त होते ते मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बोलते, मांडते. ते माझे विचार आहेत. ट्विटरवर मी जे काही लिहिते तेव्हा मला जे म्हणायचं तेच मी म्हणते. योग्य प्रेझेंटेबल पध्दतीने माझे विचार मांडते. लोक त्या साऱ्या गोष्टींचं राजकारण करतात. पण तो त्यांचा चष्मा आहे. मी मात्र मला हवं तेच मांडते. तेच माझ्या गाण्याचंही. गाणं हे माझं पॅशन आहे. एक बँकर, गायिका, सामाजिक कार्यकर्ती, देवेंद्र फडनवीस यांची पत्नी, दिविजाची आई हे सारं मिळून ‘मी’ मी आहे. यापैकी एकही गोष्ट नसेल तर मी अमृता फडणवीस कशी असेल? त्या सर्व मिळून माझी ‘एक ओळख’ बनते..’ -अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सांगत असतात. मनमोकळ्या गप्पांतून उलगडतात त्यांच्या जगण्याचं आणि कामाचं पॅशन, त्यांचं भरभरुन जगण्याला आकार आणि आयाम देणं..
निमित्त होतं गणेशोत्सवाचं. आणि गणेशवंदना या त्यांच्या नव्या गाण्याच्या आगमनाचंही. गणेशवंदना या नव्या भक्तीमय गाण्यातूनही त्या स्त्रीचं खंबीर, कर्तव्यतत्पर, आनंदी आणि प्रेमळ रुप मांडत बाईच्या जगण्याची एक गोष्ट गुंफत आहेत.
त्यानिमित्त ‘लोकमत सखी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी आपली गाण्याची आवड आणि पॅशनेट जगण्याचा प्रवास उलगडून सांगितला.
समाजमाध्यमात ट्रोल होणं, टीका होते ते सारं टाळून आपल्या आवडीचं काम करत राहण्याचं बळ कुठून येतं यासंदर्भातला आपला प्रवास अमृता फडणवीस सांगतात; ‘महाराष्ट्रात कमी आहे ते हेच की, स्त्रिया आपले विचार व्यक्त करण्यात मागे राहतात. किंवा मग लोकांना स्त्रियांना त्यांचे विचार मांडू देत नाहीत. मला वाटतं कोणत्याही स्त्रीने असे मागे राहण्याची गरज नाही. महिलांनी काय करावं काय नाही यासाठीच्या नियमांचे बंधारे लोकांनी बांधलेत. आपण ते तोडणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की, लोकांना ट्रोलिंगमध्ये मजा येते. जे खराब कमेण्ट्स करतात त्यांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दोष दिसून येतो. मी त्याचा विचार करत नाही, मला माहिती आहे की मी काय करु शकते. माझ्या क्षमतांनुसार मी काय करतेय. मी जे ही काही करतेय ते सकारात्मकतेने करतेय. माझं गाणं , माझं काम लोकांसमोर आणायचं म्हणून करते. त्यातून अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळावी, त्यांच्याही व्यक्तिमत्त्वाचे उत्तम पैलू लोकांसमोर यावेत, त्यांना उमेद मिळावी म्हणून मी धडपडते आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मला जे काही करता येणं शक्य आहे ते मी करत राहीन. यासाऱ्यात देवेंद्रजींचे जे स्थान आहे, त्यामुळे माझ्या व्यक्त होण्याकडे कायम राजकीय हेतूने पाहिले जाते, पण मी मात्र व्यक्तिगत विचार म्हणून हे सारे मांडते आहे.’
आणि ते मांडत राहण्याची, जे ठरवलं ते खंबीरपणे करत राहण्याची हिंमत आपल्याला आपल्या आईकडून लाभली असंही अमृता फडणवीस सांगतात. ‘माझं गाणं हे पॅशन, ही आवड मला घरात लाभली. माझी आजी डॉक्टर होती सोबत उत्तम अभिजात गायिका होती. गाणं शिकली होती. तेच माझ्या बाबांचंही. ते ही गाणं शिकलेत. ते गाणं माझ्याकडे आलं. माझ्या गुरुंकडे मी शिकते आहे. ध्यान धारणा करते. त्यातून माझ्या गाण्याची आवड आकार घेतेय.’
अमृता फडणवीस म्हणतात, माझी आई अत्यंत खंबीर स्त्री होती. तिची ताकद, खंबीरपणा माझ्या मनात घर करुन राहिला आहे. आपल्या अवतीभोवती, आपल्या माणसांत आपल्याला अशी शक्तीस्थानं दिसतात. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. वाटतं, आपण जे करतोय ते ठीक करतोय. सकारात्मकतेने करतोय. ही सकारात्मकता सोबत असेल, आपली इच्छा असेल तर आपल्याला कुणीही थांबवू शकत नाही..’