Lokmat Sakhi >Inspirational > डेंटिस्ट असलेल्या पुणेकर अंजलीने जिंकला मिसेस इंडिया अर्थचा मुकूट! लग्नानंतर पूर्ण केलं मॉडेलिंगचं स्वप्न...

डेंटिस्ट असलेल्या पुणेकर अंजलीने जिंकला मिसेस इंडिया अर्थचा मुकूट! लग्नानंतर पूर्ण केलं मॉडेलिंगचं स्वप्न...

मराठमोळ्या तरुणीच्या जिद्दी प्रवासाची विशेष मुलाखत....

By सायली जोशी | Published: December 27, 2021 02:05 PM2021-12-27T14:05:49+5:302021-12-27T14:18:18+5:30

मराठमोळ्या तरुणीच्या जिद्दी प्रवासाची विशेष मुलाखत....

Anjali from Pune who is a dentist won the crown of Mrs. India Earth! Dreaming of modeling fulfilled after marriage ... | डेंटिस्ट असलेल्या पुणेकर अंजलीने जिंकला मिसेस इंडिया अर्थचा मुकूट! लग्नानंतर पूर्ण केलं मॉडेलिंगचं स्वप्न...

डेंटिस्ट असलेल्या पुणेकर अंजलीने जिंकला मिसेस इंडिया अर्थचा मुकूट! लग्नानंतर पूर्ण केलं मॉडेलिंगचं स्वप्न...

Highlightsस्वत:वर प्रेम करणे सगळयात महत्त्वाचे - मिसेस इंडिया अर्थ जिंकलेली अंजली सांगते बाह्य सुंदरतेबरोबरच आतले सौंदर्य सर्वात महत्त्वाचे...

सायली जोशी पटवर्धन

आपण दिसायला सुमार, रंगही सावळा त्यामुळे सौंदर्याच्या कोणत्याच व्याख्येत आपण बसत नाही. लहानपणी टिव्हीत पाहिलेल्या क्राऊन घातलेल्या मॉडेलसारखे आपणही रॅम्पवरुन चालावे असे स्वप्न पाहणारी पण सुंदरता आपल्यापासून कोसो दूर असणारी एक तरुणी मनात जिद्द बाळगते आणि अखेर स्वत:च्या हिमतीवर मिसेस इंडिया अर्थ (Mrs. India Earth) सारख्या स्पर्धेत पहिले स्थान मिळवते. ही तिच्यासाठीच नाही तर तिच्यासारख्या असंख्य तरुणींसाठी प्रेरणादायी बाब आहे. या मराठमोळ्या तरुणीचे नाव आहे डॉ. अंजली जगताप (Dr. Anjali Jagtap). पेशाने डेंटीस्ट असणाऱ्या अंजली यांना घरातून मॉडेलिंगसाठी पाठिंबा नव्हता, त्यामुळे इच्छा असूनही आपल्याला काही करता न आल्याची खंत त्या बोलून दाखवतात. मात्र लग्न झाल्यावर त्यांनी आपल्या पतीकडे आपल्याला असलेल्या मॉडेलिंगच्या आवडीबद्दल बोलून दाखवले आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण या क्षेत्रात पाऊल ठेवल्याचे अंजली सांगतात. सहज म्हणून आपण या स्पर्धेत भाग घेतला आणि अनपेक्षितपणे डोक्यावर आलेल्या मुकूटामुळे जबाबदारीबरोबरच आत्मविश्वासही वाढल्याचे त्या सागंतात. मराठी तरुणींचे अशाप्रकारच्या स्पर्धांमध्ये प्रमाण अतिशय कमी असल्याची खंतही त्या  व्यक्त करतात. मिसेस अर्थ स्पर्धेच्या विजेत्या डॉ. अंजली यांच्या यशाच्या निमित्ताने त्यांची घेतलेली मुलाखत...

१. आपण सुंदर आहोत आणि सौंदर्यस्पर्धेत आपण भाग घ्यावा असं कधी वाटलं आणि हा प्रवास कसा सुरू झाला? 

लहानपणापासून मला सगळे सांगायचे की तू सावळी आहेस, तुझे दात थोडे पुढे आहेत, तु दिसायला चांगली नाहीस. पण माझी बहीण गोरी असल्याने आमच्यात नेहमी तुलना केली जायची. तेव्हा मला सुंदरता आणि ब्यूटीची व्याख्या माहित नव्हती. त्यामुळे मी कायमच खूप बुजलेली असायचे, माझ्यात अजिबात आत्मविश्वास नव्हता. मी साधे फोटो काढायलाही घाबरायचे. लहानपाणापासून तुम्ही गोरे असाल तरच सुंदर दिसता असं आपण मुलींना नेहमी सांगतो. पण मी जशी मोठी झाले तसं मला कळत गेलं की सुंदरता ही दुसरी काही नसून ते तुमचं व्यक्तिमत्त्व असतं. आपण स्वत:ला कसं घडवतो त्यातून आपली सुंदरता तयार होते. त्यामुळे मी स्वत:च्या गोष्टींकडे फोकस करुन आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. एकदा शिक्षण पूर्ण होत आले की मुलीच्या घरातल्यांना लग्नाची काळजी असते. वैद्यकीय शिक्षण, नोकरी आणि लग्न या सगळ्यात माझे लहानपणापासूनचे स्वप्न अर्धवट राहीले. पण लग्नानंतर माझ्या पतीला मी माझे स्वप्न अर्धवट राहील्याचे बोलून दाखवले आणि त्यांनी मला खंबीर पाठिंबा दिल्यामुळे मी या स्पर्धेत सहभागी व्हायचे ठरवले. 

२. स्माईल ही एक अॅक्शन असते किंवा फोटोसाठी ती जितकी महत्त्वाची असते तितकीच ती तुमच्या सौंदर्यातही भर घालत असते, त्याबद्दल काय सांगाल? 

आपण कोणत्याही व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो तेव्हा आपण सगळ्यात आधी त्या व्यक्तीला स्माईल देतो, त्यामुळे आपला समोरच्या व्यक्तीशी स्माईलने संवाद सुरू होतो. स्माईल हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण सकारात्मक, अपरोचेबल आहोत हे आपली स्माईल सांगत असते. आपल्या व्यक्तिमत्त्व त्या पद्धतीने घडवणे आपल्या हातात आहे, त्यामुळे स्माईलिंग असणे आपल्या हातात असल्याने आपण त्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 

३. स्माईल, व्यक्तिमत्त्व याशिवाय सुंदरतेची आणखी काय व्याख्या सांगू शकाल? 

आपले केस लांबसडक, काळेभोर असू शकतात. आपण गोरे असू शकतो, आपली त्वचा नितळ असू शकते. हे आपल्या आई-वडिलांकडून आपल्याला मिळते. पण सौंदर्य हे केवळ तुमच्या बाह्य सौंदर्यावर अवलंबून नसते. तर तुमच्या आतील सौंदर्य हेही तितकेच महत्त्वाचे असते. यामध्ये माणूस म्हणून आपण कसे आहोत हे महत्त्वाचे असते. समाजाचा एक घटक म्हणून आपण समाजाला काय परत करु शकतो, ही माझ्यासाठी सुंदरतेची खरी व्याख्या आहे. आपण इतरांना किती आणि कशी मदत करतो, आपल्यात माणुसकी आहे का या गोष्टी मला सुंदरतेच्या दृष्टीने जास्त महत्त्वाच्या वाटतात. 

४. मनाचं सौंदर्य कसं जपता आणि त्यामागची थॉट प्रोसेस काय आहे? 

शारीरिक आरोग्य, सुंदरता याबरोबरच मानसिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं असते. आपण किती सकारात्मक आहोत, आपल्याकडे पुरेसा आत्मविश्वास आहे का, आपला सेल्फ टॉक काय आहे हे महत्त्वाचे असते. एखादी ठरवलेली गोष्ट मी नक्की करु शकते, माझा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे, या गोष्टी आपले मानसिक आरोग्य कसे आहे हे दर्शवतात. तुम्ही मनाने आतून खंबीर असाल तर तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता, आनंद तुमच्या चेहऱ्यावर नकळत रिफ्लेक्ट होते. या सगळ्या गोष्टी तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर घालतात. 

५. घर, क्लिनिक, मिसेस अर्थची स्पर्धा हे सगळं कसं मॅनेज केलंत? 

लग्न झाल्यावर करियर, काम आणि फॅमिली लाईफ हे सगळ्याच महिलांसाठी ज्याप्रमाणे चॅलेंज असते तसे ते माझ्यासाठीही होते. पण वेळेचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर तुम्ही सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने मॅनेज करु शकता. आपल्याला दिवसभरात असणाऱ्या कोणत्या कामांना किती प्राधान्य द्यायचे हे अतिशय महत्त्वाचे असून त्यानुसार तुम्ही दिवसाचे, आठवड्याचे नियोजन करायला हवे. एखादे काम करत असताना त्या कामात १०० टक्के असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ऑफीसचे काम करताना घरच्या गोष्टींचा विचार आणि घरी असताना ऑफीसच्या कामाचा विचार असे केले तर आपण विशिष्ट कामाला पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे या गोष्टींचे भान राखल्यास तुम्ही वर्कींग वूमन असूनही सगळ्या गोष्टी उत्तम पद्धतीने मॅनेज करु शकता. त्यामुळे नकळतच तुम्ही ताणाचेही व्यवस्थापन करु शकता. 

६. मिसेस अर्थ स्पर्धेविषयी वाचकांना काय सांगाल? 

मिसेस इंडिया अर्थ ही स्पर्धा १६ ते १८ डिसेंबर दरम्यान दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तीन वयोगटांमधील महिलांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येते. ३० वर्षाखालील महिला, ३० ते ४५ वयोगटातील महिला आणि ४५ च्या पुढील वयोगटातील महिला. लग्न झालेल्या महिलांसाठी असणाऱ्या या स्पर्धेत तुमचे टॅलेंट, हार्ड वर्कींग आणि सौंदर्य अशा सर्व बाजूने विचार केला जातो.  समाजातील इतर महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी काही करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. 2016 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते. जगभरातून महिला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येतात. 

७. मिसेस इंडिया अर्थ होण्याआधी आणि मुकुट डोक्यावर आल्यानंतरचा बदल कसा होता? 

मिसेस इंडिया अर्थचा किताब मिळाल्यानंतर आपल्यावर एक मोठी जबाबदारी असल्यासारखे वाटत आहे. अनेक तरुणी, महिलांना तुम्ही छान आहात असे कोणीतरी म्हणावे असे सतत वाटत असते. पण कोणीच असे कौतुक न केल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. मात्र अशा महिलांना मी सांगेन की तुम्ही तुमचा आनंद हा दुसऱ्याच्या कौतुकावर अवलंबून ठेऊ नका. तुमचा आनंद हा तुमच्या आत असू द्या. माझे पालक मला नेहमी सांगतात, तुम्ही आयुष्यात कोणी मोठे व्हा किंवा नाही पण एक चांगला माणूस नक्की व्हा. मी आधी जशी होते तसेच मला आताही राहायचे आहे. या क्राऊनमुळे मिळालेले यश डोक्यात जाणार नाही याची मी पूर्ण काळजी घेणार आहे. 

८. सुंदरतेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना काय सांगाल? 

स्वत:वर प्रेम करा इतकंच मी तरुणींना सांगेन. आपण सुंदर आहोत आणि असणार आहोत हे कायम लक्षात असू द्या. स्वत:ला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. आपण अनेकदा इतरांची काळजी घेता घेता स्वत:वर प्रेम करायला विसरतो. पण जोपर्यंत आपण स्वत:वर प्रेम करणार नाही तोपर्यंत आपल्यात आत्मविश्वास येणार नाही. आत्मविश्वास नसेल तर तो तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या देहबोलीतून दिसून येईल आणि तुमचे समोरच्यावर इंप्रेशन पडणार नाही. त्यामुळे आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारा आणि स्वत:वर प्रेम करा. 

Web Title: Anjali from Pune who is a dentist won the crown of Mrs. India Earth! Dreaming of modeling fulfilled after marriage ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.