Join us  

कायद्याचं शिक्षण घेणारी २१ वर्षांची केरळी तरुणी दर रविवारी चालवते मोफत बस, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 4:59 PM

Ann Mary a 21 Year Old Law Student from Kochi Who Drives Free Bus Every Sunday : अॅन म्हणते, ड्रायव्हिंगबाबत आपल्या मनात कायम पॅशन आहे. मला मोठी आणि अवजड वाहने खूप आवडतात.

ठळक मुद्देआई-वडिल, शेजारी, आजी यांच्या प्रोत्साहनामुळे आपण आपला हा आगळावेगळा छंद जोपासू शकलो असेही अॅन म्हणते. सुरुवातीला लोकांना एक महिला गाडी चालवते हे पचनी पडत नव्हते. ते माझा पाठलाग करुन मला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करायचे.

महिला गेल्या काही वर्षात सोशल टॅबूतून बऱ्याच प्रमाणात बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. पूर्वी पेट्रोल पंपावरील कर्मचारी, रिक्षा, बस चालवणारे, कंडक्टर ही कामे फक्त पुरूष करायची. मात्र आता पुरुषप्रधान मानली जाणारी ही कामे महिलाही अगदी सहज करताना दिसतात. घरातून बाहेर पडत महिला समाजात आपले स्थान निर्माण करण्याबरोबरच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. नुकतेच असेच एक उदाहरण समोर आले असून २१ वर्षांची तरुणी जी कायद्याचे शिक्षण घेत असून ती बस चालवण्याचे काम करते. विशेष म्हणजे ती हे काम आवड म्हणून करत असून ती त्यासाठी कोणताही चार्ज न घेता मोफत सुविधा देते. अॅन मेरी अंसालेन असे या तरुणीचे नाव असून एर्नाकुलम लॉ कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत आहे. दर रविवारी ती Hey Day नावाची बस चालवते. ही बस सर्वात गर्दी असलेल्या कक्कानाड-पेरुम्बदप्पू या मार्गावरुन जाते (Ann Mary a 21 Year Old Law Student from Kochi Who Drives Free Bus Every Sunday). 

(Image : Google)

आपल्या या पॅशनबाबत सांगताना अॅन म्हणते, ड्रायव्हिंगबाबत आपल्या मनात कायम पॅशन आहे. मला मोठी आणि अवजड वाहने खूप आवडतात. ज्यामध्ये लॉरी, ट्रक, बस यांचाही समावेश आहे, त्यामुळे मी मोफत बस चालवते. अॅनने वयाच्या १५ व्या वर्षी गाड्या चालवायला सुरुवात केली. सुरुवातीलाच तिने वडिलांची रॉयल एनफिल्ड चालवली. मात्र गाडी प्रत्यक्ष हातात घ्यायला वयाची १८ वर्षे पूर्ण करावी लागत असल्याने कॉलेजला गेल्यावर प्रत्यक्ष रॉयल एनफिल्ड चालवायला सुरुवात केली. या बसचे ड्रायव्हर बस पेट्रोल स्टेशनवर पार्क करायचे. माझा क्लास झाला की मी ती बस घेऊन घरी यायचे. या बसचे मालक माझ्या घराच्या शेजारीच राहत असल्याने जवळपास ८ महिने असे सुरू होते. सुरुवातीला एक मुलगी पहिल्यांदाच बस चालवते हे पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटायचं. मी अपघात करेन की काय असेही लोकांना वाटायचे. मात्र आता लोकांना या मार्गावर मी बस चालवते त्याची सवय झाली आहे. 

(Image : Google)

सुरुवातीला लोकांना एक महिला गाडी चालवते हे पचनी पडत नव्हते. ते माझा पाठलाग करुन मला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करायचे. त्यातले काही लोक वाईट-वाईट कमेंट करुन माझी छेडही काढायचा प्रयत्न करायचे. मात्र आता मी या मार्गावर नियमित येत असल्याने या मार्गावरील काही ड्रायव्हरशी माझी चांगली मैत्रीही झाली आहे असे अॅन सांगते. अॅन म्हणते, प्रत्येक क्षेत्रात ज्याप्रमाणे चांगले आणि वाईट लोक असतात, त्याचप्रमाणे या क्षेत्रातही आहे. आपले आई-वडिल, शेजारी, आजी यांच्या प्रोत्साहनामुळे आपण आपला हा आगळावेगळा छंद जोपासू शकलो असेही अॅन म्हणते.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीकेरळमहिलाबसचालक