लीना पांढरे
‘‘स्त्री जन्मत: नाही तर घडवली जाते’’ असं सांगणाऱ्या स्त्रीवादी लेखिका सिमोन द बोव्हुआरच्याच फ्रान्स देशात जन्मलेल्या ॲनी अर्नो (Annie Ernaux) या फ्रेंच लेखिकेला यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार नुकताच घोषित झालेला आहे. यंदा साहित्यविषयक नोबेल कुणाला मिळणार, या अपेक्षित यादीत बरीच मोठी नावं होती. नुकताच जीवघेणा हल्ला झालेले सलमान रश्दी, भारतीय लेखक अमिताभ घोष ते एन्गुगी थियांग्वोपर्यंतची नावे चर्चेत होती. पण उजव्या किंवा डाव्या कुठल्याच शासन व्यवस्थेच्या विरोधात जाणं तूर्तास स्वीडिश अकॅडमीने टाळलेले दिसते. पुरस्कार जाहीर झाला तो ॲनी अर्नो या फ्रेंच लेखिकेला. वय वर्षे ८२ असलेल्या या ॲनी आजींची गोष्ट मोठी प्रेरणादायी आहे.
मराठीत विभावरी शिरूरकर यांनी ‘कळ्यांचे नि:श्वास’मधून प्रौढ कुमारिकेच्या लैंगिक गरजांचा प्रथमच खुलेपणाने उच्चार केला होता. त्यानंतर गौरी देशपांडे, मेघना पेठे व कविता महाजन यांच्या साहित्यकृतीत कामपूर्तीसाठी समाजमान्य चौकटी झुगारून देऊन ठामपणे आपल्या आयुष्यात आनंद शोधणाऱ्या नायिका भेटतात. हाच कॅनव्हास अत्यंत विस्तृतपणे आणि विविध आयाम उलगडत ॲनी अर्नोच्या कादंबऱ्यांतूनही साकार होतो. स्त्रीच्या लैंगिकतेचा अपराधमुक्त आणि नीतीनिरपेक्ष भूमिकेतून विचार करून ॲनी आपल्या आयुष्यात जगली. तेच जगणं तिने धारदारपणे तिच्या कादंबऱ्यांतून व्यक्त केलेलं आहे. स्त्रियांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ओढवलेल्या काही प्रसंगांबद्दल मुखर होऊच नये, समाजमान्य चौकटी झुगारून केलेल्या गोष्टींचा उच्चार करू नये, असा स्त्रीच्या लैंगिकतेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अत्यंत रोगट आणि परंपरागत आहे. स्त्रियांच्या अनेक प्रश्नांवरती चर्चा होत असते. मात्र काम जीवनातील कोंडमारा किंवा त्या संदर्भामध्ये तिच्यावर ओढवलेले प्रसंग या विषयांवर थोडक्यात स्वतःच्या लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलणारी किंवा लिहिणारी स्त्री ही उच्छृंखल आणि चारित्र्यहीन मानली जाते.
(Image : Google)
ॲनी स्वतः पीडित. दोन अपत्यांची आई असणारी ही घटस्फोटिता बाई. बालपण, ब्रेस्ट कॅन्सर, दुःखद लैंगिक अनुभव, बेकायदेशीर गर्भपात, विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध या अनवट वाटा धुंडाळत जगली. फ्रान्समधील तत्कालीन समाजस्थिती पुरुषधार्जिणे कायदे फाट्यावर मारून पुढे धाडसाने आपल्या कादंबऱ्यातून व्यक्त झाली. आज वयाच्या तब्बल ८२ व्या वर्षी नोबेल पारितोषिक आणि एक लाख स्वीडिश क्राउन्स म्हणजे ९ लाख १४ हजार ७४० अमेरिकन डॉलरची मालकीण झालेली आहे.
जगातील स्वयंघोषित संस्कृती रक्षकांना दिली गेलेली ही सणसणीत चपराक आहे. १९०१ पासून साहित्यासाठी नोबेल पारितोषिकं दिली जातात, यामध्ये ॲनी फक्त १७ वी स्त्री लेखक आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास फार कमी लेखिकांना हा पुरस्कार लाभलेला आहे.
फ्रान्समधील एका लहानशा गावात निम्नमध्यमवर्गीय खरं तर दारिद्र्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या रोमन कॅथोलिक कुटुंबात ॲनीचा जन्म झाला. कॅफे आणि किराणा दुकान एकत्रित चालवणाऱ्या आई-बापांमधील दाहक संघर्ष प्रसंगही तिने तिच्या कादंबऱ्यांतून व्यक्त केलेले आहेत. आधी शाळा शिक्षिका आणि नंतर विद्यापीठामध्ये साहित्याची प्राध्यापिका, असा तिचा प्रवास झाला. पहिलं पुस्तक तिने तिशीनंतर लिहिलं. त्यामुळे पुरेशी प्रगल्भता त्या लेखनात आलेली होती. १९६३ साली जेव्हा गर्भपात बेकायदेशीर होते त्यावेळेस तिला गर्भपात करून घ्यावा लागला. विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडून वंचना आणि प्रतारणेचे दुःखही तिने सोसले. नंतर १९८० मध्ये दोन अपत्यांची आई झाल्यावर तिचा घटस्फोट झाला आणि या साऱ्याचा मोकळेपणाने आणि विलक्षण प्रामाणिकपणाने इजहार तिने आपल्या कादंबऱ्यांतून केलेला आहे. अत्यंत सोप्या आणि स्फटिकाप्रमाणे नितळ पण थारदार भाषेतून तिने आपल्या आयुष्यात सामोरे जावे लागलेले अपमानास्पद प्रसंग, अवहेलना, चिंता यांना वाट करून दिली आहे. अद्भुतरम्य, काल्पनिक
रोमँटीसिझमची अस्तरं ती धारदार सुरीने छेदत जाते.
क्लीनड आउट ( Cleaned Out) तिची पहिलीच कादंबरी. कॉलेजमधील एका अंधारलेल्या खोलीत सामाजिक दडपणामुळे मनाविरुद्ध केलेल्या बेकायदेशीर गर्भपातामुळे विलक्षण गळून गेलेल्या आणि दुःखी झालेल्या ॲनीचेच चित्रण आलेले आहे. शेम या कादंबरीत वयाच्या बाराव्या वर्षीच लेखिका व्हायचे ठामपणे ठरवलेल्या ॲनीचे चित्रण येते. हॅपनिंग या कादंबरीत २३ वर्षांच्या नायिकेला आपलं बाळ हवं आहे, पण आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सामाजिक रोषाला सामोरे जावं लागेल, म्हणून ती नाइलाजाने गर्भपात करते. या कादंबरीवर चित्रपटही झालेला आहे.
द इयर्स ही कादंबरी फ्रान्समधील समाज जीवनाचा सारांश रेखाटते. लेखिका या कादंबरीत आपल्या बालपणापासून ते प्रौढत्वापर्यंतचा प्रवास चित्रित करते. फ्रान्समधील ग्रामीण भागातील एका लहानशा खेड्यातील कामगारांचे कष्टकरी जीवन तेथून शहरातील कॉलेज लाईफ, विवाह, दोन अपत्यांचा जन्म आणि घटस्फोट इथपर्यंतचा व्यक्तिगत जीवनाचा परिघ रेखाटत असतानाच अत्यंत तटस्थपणे तत्कालीन फ्रान्समधील समाज जीवनाचाही वेध घेतलेला आहे. व्यक्ती आणि समष्टी या दोन्हींचा वेध समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेला असल्याने ही साहित्यकृती फ्रेंच समूहमनाचे प्रतिनिधित्व करते.
गेटिंग लॉस्ट कादंबरीत ॲनी तरुणपणी पॅरिसमध्ये राहत असताना आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या आणि रशियन ॲँबसीमध्ये काम करणाऱ्या एका विवाहित तरुणामध्ये गुंतलेली होती. ती फरफट तिने इथे व्यक्त केलेली आहे. अ गर्ल्स स्टोरी, हे पुस्तक, ॲनीला वयाच्या १८ व्या वर्षी वयाने मोठ्या असणाऱ्या एका पुरुषाकडून जो लज्जास्पद लैंगिक अनुभव प्राप्त झाला, त्या घृणास्पद प्रसंगातच पुढे लेखिका होण्याची बीजं सामावलेली आहेत, असं तिनेच नमूद केलेलं आहे.
तिच्या कादंबऱ्या, तिच्याविषयी वाचताना वाटतं, ॲनी आजी, स्वतःच्या हिमतीवरचं तुझं जगणं, तुझं लढणं, विराट दुःखालाच सहोदर बनवून तुझं भरभरून लिहिणं आणि मग कृतज्ञतेने कुर्निसात करायला तुला मिळालेलं नोबेल पारितोषिक; जगभरातील तुझ्यासारख्याच अविरत लढणाऱ्या आणि जगणाऱ्या आमच्यासारख्या करोडो महिलांना स्फूर्ती देऊन जाईल!
(लेखिका प्राध्यापक आहेत.)