पी. के रोझी. हे नाव आज चर्चेत आहे. गुगलने त्यांना सलाम करत एक खास ड्युडल केले आहे. आणि त्यामुळे पी. के रोझी कोण होत्या याविषयी उत्सुकता वाटणं साहजिकच आहे. पण रोझी हे केवळ एका अभिनेत्रीचं नाव नाही तर ते कलेप्रती समर्पित जीवनाचं नाव आहे. आपल्या कामावर, कलेवर प्रेम असेल तर महिला काय काय सोसतात, सोसलं याचं ते उदाहरण आहे.
मल्याळम सिनेमातल्या पहिल्या अभिनेत्री. दलित समाजातल्या. अत्यंत गरीब परिस्थिती, मजूरीवर गवत कापायला जाणारी ही तरुणी. मात्र नृत्य आणि अभिनय याचं असं गारुड की त्यांनी सिनेमाच्या स्क्रिनपर्यंत धडक मारली. सोपं नव्हतं त्याकाळी एका दलित तरुणीला चंदेरी पडद्यावर झळकणं. मात्र रोझी तिथवर पोहोचल्या. मात्र पहिल्याच सिनेमात उच्चवर्णिय तरुणीची भूमिका केली म्हणून त्यांच्या सिनेमावर दगडफेक झाली. सिनेमाच्या पहिल्या शोला ही त्यांना कुणी बोलावले नाही.
राझी यांचा जन्म १० फेब्रुवारी १९०३ मध्ये त्रिवेंद्रमच्या नंदनकोडे गावात झाला. त्यांचे आई-वडील पुलिया जातीचे होते. त्यांनी तिचे नाव राजम्मा ठेवले होते. दलित कुटूंब, परिस्थिती गरीब. त्यात रोझी लहान होती तेव्हाच वडील गेले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. रोझी यांनी लहान वयातच अभिनय आणि लोकनृत्य-नाटक शिकले. यानंतर त्यांनी १९२८ साली पहिला मल्याळम फीचर फिल्म 'वीगथकुमारन' (द लॉस्ट चाइल्ड) मध्ये काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेसी डॅनियल्स यांनी केले होते. या चित्रपटात त्यांनी सरोजिनी नावाच्या उच्चवर्णीय नायर महिलेची भूमिका साकारली होती. मात्र, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला.
विकीपिडीयावर उपलब्ध माहितीनुसार हा चित्रपट उच्चवर्णीय लोकांनी पाहण्यास नकार दिला होता. जर पीके रोझी प्रेक्षकांमध्ये बसली तर ते चित्रपट पाहणार नाहीत, अशी अट प्रेक्षकांनी घातली. स्क्रिनिंगच्या वेळीही बरीच तोडफोड झाली. निषेधाची आग रोझी यांच्या घरापर्यंत पोहोचली आणि त्यांच्या घराला आग लावण्यात आली. यानंतर पीके रोझी यांनी केरळ सोडले.
राजम्मा - रोजम्मा
ही भयानक घटना घडल्यानंतर रोझी यांनी लॉरी ड्रायव्हरच्या मदतीने त्यांचे गाव सोडले. यानंतर त्यांनी तामिळनाडू गाठले. नंतर त्यांनी लोकनाट्यात काम करायला सुरुवात केली, तिने त्यांचे नाव राजम्मा वरून रोजम्मा केले. पुढील आयुष्य त्यांनी शेती करत दिवस काढले. त्यांना २ मुलं होती. एकाचे नाव पद्मा तर दुसऱ्याचे नागप्पन. मात्र, त्यांना आपली आई अभिनेत्री होती याची कल्पना न्हवती.
जग सोडून गेल्यावर ओळख मिळाली
रोझी हयात असताना समाजाने आदर केला नाही. त्यांनी मात्र जिवंत असताना जमेल त्या प्रकारे कलेची उपासना केली. मात्र, जग सोडल्यानंतर पीके यांना ओळख मिळाली. त्यांचा मृत्यू १९८८ साली झाला. यानंतर १९८८ मध्ये लेखिका वेणू अब्राहम यांनी मल्याळम सिनेमाची पहिली अभिनेत्री पीके रोझी यांच्यावर एक कादंबरी लिहिली. त्यानंतर २०१३ मध्ये याच कादंबरीवर कमलचा 'सेल्युलॉइड' नावाचा चित्रपट आला, ज्याने पीके रोझी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या संघर्षांबद्दल लोकांना समजला.