Join us  

वयाच्या ४७ वर्षी ट्विंकल खन्ना मास्टर्स करायला जाते, तिला जमलं ते खरंच बायकांसाठी इतकं अवघड असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 4:42 PM

ट्विंकल खन्नाने मास्टर्सला प्रवेश घेतला, अक्षय कुमार विनोदानं म्हणालाही की बायकोला कॉलेजात सोडायला आलोय! शिकण्याला वय नसतं मग तरी बायका का कच खातात?

ठळक मुद्देट्विंकलला जे जमलं ते आपल्याला का जमू नये असा विचार तर करुन पहा, शिकायची-स्वतंत्रपणे काही करुन पहायची इच्छा असेल तर अशक्य नाही स्वत:ची स्वप्न पूर्ण करणं..

लोक आपल्या मुलांना लंडनच्या कॉलेजात शिकायला सोडायला येतात, मी बायकोला सोडायला आलोय असा विनोद अक्षय कुमारने केला खरा, पण तो विनोद खरा आहे आणि ट्विंकल खन्नाची शिकण्याची तळमळही. अलिकडेच प्रसिध्द झालेल्या बातम्यांनुसार ट्विंकल खन्ना लंडनला शिकायला गेली आहे. इंग्लंडच्या प्रख्यात गोल्डस्मिथ विद्यापीठात तिने मास्टर्स इन फिक्शन रायटिंग या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. तिचा नवरा अक्षय कुमार आणि मुलं काही दिवस तिच्यासोबत इंग्लंडमध्ये राहिली मात्र आता ते भारतात परतणार आहेत आणि ट्विंकल शांतपणे आपला अभ्यासक्रम तिकडे पूर्ण करणार आहे असं बातम्यांमधला तपशील सांगतो.

(Image : Google)

अत्यंत लोकप्रिय नटाची बायको हीच एकमेव ओळख ट्विंकल खन्नाची नाही. ती स्वत: एकेकाळी अभिनेत्री होती पण हे काम आपल्याला जमणार नाही हे ओळखून तिनं वेळीच त्या क्षेत्राला रामराम केला. नंतर ती अत्यंत उत्तम कॉलम रायटर, लेखक म्हणून प्रसिध्द झाली. तिच्या लिहिण्यातला उपरोधिक विनोद ही तिची खास शैली बनली. मात्र त्यावरच समाधान न मानता जे आपल्याला उत्तम जमतं त्यात अधिक शिक्षण घ्यायचं, स्किल अपडेट करायचे म्हणून ती शिकायलाही रवाना झाली.

(Image : Google)

ट्विंकलचे वय ४७ वर्षे, वयात येणारी दोन मुले, नवरा घर ही जबाबदारी आहेच. मात्र या वयातही आपण शिकायला जायचंच हे धाडस तिनं केलं आहे. ही बातमी वाचून अनेकींच्या मनात आलं असेल की तिला जमू शकतं, आपल्याला कसं जमावं? आपल्यामागे का कमी व्याप आहेत?पण हाच खरा मुद्दा आहे. एक तर वय झालं, लोक काय म्हणतील, आता या वयात काय शिकायचं असं म्हणत अनेकजणी इच्छा असून शिकत नाही.दुसरा मुद्दा मुलं आणि घर कोण सांभाळणार?त्यापायी दोन दिवस माहेरी न जाणाऱ्या, मैत्रिणींच्या गेट टुगेदरलाही न जाणाऱ्या अनेकजणी आहेत. त्याहून काहीजणी एक पाऊल पुढे, माझ्याशिवाय घरात पान हलत नाही. घरच्यांचे हाल होतात असं स्वत:च ठरवून टाकतात आणि घरात बसतात.ट्विंकलला जे जमलं ते आपल्याला का जमू नये असा विचार तर करुन पहा, शिकायची-स्वतंत्रपणे काही करुन पहायची इच्छा असेल तर अशक्य नाही स्वत:ची स्वप्न पूर्ण करणं..

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमार