महिलांनी सामाजिक पातळीवर कितीही चांगली कामगिरी केली तरी प्रश्न उपस्थित केले जातात. ज्या क्षेत्रात लांब लांबपर्यंत महिलांचा वावर नव्हता अशाच खडतर वाटेतून मार्ग काढत कारागृह उपमहानिरिक्षक बनलेल्या स्वाती साठे. महिला दिनाचे (International women's day 2022) औचित्य साधत लोकमत सखीतर्फे (Lokmat Sakhi) #BeTheChange हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज स्वाती (swati Sathe) यांच्याशी या वेगळ्या वाटेवरील प्रवासाबद्दल लोकमत सखीनं दिलखुलास गप्पा मारल्या.
स्वाती साठे सांगतात की, ''माझी नियुक्ती हा महाराष्ट्र शासनाचा मोठा प्रयोगच म्हणावं लागेल. आधी कोणाच्या घरी कोणीतरी गेलंय. म्हणजेच अनुकंपा तत्वावरच महिलांची नियुक्ती होत असे. पण माझ्या बाबतीत असं नव्हतं. तू मुलगी आहेस तू ही नोकरी करू नकोस असं मला घरच्यांनी कधीही सांगितलं नाही. एक एक टप्पे पूर्ण करत जॉईन झाले. नंतर येरवडा जेल सांभाळू शकेन की नाही अशी खूप शंका अनेकांना होती. त्यावेळी स्वत:ला ऑफिसर म्हणून आणि महिला म्हणून सिद्ध करणं खूप अवघड होतं. कारण जर मी पळून गेले तर इतर महिलाही डिमोटिव्हेट होतील. हा एक मोठा संघर्ष होता.' मला या क्षेत्रात टिकून राहायचं होतं. कारण बाकीच्या महिलांना समोर आदर्श राहायला हवा. पुरूषांची तुलना न करता दबदबा तुमच्या कामाचा असायला हवा.''
काम करताना आलेला अनुभव सांगताना स्वाती म्हणाल्या, ''एकदा माझ्याकडे एक महिला आली ती, आत्महत्या करेन असं म्हणायची. अनेकांनी नाटक करत असेल असं म्हणत तिला गृहित धरलं. ती देहविक्रीच्या संदर्भातील गुन्ह्यासंदर्भात कारागृहात होती. तिचा नवरा नव्हता, लहान मुलं घरी होती तणावाखाली येऊन तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. पण जेलचा असा नियम आहे की, जेल बंद झाल्यानंतर कैदी बाहेर काढू शकत नाही. ती महिला साताऱ्याच्या खेड्यात राहत होती, पत्ताही माहीत नव्हता. तिची दोन मुलं खरंच आई घरी येण्याची वाट पाहत होती. अशावेळी मी रिस्क घेत त्या बाईला जेलच्या बाहेर काढलं. हे आहे महिलांचं प्रशासन.''
''गुन्हेगार 'कसाही असला, आतंकवादी किंवा चोर तरी तो वाट चुकलेला माणूस आहे हे लक्षात घ्यायला हवं. आपल्यासारखं वातावरण त्यांना मिळालेलं नसतं. कारागृहातील माणसांसाठी काम करत असताना एक माणूस घडत जाणं ही प्रक्रिया बघणं फार आनंददायी आहे. त्यामुळे कितीही आव्हानं आली तरी महिलांनी नेहमी सकारात्मक राहायला हवं.'' असं मत यावेळी स्वाती साठे यांनी व्यक्त केलं.