नम्रता फडणीस
गोरी, सडपातळ, उत्तम फिगर असा महिलांच्या सौंदर्यांविषयीचा पुरुषी दृष्टिकोन. पुरुष वरवर ‘आम्ही त्यातले नाही’ असे सांगत असले तरी आतून अशाच स्त्री सौंदर्याची इच्छा ते बाळगून असतात; पण ‘ती’ने याच सौंदर्याच्या निकषाला काहीसा छेद देत बॉडी बिल्डिंगचा मार्ग पत्करला. तिला पहिला विरोध झाला तो माहेरच्यांकडूनच. हे काय बिकिनी घालून तू लोकांसमोर जाणार? काय म्हणतील लोकं? असे म्हणत माहेरच्यांनी ‘ती’चा एकप्रकारे उद्धारच केला.‘ती’ने गतवर्षी द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डर्स (आयएफबीबी) प्रो मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून स्पर्धा जिंकली, स्पर्धा जिंकल्यानंतर मागे राष्ट्रीय गीत वाजत असल्याचा व्हिडिओ त्यांनी पाहिला. तेव्हा ‘ती’च्या माहेरच्यांना ‘ती’चा अभिमान वाटला (Body Building Sarina Pani Struggle Story) .
ही कहाणी आहे, प्रसिद्ध बॉडी बिल्डर सरीना पानी हिची. ती मूळची ओडिसाची. इंजिनिअरिंगची पदवी मिळविल्यानंतर इन्फोसिसमध्ये ‘ती’ला नोकरी मिळाली आणि ती पुण्यात आली. ‘ती’चं माहेरचं कुटुंब काहीसं जुन्या विचारसरणीचं आहे. आयटी कंपनीत काम करत असताना सरीनाचा फिटनेसशी कधीच फारसा संबंध आला नाही. नोकरी करणं, वीकेंड एन्जॉय करणं एवढंच ती करायची. लग्नही आयटीमधल्याच तरुणाशी झालेलं, त्यामुळे वैयक्तिक आयुष्य फिटनेसच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर फारसं चांगल नव्हतं. त्याचा आरोग्यावर परिणाम व्हायला लागला.नवऱ्याला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला आणि ‘ती’ला एक धोक्याचा इशारा मिळाला, तेव्हापासून आरोग्याकडे लक्ष देण्यास ‘ती’ने सुरुवात केली आणि ‘ती’च्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
याबाबत सरीना म्हणाली, मी प्रारंभी झुंबा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू सोसायटीत झुंबाचे क्लासेस घ्यायला लागले. संख्या इतकी वाढली की शेवटी मी आयटी कंपनी सोडली. माझ्या माहेरी तोवर कंपनी सोडल्याचे माहिती नव्हते. कंपनी सोडल्यामुळे मला जीमला जायला वेळ मिळायचा. एक वर्ष जीम केले. मग कोरोनामुळे जीम बंद झाले आणि घरातच जीमचे सेटअप केले. शरीरात हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाली. एकदा ट्रेनर म्हटला की, जीमला न जाता तू इतकं करू शकते; मग जीममध्ये शरीर अजून चांगले बनू शकते. मी बॉडी पॉवर वगैरे स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले. डिसेंबरमध्ये अमॅच्युअर ऑलिम्पिया जिंकले. ज्यात केवळ प्रो ॲथलिट्स सहभागी होतात. मी पहिल्याच वर्षात प्रो ॲथलिट बनले. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मी भारताचे प्रतिनिधित्व करते. आज मी फिटनेस कोच म्हणून काम करीत आहे.
बॉडी बिल्डर आणि फिटनेस कोच असलेली सरीना म्हणते...
पदवी घ्या, नोकरी करा आणि लग्न करा.. इतकंच महिलांना शिकविले जाते; पण माझी पॅशन कायम ठेवली. हे सर्व नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे करू शकले. मी आज स्ट्रॉंग वूमन झाले आहे; पण आजही मुली सडपातळ असायला हव्यात असेच लोकांना वाटते. मला मी अशी बनल्याचा अभिमान आहे. साडी परिधान केली तरी माझे स्नायू दिसतात आणि मला ते आवडते.