Join us  

हत्तींच्या लेकरांसह फुललेली बोम्मन-बेल्लीची लव्हस्टोरी! असं प्रेम करता येईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2023 4:50 PM

कशाचीही अपेक्षा न करता केवळ एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणारे बोम्मन-बेल्ली-रघू आणि अम्मू या जगात अजूनही आहेत. जगण्याची उमेद वाटावी असंच हे प्रेम..

ठळक मुद्देबोम्मन, बेल्ली, रघू, अम्मू आहेत अजून जगात, हीच एक आश्वासक गोष्ट आहे.

प्रियदर्शिनी हिंगे

प्रेम करणं नि प्रेम मिळवणं ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. मात्र बऱ्याचदा या प्रेमाला चौकटी बसवलं जातं, प्रेमाचे नियम ठरवले जातात; पण कधीतरी अचानक आपल्यासमोर बिना चाैकट नितळ प्रेम येऊन उभं राहतं आणि आपल्याला तो मोठा चमत्कार वाटतो. तसंच काहीसं एलिफंट व्हिस्परर्स हा माहितीपट पाहून होतं. त्या माहितीपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने त्याची चर्चा होणं साहजिक आहे. अनेकांनी तो आता पाहिलाही असेल. ही कथा आहे बोम्मन आणि बेल्लीची. ते हत्तीवर इतकं प्रेम करतात की जणू ते हत्ती त्यांच्या कुटुंबातील सदस्य असावेत. ते प्रेम इतकं नितळ, सुंदर की आपल्याला त्या प्रेमभावनेचंही आश्चर्य वाटतं की हे सारं इतकं कसं निरागस..तसंच निरागस हे जोडपं. त्यांची ही गोष्ट आहे. बोम्मन आणि बेल्लीची गोष्ट. त्यांच्या हत्तींची गोष्ट.बोम्मन आणि बेल्ली, दोघेही कट्टुनायकर या आदिवासी जमातीचे सदस्य आहेत, ज्यांच्या नावाचा अर्थच ‘जंगलाचा राजा’ असा होतो. अर्थात हत्तींसोबत राहणं वेगळं नी त्यांच्यावर प्रेम करणं वेगळं. तामिळनाडू वनविभागासाठी हे जोडपे काम करतात. बोम्मन व बेल्ली थिओपाकडू असं या दाम्पत्याचं नाव आहे. थेप्पाकडूचे राहणारे, मुदूमलाई जंगलातले. बोम्मन वनविभागात माहूत म्हणून काम करत असत. बेल्लीला मात्र काही काळ जंगली जनावरांची फार भीती वाटत असे. त्यांचा पहिला नवरा वाघाच्या हल्ल्यातच शिकार झाला. त्याच काळात त्यांची हत्ती लेकरांची काळजी घेण्यासाठी म्हणून तात्पुरती नियुक्ती झाली. तिथंच बोम्मन आणि त्या भेटल्या आणि पुढे त्यांनी काही काळानं लग्न केले.

(Image : Google)

थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये सुरू झालेली ही गोष्ट. रघू नावाच्या हत्तीच्या पिलाला कुत्र्यांनी चावलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत या कॅम्पमध्ये आणण्यात आलं. रघूची आई वारलेली होती. त्या लहान हत्तीचा सांभाळ करण्यासाठी बेल्लीला बोलावण्यात आलं. हत्तीची केअर टेकर हा काही त्यांचा व्यवसाय नव्हता. त्यात लहान हत्तींचा सांभाळ करणं हे कामही सोपं नसतं.बेल्ली सांगतात, ‘रघूला सांभाळण्याचं काम माझ्याकडे आलं आणि त्यानं माझं आयुष्यच बदलून टाकलं. मी पहिल्यांदा रघूला भेटले तेव्हा तो माझी साडी खेचत होता. पाहत होता माझ्याकडे अल्लड, अवखळ मुलासारखा. रघूनेच मला आपलं मानलं.’रघूच नाही तर अम्मू नावाच्या हत्तीचाही ते सांभाळ करतात. अम्मू त्यांच्याकडे पाच महिन्यांची असताना आली होती. बेल्ली सांगतात, हत्ती मोठे होतात, वयात येऊ लागतात तेव्हा त्यांच्याशी कठोरपणेही वागावे लागते. कारण हत्ती झपाझप मोठे होत असतात. त्यांना फार सांभाळावे लागते.या रघू आणि अम्मूनेच बोम्मन आणि बेल्ली यांच्यात एक नातं निर्माण केलं. बोम्मन एकटेच होते. बेल्लीने आपला पती आणि मुलगा गमावला होता, त्यांच्यासोबत फक्त त्यांची नात होती आणि आता रघू-अम्मूसह त्यांनी आपलं कुटुंब सुरू केलं. रघू आणि अम्मू यांच्या पालन पोषणातच त्यांचा दिवस जातो. आई जितक्या प्रेमाने धाकाने बाळाला घास भरवते तसेच हे दोघेही त्यांना खाऊ घालतात. प्रसंगी पालकांसारखे रागावताताही.

(Image : Google)

त्यांच्या कहाणीला ऑस्कर मिळाला याचा त्यांना आनंद आहेच. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोम्मन सांगतात, ‘वन विभागात काम करणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येकाला या माहितीपटाने ऑस्कर जिंकल्याचा आनंद आहे. आम्ही आदिवासी, मुदूमलाई व्याघ्र प्रकल्पात हत्तींची देखभाल करणारी ही माझी तिसरी पिढी. माझ्या आजोबांनी, वडिलांनी जे काम केलं तेच मी करतोय. मी सुमारे ४० वर्षांपूर्वी या जंगलात आलो. २०१७ मध्ये रघू आला, त्याचा जीव वाचेल असं कुणालाच वाटलं नव्हतं; पण मला खात्री होती की हा जगेल, जगायला हवा त्यासाठी आम्ही जमेल तसे प्रयत्न केले.’आता वयानं आणि शरीरानं चांगले वाढलेले रघू व अम्मू दोघेही बोम्मन आणि बेल्लीबरोबर राहत नाहीत. त्यांना वेगळ्या लोकांकडे सोपवण्यात आले आहे. बोम्मन आणि बेल्लीही आता थिओपाकडू अभयारण्यातून पुढे गेले आहेत. बोम्मन आता पश्चिम तामिळनाडूमधील धर्मापुरी येथे दोन हत्तींच्या बछड्यांची काळजी घेत आहेत. बेकायदेशीर वीज कुंपणाला झटका लागून ज्यांच्या हत्तीणी आया मृत्युमुखी पडल्या. त्या अनाथ लेकरांची काळजी आता ही दोघे घेतात. आपल्या गोष्टीला ऑस्कर मिळाला, हे त्यांना कळलंच आहे. मात्र, त्याचंही त्यांना फार अप्रूप नाही असं त्यांच्या माध्यमातल्या मुलाखतीत दिसतं. त्यांना मोलाचं आहे ते त्यांचं हत्तींवर आणि हत्तींचं त्यांच्यावर असलेलं प्रेम..ते प्रेमच हत्तीहून मोठं आहे..बोम्मन, बेल्ली, रघू, अम्मू आहेत अजून जगात, हीच एक आश्वासक गोष्ट आहे.

priya.dhole@gmail.com(लेखिका महिला प्रश्नांच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :ऑस्करप्रेरणादायक गोष्टी