स्कॉटलँडमधील ग्लासगो येथे नुकतीच एक पर्यावरणविषयक परिषद COP26 पार पडली. नेहमीप्रमाणेच या परिषदेत बदलते हवामान, भविष्यातील पर्यावरणविषयक धोके, नवी आव्हाने अशा सर्व बाजूंनी चर्चा झाली. पण या सगळ्या चर्चांची केंद्रबिंदू ठरली ती भारताची अवघी १५ वर्षांची चिमुरडी. प्रिन्स विल्यम्स यांनी जिचं कौतूक केलं. जगभरातील नेते जिच्या भाषणाने अवाक् झाले, अशी ही १५ वर्षांची विनिशा उमाशंकर नेमकी आहे, तरी कोण, असा प्रश्न सध्या जगभरात चर्चिला जात आहे. भारताची ग्रेटा थनबर्ग अशी तिची नवी ओळखही निर्माण झाली आहे.
विनिशा उमाशंकर ही मुळची तामिळनाडूची. इको ऑस्कर म्हणून जो पुरस्कार ओळखला जातो, त्या प्रिन्स विल्सम्स यांच्या अर्थशॉट पारितोषिकाची ती अंतिम स्पर्धक. विनिशा केवळ १५ वर्षांची आहे. पण पर्यावरण आणि त्यासंबंधीचे तिचे विचार अतिशय परिपक्व असून पर्यावरण संवर्धनासाठी काय करावे आणि कसे करावे, याविषयीची तिची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. एवढ्या लहान वयात तिला आलेली समज पाहून आणि तिचे मुद्देसूद भाषण ऐकूनच COP26 परिषदेत सहभागी झालेले जगभरातील सगळे नेतेही अचंबित झाले होते. अवघे चार मिनिटांचे तिचे भाषण. पण त्या भाषणाची चर्चा मात्र जगभर होत आहे. प्रिन्स विल्यम आणि उद्योजक आनंद महिंद्रा या दोघांनीही तिच्या भाषणाविषयी तिच्याविषयी ट्विट केले आहे, ही खरोखरंच कौतूकाची बाब.
विनिशा आहे तरी कोण?२००७ साली जन्मलेली विनिशा तामिळनाडूतील तिरूवन्नामलाई शहरातील एका शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिकते. तिचे वडील बिझनेस कन्सलटंट असून आई शिक्षिका आहे. COP26 परिषदेत केलेले भाषण आणि Solar Iron Cart याविषयावरील तिचा अभ्यास या दोन गोष्टींसाठी ती ओळखली जाते.
भाषणात काय म्हणाली विनिशा....आपल्या भाषणादरम्यान मुद्दे मांडताना विनिशा म्हणाली की पर्यावरण विषयक अनेक चर्चा होतात आणि पुढेही होतील. पण आता जर तुम्हा सगळ्या नेत्यांना आमच्या पिढीसाठी खरोखरंच काही करावे, असे वाटत असेल तर बोलणे थांबवा आणि करणे सुरू करा, असे कळकळीचे आवाहन तिने केले. repair the planet म्हणजेच ग्रह दुरुस्ती हा मुद्दा विनिशाने तिच्या भाषणात मांडला. ग्रहाची दुरुस्ती करायची म्हणजे नेमके काय करायचे, कोणते नवे उपाय त्यासाठी राबवायचे, असे अनेक मुद्दे तिने भाषणातून स्पष्ट केले. मी फक्त भारतातली नाही. मी पृथ्वीची मुलगी आहे, असे तिने सांगताच तिचा पर्यावरण विषयक व्यापक दृष्टीकोन दिसून आला. जगभरातील अनेक नेत्यांनी स्तब्ध होऊन तिचे सगळे मुद्दे ऐकून घेतले.
तिचे भाषण संपताच प्रिन्स विल्यम यांनी जोरदार टाळ्या वाजवून तिचे कौतूक केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी विनिशाचे कौतूक करणारा एक छान संदेश लिहिला आणि तो सोशल मिडियावर पोस्ट केला. विनिशाला जागतिक व्यासपीठावर बोलताना पाहून अभिमान वाटतो. ती जगभरातल्या नेत्यांकडून बदलाची अपेक्षा करत आहे, असा बदल झाला तरच तिच्या पिढीला चांगले भविष्य मिळू शकेल, हा तिने मांडलेला मुद्दा बरोबर असल्याचेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे.
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी देखील विनिशाच्या भाषणाचा व्हिडियो पाहिला आणि "ब्रिलियंट" अशा शब्दांत विनिशाचे कौतूक केले. विनिशाला एका आंतरराष्ट्रीय परिषदेत अतिशय आत्मविश्वासाने स्वत:चे मुद्दे मांडताना बघणे, ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचेही त्यांनी ट्विट केले आहे.