Join us  

#BreakTheBias : 'जाड आहोत म्हणजे सुंदर नाही, असं नसतं!'- विशाखा सुभेदार सांगतात, एक सुंदर गोष्ट..

By सायली जोशी | Published: March 06, 2022 6:16 PM

#BreakTheBias : गुणवत्ता-पॅशन आणि सौंदर्याचे चुकीचे मापदंड याविषयी विशाखा यांनी लोकमतसखीशी अतिशय मनमोकळेपणाने उत्तरे देत या चौकटीतील विचारसरणीविषयी अतिशय थेट भाष्य केले.

ठळक मुद्देजाडेपणामुळे न्यूनगंड बाळगता कामा नये असे आम्हाला तुमच्याकडे पाहून वाटते, असे महिलांनी सांगितल्यावर मला अभिमानास्पद वाटते असे त्या म्हणतात. मनोरंजन क्षेत्रात किंवा अभिनय क्षेत्रात काम करताना तुमचं दिसणं जितकं महत्त्वाचं तितकीच तुमची गुणवत्ता महत्त्वाची असते.

सायली जोशी-पटवर्धन

मनोरंजन क्षेत्र त्यातही अभिनेत्री म्हटलं की तुमच्याकडे छानशी फिगर हवी, तुम्ही गोरेगोमटे हवे किंवा तुमचे केस छान मुलायम आणि लांबसडक हवे अशी साधारण कल्पना असते. अभिनेत्रींकडे प्रेक्षक म्हणून पाहण्याचा आपला दृष्टीकोनही काहीसा तसाच असतो. पण मराठी मनोरंजन सृष्टीत आजही निर्मिती सावंत यांच्यापासून ते विशाखा सुभेदार यांच्यापर्यंत अनेक अभिनेत्री अशा आहेत की ग्लॅमरच्या जगाने ठरवलेली सुंदर फिगर नसताना त्यांनी आपल्या गुणवत्तेवर आणि अभिनयाच्या जोरावर या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. विनोदी अभिनेत्री म्हणून खास ओळख असलेल्या विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) यांच्याशी गुणवत्ता-पॅशन आणि सौंदर्याचे चुकीचे मापदंड (BreakTheBias) याविषयी संवाद साधला. त्यावेळी विशाखा यांनी अतिशय मनमोकळेपणाने उत्तरे देत या चौकटीतील विचारसरणीविषयी अतिशय थेट भाष्य केले.

१. मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींची एक विशिष्ट इमेज असते, ती इमेज व्यावसायिक स्तरावर तुम्ही तोडली, हा प्रवास कसा होता?

- लहानपणापासून मी नेहमी गोलमटोलच होते. आपलं जाड असणं हे मला कधीच न्यूनगंडाचे वाटले नाही. बारीक असल्यावर मी सुंदर दिसले असले असं मला कधीच वाटलं नाही. मी जाड असले तरी कायम सुंदरच होते. मी लहानपाणापासूनच टॉम बॉय या कॅटेगरीत मोडणारी असल्याने मला जाडीचा फारसा फरक कधीच पडला नाही. उलट मी जाड असूनही मी अनेक वर्ष जिमनॅस्टीक्स करायचे. त्यानंतर खोखो, कबड्डी यांसारख्या मैदानी खेळांमध्येही मी पुढे असायचे. त्यामुळे आपण जाड आहोत म्हणून काहीतरी वेगळं आहे असं मलाही कधी वाटलं नाही आणि माझ्या पालकांनीही मला ते कधी वाटू दिलं नाही. 

(Image : Google)

२. वैयक्तिक आयुष्यात जाडेपणाची कधी अडचण वाटली का?

- माझा प्रेमविवाह असल्याने माझ्या लग्नाच्या बाबतीत माझी शरीरयष्टी कधीच मधे आली नाही. लग्नानंतर नवरी मुलगी सशक्त आहे असे म्हटले गेले. पण मी जाड मुलींवर कोणी प्रेम करु शकत नाही असं नाही. तर माझ्या नवऱ्याला मी जशी होते तशी आवडले आणि आजही आवडते. पण अॅरेंज मॅरेजमध्ये आजही आपल्याकडे मुलीचा जाडेपणा, वर्ण, तिचे दिसणे याला खूप महत्त्व दिले जाते. पण ,सुदैवाने लव्ह मॅरेज असल्याने मला माझी शरीरयष्टी ही कधी अडचण ठरली नाही. इतकंच नाही तर मी मुंबईत राहत असल्याने ट्रेनचा प्रवास हा तर अटळच होता. मी जाडी असूनही बरेच सामान घेऊन ट्रेनने अनेक वर्ष अतिशय व्यवस्थित प्रवास केला आहे, तिथेही मला काही अडचणी वाटली नाही. 

३. करीयरमध्ये तुम्ही स्वत:ला कसं सिद्ध केलंत? 

- मी करीयरमध्ये किंवा मनोरंजन क्षेत्रात आले ती जाड फिगरमध्ये असतानाच आले. त्यामुळे मी आधी खूप बारीक होते आणि मग जाड झाले असं काही झालं नाही. सुरुवातीपासून लोकांनी मला मी जशी आहे तसं स्वीकारलं, त्यामुळे मला जाडेपणामुळे खूप संघर्ष करावा लागला असं नाही. प्रेक्षकांनी आणि दिग्दर्शकांनी मला आहे तसं स्वीकारलं. मी जशी आहे तसं मला स्वीकारलं यामुळे मला जाडेपणा हा अडसर न वाटता ते माझे वेगळेपण आहे असं मला वाटतं. 

४. कोणत्या भूमिका आजही साच्यात घातल्यासारख्या मांडल्या जातात असे वाटते? 

- कोणत्याही सिरीयलमध्ये आई दाखवायची असेल की ती गरीब बिचारी दाखवायची असते. तिची तशी प्रतिमा उभी करायची असेल तर ती स्त्री बारीक असावी लागते असा सामान्य समज आहे. जाड स्त्री गरीब-बिचारी असू शकत नाही असं आजही आपल्या डोक्यात फिट असतं. त्यामुळे माझा आईच्या भूमिकेसाठी विचार केला जात नाही. तर जाडेपणामुळे गरीबबिचारेपण अभिनयातून दाखवता येत नाही याची खंत वाटते.  

५. प्रेक्षकांना तुमच्या जाडेपणाविषयी काही प्रतिक्रिया दिली असा अनुभव कधी आला का? कोणता? 

- मी जशी आहे तसे प्रेक्षक माझ्यावर प्रेम करत असले तरी सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी काही सल्ले आवर्जून येतात. यामध्ये मॅडम तुम्ही बारीक झालात तर छान दिसाल, तुम्ही थोड्या बारीक व्हा, बारीक होण्यासाठी डाएटचा हा उपाय करुन करुन पाहा असे सल्ले लोक देतात. पण अनेक जण जशी तू आहेस तशीच आम्हाला आवडतेस असेही अनेक प्रेक्षक आवर्जून सागंतात. इतकंच नाही तर आम्ही तुमच्याकडून प्रेरणा घेतो असे सांगणाऱ्याही स्त्रिया आहेत. जाडेपणामुळे न्यूनगंड बाळगता कामा नये असे आम्हाला तुमच्याकडे पाहून वाटते. त्यामुळे अशाप्रकारच्या प्रतिक्रिया ऐकून आपण कोणासाठी तरी इन्स्पिरेशन ठरतोय याचे चांगले वाटते. 

(Image : Google)

६. जाडेपणामुळे तुमची काही वेळा खिल्ली उडवली गेली त्याबद्दल काय सांगाल? 

- नाटकांमध्ये स्त्री जाडी आणि तिचा नवरा बारीक अशाच व्यक्तिरेखा लिहील्या जातात. आताच नाही तर अनेक वर्षांपासूनचा हा ट्रेंड आहे. विनोदासाठी हा ट्रेंड वापरला जातो, पुरुषांचा जाडेपणा हा तुलनेने कमी पण बायकांचा जाडेपणा जास्त प्रमाणात वापरला जातो. याबद्दल मला वाईट वाटत नाही, कारण तो एक विनोदाचा भाग आहे आणि आपण त्याकडे त्याचदृष्टीने पाहायला हवे. पण माझ्या जाडेपणावर जेव्हा बोललं जायचं तेव्हा सुरुवातीला मी खट्टू व्हायचे. सतत जाडेपणावर, कोणाच्या शरीरयष्टीवर का बोलता असे वाटायचे. पण आता मला त्या प्रकारच्या गोष्टींवर कशा प्रतिक्रिया द्यायच्या, असं बोलणाऱ्या लोकांना कसं टोलवायचं याचा अंदाज आला. आता मला जाडेपणाविषयी आत्मविश्वास आला आहे.  

७. दिसणे आणि गुणवत्ता, तुम्ही कसे पाहता याकडे?

- मनोरंजन क्षेत्रात किंवा अभिनय क्षेत्रात काम करताना तुमचं दिसणं जितकं महत्त्वाचं तितकीच तुमची गुणवत्ता महत्त्वाची असते. तुमच्याकडे फिगर, गोरा रंग आणि रुप असेल पण तुम्हाला अभिनयच येत नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे शरीराबरोबरच तुमच्याकडे अभिनयाच्या बाबतीत गुणवत्ता असणे महत्त्वाचे आहे, अभिनय क्षेत्रातील ती सर्वात मोठी गोष्ट आहे, तुमच्या क्षेत्राविषयीचा अभ्यास, त्यातील गुणवत्ता असणं गरजेचं आहे.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीजागतिक महिला दिन