आता इ-पासपोर्ट येणार, पुढच्यावर्षीपासून. त्या इ -पासपोर्टमध्ये चीप बसवलेली असणार आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी, बायमोमेट्रिक्स आयडेंण्टिफिकेशन याद्वारे फ्युचर टेक्नॉलॉजीने ते अद्ययावत असणार अशी बातमी या बजेट -२०२२ मध्ये तुम्ही एव्हाना वाचलीच असणार. पासपोर्ट काढणेही आता सोपे झाले आहे आणि येत्याकाळात ते अधिक सोपे, टेकफ्रेण्डली होण्याची चिन्हं आहेत. आता पासपोर्ट काढायचा तर एजण्टची गरज नाही आपल्याआपण ऑनलाइन अर्ज भरुन, पैसे भरुन पासपोर्टची अपॉइण्टमेण्ट बूक करु शकतो. मात्र बजेटने अगदी इ-पासपोर्टची जरी अनाऊन्समेण्ट केलेली असली तरी मुख्य मुद्दा आणि प्रश्न असा आहे की, आपल्याकडे किती महिला स्वत:चा पासपोर्ट हवाच यासाठी आग्रही असतात. अगदी वर्किंग वूमनही? संधी आली विदेशात जाण्याची पण पासपोर्ट नाही अशी अनेकींची अवस्था असते. घरात नवऱ्याचा किंवा भावाचा पासपोर्ट काढलेला असतो पण स्त्रियांचा नसतो असं चित्र दिसतं? पासपोर्ट काढण्यासंदर्भात इतकी उदासिनता का?
(Image : google)
तुम्ही काढलाय का पासपोर्ट? न काढण्याची काय कारणं?
१. मुळात आपण कुठे लगेच परदेशात जाणार आहोत, आपल्याला कुठं परदेशी जाऊन करिअर करायचं आहे, आपण कुठं फिरायला जाणार आहोत असे प्रश्न स्वत:लाच विचारत त्यांची नकारात्मक उत्तरं देण्यातच अनेकींचा वेळ जातो.
२. आपण मोठी स्वप्न पाहू, कधीतरी परदेशी फिरायला जाऊ असंही स्वत:विषयी वाटण्याचा आत्मविश्वास कमी असतो. स्वत:ला दुय्यम महत्त्व देण्याची मानसिकता दिसते.
३. अनेकींना हे काम किचकट वाटतं आणि काही चुकलं तर काय याची भीती वाटते, कागदपत्रांचं जंजाळ असेल असंही भय वाटतं.
४. सगळ्यात सोपं कारण म्हणजे लग्न झाल्यावर काढू असा एक विचार असतो. कारण का तर लग्नानंतर नाव बदलावं लागेल, मग कशाला आधी पासपोर्ट काढा.
(Image : google)
लग्नानंतर पासपोर्टवर नाव बदलणं सक्तीचं नाही, माहेरचं नाव लावता येतं..
२०१७मध्येच केंद्र सरकारने असा निर्णय घेतला की पासपोर्ट करताना विवाहित महिलेलाही सासरचे नाव पासपोर्टवर लावण्याची सक्ती नाही. मॅरेज सर्टिफिकेट देण्याचीही सक्ती नाही. नाव बदलण्याची कोणतीच सक्ती पासपोर्ट काढताना व्यवस्था करत नाही.
त्यामुळे पासपोर्ट काढणंही सोपं आहे, ते आता ऑनलाइन अधिक सोपं होतं आहे. पासपोर्ट हे प्रत्येक नागरिकाचं एक महत्त्वाचं डॉक्युमेण्ट आहे, त्यामुळे ते आपल्याकडे असायलाच हवं. नव्या काळात तर ते अधिक महत्त्वाचं आहे.