फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस सगळ्यांसाठीच उत्सुकतेचा असतो याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी देशाचा अर्थसंकल्प जाहिर केला. यामध्ये विविध क्षेत्रांशी आणि घटकांशी निगडीत बऱ्याच महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांच्या दृष्टीने यामध्ये एक अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आली आणि ती म्हणजे लखपती दीदी योजना. आताच्या अर्थसंकल्पात लखपती दीदी योजनेची व्याप्ती दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला होता (Budget 2024 special Lakhpati Didi Yojana scheme) .
काय आहे लखपती दीदी योजना?
याअंतर्गत विविध कार्यशाळा घेण्यात येणार असून या कार्यशाळांमध्ये अर्थसंकल्प, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक साधने समजून घेणे यासारख्या विषयांचा समावेश आहे. लखपती दिदी योजनेंतर्गत, महिलांना नियमित बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग, शिक्षण किंवा इतर गरजांसाठी छोटी कर्जे दिली जातात. डिजिटल बँकिंग सेवा, मोबाईल वॉलेट आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म कसे वापरायचे हे शिकण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
आर्थिक फायद्यांव्यतिरिक्त ही योजना विविध सक्षमीकरण कार्यक्रमांद्वारे महिलांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण करण्यावर देखील लक्ष केंद्रित करते. महिलांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सकारात्मक परिणाम व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. उद्योजक झालेल्या महिलांना बिझनेस प्लॅन्स, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आणि मार्केट ऍक्सेसमध्ये मदत करणे समाविष्ट आहे. आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महिलांना परवडणारे विमा संरक्षण देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळते.