Lokmat Sakhi >Inspirational > पुन्हा पुन्हा होणारा कॅन्सर आपली परीक्षा पाहतो; पण न हरता, न रडता -हिमतीने जगलं तर पाहिजेच..

पुन्हा पुन्हा होणारा कॅन्सर आपली परीक्षा पाहतो; पण न हरता, न रडता -हिमतीने जगलं तर पाहिजेच..

उमेद कॅन्सर पेशंट सपोर्ट ग्रुप : कॅन्सरसारखा आजारात हिमतीने पतीची साथ देणाऱ्या एका जिगरबाज केअरगिव्हर पत्नीचे मनोगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 05:15 PM2023-08-22T17:15:04+5:302023-11-07T14:40:15+5:30

उमेद कॅन्सर पेशंट सपोर्ट ग्रुप : कॅन्सरसारखा आजारात हिमतीने पतीची साथ देणाऱ्या एका जिगरबाज केअरगिव्हर पत्नीचे मनोगत

cancer and support, caregiver wife shares story of courage! Umed cancer patient support group Nashik initiative | पुन्हा पुन्हा होणारा कॅन्सर आपली परीक्षा पाहतो; पण न हरता, न रडता -हिमतीने जगलं तर पाहिजेच..

पुन्हा पुन्हा होणारा कॅन्सर आपली परीक्षा पाहतो; पण न हरता, न रडता -हिमतीने जगलं तर पाहिजेच..

Highlightsमी सगळ्यांना पॉझिटिवली आयुष्य जगण्याचाच सल्ला देते.

सरोज आनंद अग्रवाल

मी नाशिकमध्ये राहते. १९९० मध्ये माझे आनंद बरोबर लग्न झाले. १९९१ मध्ये माझ्या मोठा मुलाचा जन्म झाला. दुसरा मुलगा १९९५ मध्ये झाला. मी आणि माझे यजमान छानपैकी पालकत्व एन्जॉय करत होतो. पुढे आमच्या धंद्यात थोडा प्रॉब्लेम आला, मी माझ्या नवऱ्याला कामात मदत करू लागले आणि आमची गाडी परत बऱ्यापैकी रुळावर आली. आम्ही खूप सुखी समाधानी आयुष्य जगत होतो. २०१२ मध्ये आनंदची दाढ दुखू लागली.  त्रास वाढत गेला. आमचे दाताचे डॉक्टर राहुल पाटील यांनी डॉक्टर राज नगरकर, मानवता क्युरी हॉस्पिटलमध्ये दाखवण्याचा सल्ला दिला. त्यांनी बायोप्सी करण्याच्या आधीच यांना  हंड्रेड परसेंट कॅन्सर आहे, असं निदान केलं. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही ताबडतोब ऑपरेशनचा निर्णय घेतला.
आनंदचा कॅन्सरचे निदान झाल्यावर माझ्या माहेरी, सासरी आणि मित्र परिवाराला मोठा झटका बसला. माझ्या भावाने महामृत्युंजयचे जप केले, पुणे आणि खामगावच्या डॉक्टरकडून सेकंड ओपिनियन घेतला. आमचा मित्रपरिवार खूप मोठा आहे त्यांनी या कठीण काळात आम्हाला खूप आधार दिला.
मी कणखर दिसते, थोडी प्रॅक्टिकल पण आहे, पण स्वतःच्या घरात असा आजार खूप यातनादायक आहे. प्रत्येक केमोच्या वेळेस आनंदला खूप यातना होत होत्या. त्यावेळेस माझे भाऊ, बहीण, मित्र आळीपाळी ने काळजी घ्यायचे. आजाराच्या समांतर आयुष्यात बऱ्याच गोष्टी चालू राहतात. आयुष्यात चढ-उतार येत राहतात आणि दिवस सारखे राहत नाहीत. प्रत्येक वेळेस जिंकण्यासाठी खेळायचं असतं पण प्रत्येक वेळेस आपण जिंकू शकत नाही. पण परत परत प्रयत्न करत राहणे आणि आपले सगळे प्रयत्न करणे हेच आपण करू शकतो. गोष्टी हातात नाही आणि आपले सर्व प्रयत्न फोल ठरतात, ती वेळ खूप वेदनादायक आणि केविलवाणी असते.

अशा वेळेस अनुभवाचा कस लागतो. वर्षानुवर्ष चालणारा आजार पेशंट आणि घरच्या लोकांची दमछाक करतो. शारीरिक थकवा आणि केमोचे बरेच साईड इफेक्टस् असतात, त्यावेळेस आम्ही त्यांचा शारीरिक त्रास कमी करू शकत नाही, पण त्यांची मानसिक ताकद कशी वाढवता येईल हे बघणं खूप महत्त्वाचं आहे.
सारखा सारखा कॅन्सर होणाऱ्या पेशंटला त्रास खूप असतो. आनंदला पुनः २०१९ मध्ये कॅन्सर होऊन गेला. आणि सप्टेंबर २०२२ मध्ये आनंदला परत कॅन्सरचे निदान झाले. आम्ही पहिल्यापेक्षा खूप जास्त घाबरलो. आम्ही शांतपणे विचार केला आणि डॉक्टर राज नगरकर, डॉक्टर किरण पाटील, डॉक्टर सुलतान (मुंबई), डॉक्टर पंकज चतुर्वेदी (टाटा हॉस्पिटल, मुंबई) या सगळ्यांचे सेकंड ओपिनियन घेतले.  आनंदचा तोंडाचा कॅन्सर ऑपरेटेबल नव्हताच. आधीचे दोन ऑपरेशन्स, केमो आणि रेडिएशन मुळे ऑपरेशन करण्याची कंडिशन नव्हती. आम्ही, खास करून आनंदनी इम्युनिओथेरपीचा पर्याय निवडला. आम्हाला एक अनुभव खूप छान आला, मानवता क्युरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर निष्ठा पालेजा ह्यांनी खूप छान गायडन्स दिला.  जे झालं त्यापेक्षा आता तुम्ही तुमचे आयुष्यमान कसे सुधारू शकता, या गोष्टीवर खूप भर दिला पाहिजे. तुमचे रिपोर्ट काय आहे ते महत्त्वाचं नाहीये, तर तुम्ही गोष्टीला कशाप्रकारे प्रतिसाद देता ते महत्त्वाचं आहे!
आता आनंदची इम्युनिओथेरपी डॉक्टर श्रुती काटे ह्यांच्या देखरेखी खाली सुरू आहे. त्याचे रिपोर्टस् छान, पॉझिटिव्हली येत आहेत. आयुष्याचा प्रवास आपल्याला बेधुंद जगायला शिकवतो. आणि कॅन्सर सारखा आजार झाला की तो हातातून हळूहळू निसटून जातो. आपण विचार करत राहतो किंवा कृतीतून आपले आयुष्य घडवतो. हा प्रवास नुसता आपला नसतो, आपल्या अवतीभवती असणाऱ्यांचा पण असतो, जसे नातेवाईक, शेजारी, ओळखी आणि अनोळखी लोकांचा पण असतो, कारण आपली प्रकृती आपल्याला जगायला शिकवते. 
केअर टेकर च्या भूमिकेतून मी काही गोष्टी सांगू इच्छिते.
१. झोप 
सूर्योदयाला उठणे आणि रात्री लवकर झोपणे पेशंट साठी आणि तुमच्यासाठी पण, खूप महत्वाचे आहे. चांगली झोप, शरीराचा थकवा, काळजी आणि आजार कमी करण्यात ह्याची खूप मदत होते.
२. पाणी पिणे
आजाराच्या आणि औषधांच्या माऱ्यातून शरीराला बाहेर काढण्यासाठी व्यवस्थित प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
३. खानपान
कॅन्सर पेशंट साठी जेवण हा खूप कठीण आणि त्रासदायक विषय आहे, काही पेशंट्सवर औषधाचे दुष्परिणाम जास्त असू शकतात ज्यामुळे पेशंटची इच्छा असली तरी तो कोऑपरेट करू शकत नाही. ही गोष्टी घरच्यांसाठी आणि पेशंटसाठी खूप कठीण होते. जेव्हा केमो किंवा रेडिएशन असते त्यावेळेस खूप त्रास होतो. तुमच्या दिनचऱ्ये मध्ये आजारी असतांना जेवणाचा सगळ्यात वरचा क्रमांक आहे. जे पेशंट फास्ट फूड, गोड, अति तिखट, खारट किंवा शिळे अन्न घेतात, त्यांच्या तब्येतीवर औषधांचा परिणाम व्हायला सहकार्य मिळत नाही. अशावेळी आजारामध्ये, तब्येत खराब व्हायची खूप शक्यता असते. जेवणामध्ये राजगिरा, नागली, मध, गाईचे तूप, सूप, ज्यूस आणि ताजे जेवण औषधाइतकेच परिणामकारी आहे.
काळजी करणं आणि रडत बसणं किंवा सारखी आजाराची चर्चा करणे हा काही आजारावर उपाय नाही. चांगले डॉक्टर भेटणं हे देव भेटण्या सारखेच आहे. आमचा अनुभव आहे, वाईट काळात बरेच लोक बरेच सल्ले देतात, बऱ्याच पॅथी आणि भोंदू बाबा सजेस्ट करतात त्यामुळे वेळ वाया जातो आणि पैसा पण वाया जातो, आणि कधी कधी पेशंट पण हातातून जाऊ शकतो. मी सगळ्यांना पॉझिटिवली आयुष्य जगण्याचाच सल्ला देते.

Web Title: cancer and support, caregiver wife shares story of courage! Umed cancer patient support group Nashik initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.