सई बांदेकरउमेद .. जगण्याची, उमेद .. जगविण्याची! आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या उमेदीच्या बळावर आपण कितीतरी अवघड परिस्थितींचा सामना करत असतो. उमेद! ह्या शब्दातच किती पॉझिटिवीटी आहे ना? आम्ही पण या उमेदीच्या जोरावरच, कॅन्सरचा सामना करून आलो आहोत. कॅन्सरचे निदान, ऑपरेशन, केमोथेरेपी, रेडीएशन, ह्या सगळ्या अनुभवातून आम्ही गेलो आहोत. त्यावेळी असणारी आमची स्वतःची आणि आमच्या जवळच्या लोकांची मानसिक अवस्था अनुभवली आहे. भीती, काळजी, चिंता, राग, अशा अनेक भावनिक अवस्था आम्ही अनुभवल्या आहेत. आणि त्यातूनच आम्ही ठरवलं एक उपक्रम सुरु करायचा. HCG मानवता कॅन्सर सेंटर आणि उमेद पेशंट सपोर्ट ग्रुप असं त्याचं नाव.
कॅन्सरसह जगण्याचा प्रवास सोपा नसतोच. पण या प्रवासात आम्हाला साथ होती प्रख्यात डॉक्टर राज नगरकर, डॉक्टर श्रुती काटे, त्यांचे इतर सहकारी डॉक्टर आणि आमची काळजी घेणारा सपोर्ट स्टाफ. त्यांच्या शब्दांनी आणि सहवासाने आमचे मनोबल उंचावत असे. तसंच, इतर पेशंटस, आणि त्यांचे नातेवाईक, हे पण आमचे सोबती होते. कॅन्सरची ट्रीटमेंट ही इतर आजारांपेक्षा थोडी लोंग-टर्म असते. केमोथेरेपी, रेडीएशन यासाठी, सातत्याने हॉस्पिटल मध्ये यावे लागते. या सगळ्याचा ताण पेशंट सोबत, त्यांचे केअर गिव्हर्स, म्हणजेच नातेवाईक, यांच्यावर देखील पडत असतो. पण ते धीराने परिस्थितीला सामोरे जात असतात.त्यांना वेगवेगळे प्रश्न पडत असतात, पण कोणाला विचारावे ह्या संभ्रमात ते असतात. कारण, डॉक्टरांना जास्त प्रश्न विचारायला बऱ्याचदा थोडा संकोच वाटतो. अशा वेळेस, कोणी समोरून धीराचा हात पुढे केला की थोडा दिलासा मिळतो.
आम्ही ह्या प्रवासातून गेलो आहोत.
त्या अनुषंगाने येणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणी, त्रास, मानसिक अवस्था, ह्या सगळ्या आम्ही अनुभवल्या आहेत.साधं उदाहरण म्हणजे डोक्यावरचे केस गळणे.विशेषतः स्त्रियांना या साइड-इफेक्टचा, कॅन्सर पेक्षा जास्त त्रास होतो. कारण .. स्वाभाविक आहे .. सामाजिक प्रतिमा!अशावेळी, आमचे टक्कल असलेले फोटो बघून त्यांना गंमत वाटते आणि धीर पण मिळतो.समोर अशा व्यक्तीला बघणं जी यातून बाहेर पडली आहे, ह्याने निश्चितच उमेद वाढते.
(Image : google)
तितकेच महत्वाचे असतात, केअर गिव्हर्स..
त्यांच्यावर पेशंटला तसेच, स्वतःला पण सांभाळण्याची जबाबदारी असते. मानसिक, आर्थिक, शारीरिक स्तरांवर ते लढत असतात.त्यांच्याशी धीराचे दोन शब्द बोलल्यावर, त्यांना देखील आधार वाटतो.एकमेकांना पहिल्यांदाच भेटतोय असं जाणवत पण नाही. कारण, आम्ही एका सह-वेदनेने जोडले गेलो आहोत.आम्ही बऱ्या होत असतांना, या सगळ्यांत काहीतरी योगदान दिल पाहिजे असं वाटत होतं.आपल्या अनुभवाचा इतर पेशंटसना काहीतरी उपयोग करून द्यावा असं वाटायचं.शिवाय डॉक्टरस्, सपोर्ट स्टाफ तसेच आमचे आप्त ह्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी असं पण वाटत होतं.तेव्हा, राज सर, श्रुती मॅडम, यांनी काय करता येईल ह्यासाठी मार्गदर्शन केले. सायको-ओंकॉलॉजीचे महत्व डॉक्टर श्वेता ह्यांनी समजावून संगितले. गेल्या वर्षी एप्रिल मध्ये HCG मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उमेद पेशंट सपोर्ट ग्रुपचा पाया रचला गेला.महिन्या-दोन महिन्यातून एकदा, जनरल वार्ड मध्ये कार्यक्रम घेत हळूहळू वाटचाल पुढे सुरू झाली.एकमेकींच्या सहकार्याने आणि एका ध्येयाने सुरू झालेला असा हा उमेद पेशंट सपोर्ट ग्रुप.पेशंटस् आणि त्यांच्या केअर गिवर्स ना थोडा धीर, आणि दिलासा देण्याचा हा नम्र प्रयत्न!मंडला आर्ट, रंग भरणे, मेडिटेशन, गाणी, एकमेकांचे अनुभव ऐकणे अश्या वेगवेगळ्या गोष्टी इथे होतात. कोणालाही काही प्रश्न किंवा शंका विचाराच्या असतील तर त्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप देखील आहे.इथून पुढे, आर्ट थेरपी, डांस थेरपी, काउन्सेलिंग अश्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ह्या प्रवासाला पुढे न्यायचे आहे.आज एका वर्षांनंतर आम्हाला असा विश्वास वाटतो आहे की हे काम नक्कीच पुढे जाऊ शकेल. बरे झालेले पेशंट्स देखील ह्या कामात जोडले जातील. त्याच अनुषंगाने आपल्यासमोर आमचे अनुभव मांडून त्याचा इतर पेशंटसना उपयोग होऊ शकेल म्हणून हा प्रयत्न. ह्यामध्ये पेशंटस् तसेच केअर गिवर्स, डॉक्टर्स, सायको-ओंकॉलॉजीस्ट, डाएटीशीयन अश्या वेगवेगळ्या लोकांचे कॅन्सर संदर्भातील अनुभव आणि माहिती ह्या लेखांमध्ये असणार आहे. सोबत आहोत, सोबत राहू..
अधिक माहिती आणि संपर्कHCG मानवता कॅन्सर सेंटर् उमेद पेशंट सपोर्ट ग्रुपumed.warriors@gmail.comफोन- 9145500381