संक्रांत झाली की हळदी कुंकू कार्यक्रमाचे वेध लागतात. वाण काय द्यायचं हा तर महत्त्वाचा प्रश्न. छान नटून थटून, गेट टुगेदर, खास मेन्यू आणि वेगळं वाण ही या समारंभाची ओळख असतेच. उत्साहात सोहळा साजराही होतो. मात्र पुण्यातल्या ‘पिंची’ (Pinchi facebook group) या फेसबूक ग्रूपने एक आगळंवेगळं हळदीकुंकू यंदा साजरं केलं. आणि नुसतं वाण लूटलंच नाही तर आपल्या तब्येतीचीही उत्तम काळजी घेत ते आरोग्याचं वाण जपावं असा संदेशही दिला. या ग्रुपच्या संस्थापक पूनम परदेशी आणि त्यांच्या मैत्रिणींनी एक आगळावेगळा उपक्रम केला आणि त्यातून एक सामाजिक संदेशही दिला.
पिंची ग्रुपच्या पूनम परदेशी सांगतात, ‘हळदी कुंकू समारंभात आपण सौभाग्याशी संबंधित वाण लुटतो. मात्र रोजच्या जगण्यात अनेकजणी स्वतः ला, स्वतः च्या आरोग्याला प्रायॉरिटी देणंच विसरुन जातात. आणि मग आपली एखादी मैत्रीण कधीतरी सांगते की मेनस्ट्रुअल कप वापरणं खूप सोयीचं आहे, तब्येतीसाठी चांगलं आहे. मी ते वापरते, तू पण ट्राय कर. मात्र ते अनेकजणी वापरत नाहीत, स्वत:लाच सांगतात, इस बार नही हो पाया अगली बार जरूर ट्राय करूंगी! हे माझ्या-तुमच्या अनेकींच्या बाबतीत होतं. आम्ही पिंची ग्रूपने हा मानसिकतेला अडथळा ओलांडायचं ठरवलं. भीती, लाज वाटणं, डिस्कम्फर्ट हे सारं बाजूला ठेवून स्वत:च्या आरोग्याविषयी मोकळेपणानं बोलायचं ठरवलं. आणि हळदीकुंकू म्हणून याच विषयावर एक परिसंवाद आयोजित केला. मासिक पाळीतली स्वच्छता, समस्या, पिरीएड्समधल्या वेदना यासंदर्भात सुप्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शलाका शिंत्रे- शिंपी यांचे व्याखान आणि मुक्त संवादही झाला.’
मासिक पाळीच्या काळात टॅम्पॉन्स, पॅड्स, पॅण्टी लायनर्स वापरणे, त्यांचं पॅकेजिंक, वापरुन झाल्यावर त्याची विल्हेवाट लावण्याचे प्रश्न यातून प्रचंड प्रमाणात प्लास्टिक कचरा तयार होतो. त्यापैकी ९० टक्के प्लास्टिक कचरा असतो. हे टाळायचं तर वापरायला सोयीचे आणि आरोग्यासाठीही योग्य असे मेन्स्ट्रुअल कप वापरणं योग्य ठरते. आर्थिक दृष्ट्या ते सोयीचे आहे, मात्र पर्यावरणपूरकही आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करण्याविषयीही चर्चा झाली. या समारंभात वाण म्हणून मेन्स्ट्रुअल कपच देण्यात आले. ऑइटरी या संस्थेचे संस्थापक आणि सीइओ रोहित चव्हाण यांनी हे मेन्स्ट्रुअल कप उपलब्ध करुन दिले.
हा आगळावेगळा उपक्रम आकाराला यावा म्हणून पूनम परदेशी यांच्यासह रेखा काळभोर, रीमा परदेशी, अंजली भगत यांनी उत्तम नियोजन केलं.
पारंपरिक हळदी-कुंकूला असा आधुनिक चेहरा देत आरोग्याचे वाण या मैत्रिणींनी लूटले.