पैसा माणसाला जगायला शिकवतो पण कला माणसाला का जगायचं ते सांगते असं प्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांनी कित्येक वर्षांपूर्वी म्हटले होते. हे खरे असल्याचा प्रत्यय आपण वारंवार घेत असतो. कलेमध्ये किती सामर्थ्य आहे हे आपल्याला माहित आहेच. कला ही आपल्याला मनाने फ्रेश ठेवण्यासाठी तर उपयुक्त असतेच पण आपल्यातील कलागुणांना वाव दिल्यास ती आणखी बहरत जाते हेही तितकेच खरे. प्रसिद्ध अभिनेते, राजकारणी, उद्योजक हेही कलेचा आस्वाद घेताना आपण अनेकदा पाहिले आहे. इतकेच नाही तर तेही स्वत:ला आपल्या व्यापातून थोडे रिलॅक्स होण्यासाठी कलेचा आधार घेत असल्याचे दिसते. प्रसिद्ध अभिनेत्री आणि केंद्रिय मंत्रीस्मृती इराणी यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून हे पुन्हा एकदा समोर आले आहे (Central Minister Smriti Irani Viral Instagram Post of Knitting woolen clothes).
नेत्यांना विविध कामानिमित्त सातत्याने प्रवास करायला लागतो. नेते असले तरी तेही आपल्यासारखेच असल्याने त्यांनाही अनेकदा प्रवासाचा, वेगवेगळ्या ताणांचा थकवा येऊ शकतो. मात्र त्यामध्ये अडकून न राहता स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी काही ना काही प्रयोग करत असतात. स्मृती इराणी एका प्रवासात असताना त्यांना ट्राफिक लागल्याने त्यांनी चक्क लोकरीचे विणकाम सुरु केले. त्यांचा हा व्हीडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून त्याला छानशी कॅप्शनही देण्यात आली आहे. “आयुष्यातील लहान गोष्टींमधून मिळणारा आनंद शोधा, छोट्या गोष्टींमधला आनंद खूप काही देऊन जाणारा असतो” अशा आशयाची ही कॅप्शन आहे. कानपूर आणि लखनऊ या प्रवासादरम्यान ट्राफीकमध्ये अडकलेल्या स्मृती इराणी अतिशय मन लावून दोन सुयांवर हे लोकरीचे काम करताना दिसत आहेत.
सुयांवर लोकरीचे कपडे विणणे, क्रोशाच्या वेगवेगळ्या गोष्टी तयार करणे या काहीशा आऊटडेटेड वाटणाऱ्या गोष्टी अतिशय उत्तम कला आहेत. पूर्वीच्या काळी घरोघरी महिला हे छंद जोपासून अतिशय उत्तम असे लोकरीचे कपडे घरीच तयार करत असत. या कलांसाठी कल्पनाशक्ती, पेशन्स, रंगसंगतीचे ज्ञान यांसारख्या गोष्टी आवश्यक असतात. अनेकदा खेळाडू, अभिनेते यांसारखे लोक आपला ताण घालवण्यासाठी या कला जोपासताना दिसतात. स्मृती इराणी सोशल मीडियावर बऱ्याच अॅक्टीव्ह असतात. कधी त्या आपल्या पर्सनल आयुष्यातील एखादी गोष्ट शेअर करतात तर कधी आणखी काही. त्याचप्रकारे त्यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शेअर केलेल्या या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर बरेच लाईक्स आले आहेत.