Join us

स्वप्न पाहिलं अन् सत्यात उतरवलं; अडथळे पार करुन प्रकाशझोतात येणारी हरहुन्नरी कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:10 IST

Chaitali Kohli : दीड वर्षांच्या संघर्षानंतर २०२० मध्ये त्यांना "फोनपे" जाहिरातीत सीमा आंटी हे डान्सिंग पात्र साकारायला मिळालं.

महिलांसाठी विविध क्षेत्रात संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक महिला अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी सज्ज आहेत. कारण आता कथा अधिक सखोल झाल्या आहेत, ज्या पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन मानवी अनुभवांचे विविध पैलू उलगडतात, खासकरुन त्यात स्त्री-दृष्टिकोनाचाही समावेश आहे. चित्रपट निर्माते महिलांना केवळ पारंपरिक भूमिका देत नाहीत. त्याऐवजी त्यांच्या भावना, संघर्ष आणि ध्येयासाठीची धडपड दाखवतात.  

पूर्वी महिलांकडे फक्त शोभेच्या वस्तूप्रमाणे पाहिले जात असे, पण आता 'फीमेल गेज' म्हणजेच महिलांच्या दृष्टिकोनातून कथा मांडण्यावर अधिक भर दिला जातो. याशिवाय दिग्दर्शन, लेखन आणि निर्मितीमध्येही महिलांचा सहभाग वाढला आहे, ज्यामुळे अधिक समतोल आणि समावेशक चित्रपट सृष्टी घडत आहे. चैताली कोहली यांचा प्रवास याच बदलाचा उत्तम नमुना आहे.   

दीड वर्षांच्या संघर्षानंतर मिळाली भूमिका

चैताली यांनी अनेक महिलांप्रमाणेच कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपलं अभिनय स्वप्न थोडं उशीरा पाहिलं. पालकांनी मुलं झाल्यानंतर अभिनयाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर एक वर्षांनी अभिनय प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. विविध संस्थांमधून प्रशिक्षण घेतलं. दीड वर्षांच्या संघर्षानंतर २०२० मध्ये त्यांना "फोनपे" जाहिरातीत सीमा आंटी हे डान्सिंग पात्र साकारायला मिळालं. अनुभव आणि नव्या दृष्टीकोनामुळे ही संधी मिळाली. अभिनय क्षेत्रात येण्याचे वेगळे फायदे असतात.  

महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी

जीवनाच्या अनुभवामुळे अभिनयात अधिक खोली येते आणि व्यक्तिरेखा अधिक समजून घेता येते. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या संधींमुळे विविध वयोगटांतील महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळत आहेत. आजचे दिग्दर्शक आणि निर्माते सिंगल मदर्स, त्यांचे संघर्ष आणि प्रवास यांवर कथा तयार करत आहेत. प्रेक्षकही या कथांना स्वीकारत असल्याने वैविध्यपूर्ण भूमिका निर्माण होत आहेत. 

स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कधीच उशीर होत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे "झिम्मा" हा चित्रपट, ज्यात अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी एका अशा महिलेची भूमिका साकारली आहे जिची स्वप्नं मागील पिढ्यांतील अनेक महिलांच्या इच्छांचं प्रतीक आहे. हा चित्रपट अत्यंत सहजपणे आणि प्रभावीपणे एका महिलेच्या स्वप्नांचा पाठपुरावा करतो आणि हे अधोरेखित करतो की, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कधीच उशीर होत नाही.  

५० हून अधिक जाहिराती, वेब सिरीज, चित्रपट, नाटकांमध्ये काम

३८ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केलेल्या चैताली कोहली यांनी आजवर ५० हून अधिक जाहिराती, वेब सिरीज, चित्रपट आणि व्यावसायिक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रात यश मिळवण्यासाठी वय हा अडथळा नाही, हे तिने सिद्ध केलं आहे. प्रसिद्धीची हमी नसली तरी जिद्द आणि चिकाटी यामुळे संधी मिळतेच हे त्यांचं ठाम मत आहे. चैताली यांची गोष्ट अभिनयाचं स्वप्न पाहणाऱ्या असंख्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी