थर्टी फर्स्ट साजरा करुन चार दिवस उलटले. पण अजूनही मनात सेलिब्रेशनमधे काय करायचं राहिलं? जे जमलं नाही ते पुढच्या वर्षी थर्टी फर्स्टला नक्की करु असे विचार अजूनही घोळत असतील. हे झालं आपल्या वैयक्तिक पातळीवरचं. वर्तमानपत्रं, माध्यम , समाजमाध्यमं यावरुन वेगवेगळ्या सेलिब्रेटिंनी नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं, कोणी कुठे बाहेर जाऊन कशी पार्टी केली याच्या बातम्या प्रसिध्द होत आहेत आणि आपणही ते कुतूहलानं वाचता वाचता त्यात हरवून जात आहोत. थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हणजे सर्वजण पार्टीमूडमधे. अख्खं जग सेलिब्रेशनमधे बुडालेलं असतं. सेलिब्रेटींचं तर विचारुच नका.. त्यांची गोष्टच वेगळी..
Image: Google
अख्खं बाॅलिवूड सेलिब्रेशन पार्टीमधे बुडून गेलं असताना मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवर मात्र एका वेगळ्या जगात , वेगळ्या ध्येयाच्या पाठीमागे पळत होते. हे कशासाठी तर अर्थातच सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी. पण त्यांच्या या सेलिब्रेशनला चमक धमक नव्हती. फाइव्ह सेव्हन स्टार, रिसाॅर्ट येथील पार्ट्यांची शान नव्हती , खाण्यापिण्याची चंगळ मंगळ नव्हती अंगावर फॅशनेबल कपड्यांचा थाट नव्हता की चेहऱ्यावर स्टायलिश मेकअप किंवा मेकअपची पुटं नव्हती. तर दोघांच्या पायात होते स्पोर्टस शूज आणि पायाखाली होता खडतर रस्ता, सोबतीला कुडकुडवणारी थंडी आणि घामाच्या धाराही. ही त्यांची थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन पार्टी होती. 110 कि.मी पळून दोघांनी सरत्या वर्षाला निरोप दिला आणि 2022 चं स्वागत उउत्साहानं केलं. जैसलमेरमधील लाठी ते साम हे 110 किलोमीटरचं अंतर त्यांनी 30 आणि 31 डिसेंबरला पार केलं.
Image: Google
आपल्या पहिल्या पोस्टमधे मिलिंदनं आपल्या या सेलिब्रेशनची कल्पना सोशल मीडियावरुन दिली होती. आम्ही नवीन वर्षाचं स्वागत आमच्या नेहमीच्या पध्दतीने धावण्याचं लक्ष पूर्ण करत करणार आहोत. राजस्थानमधील जैसलमेर येथे 9 अंश सेल्सिअस तापमानात आम्ही आमचं लक्ष गाठण्यास आणि सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली आहे. जे लोक मुंबईत राहातात त्यांना 9 अंश सेल्सिअस तापमान म्हणजे नक्कीच गोठवणारं वाटेल. आमच्यासारख्याच एका भन्नाट ग्रूप बरोबर आम्ही धावतो आहोत.' आपल्या पोस्टमधे आपल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनचं स्वरुप सांगून दिवसभरात 61 कि.मी धावल्याचंही त्याने शेअर केलं. 110 कि.मीचं ध्येय गाठल्यानंतर मिलिंदने आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट वरुन सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपण 110 कि.मीचं ध्येय गाठल्याचं जाहीर केलं.
Image: Google
थर्टी फर्स्टचं असं धावत पळत, स्वत:पुढे फिटनेस गोल ठेवत सेलिब्रेशन करण्याची मिलिंद सोमणची ही स्टाइल नवीन नाही. गेल्या आठ वर्षांपासून तो याच पध्दतीनं सेलिब्रेशन करतो. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या या सेलिब्रेशनमधे त्याची बायको अंकित कोनवरही सहभागी होते आहे. खरंतर जेव्हा पासून या दोघांचं लग्न झालं तेव्हापासून हे दोघेजण सोशल मीडियावरचे स्टार झाले आहेत. दोघेही फिटनेसच्या बाबतीत गंभीर आहेत. दोघेही स्वत:च स्वत:ला फिटनेससाठी नवनवीन आव्हानं देत असतात. फिटनेसच्या या प्रवासात दोघेही सोबत असतात आणि सतत याबाबतच्या पोस्ट टाकून, व्हिडिओ शेअर करुन ते इतरांनाही प्रेरित करत असतात.
Image: Google
मिलिंद आणि अंकिताच्या 110 कि.मी रनींग सेलिब्रेशनच्या स्टाइलमुळे संपूर्ण बाॅलिवूडनं मिलिंद आणि अंकिताचं कौतुक केलं आहे. सामान्य लोकांनाही त्यांच्या या कृतीचं खूप अप्रूप वाटून तुमच्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया लोकांनी मिलिंद आणि अंकिताला दिल्या आहेत. मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाला तीन वर्ष झालीत. पण दोघांमधील वयाच्या अंतरावरुन दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. पण त्यांनी याकडे कधी लक्ष दिलं नाही, नाही काही प्रतिक्रिया. एकमेकांवर प्रेम करणं, फिटनेस राखणं आणि आपलं काम करणं यातच ही दोघं बुडालेली असतात.
मिलिंद आपल्या या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशन स्टाइलबद्दल बोलताना सांगतो , की 'माझा असा विश्वास आहे, की आपलं मानवी शरीर किंवा मन हे काही सुखासाठी, सुरक्षित जगण्यासाठी निर्माण केलेलं नाही. मुळातच या शरीराची आणि मनाची गरज नवनवीन आव्हानं पेलण्याची आहे. म्हणून शरीर आणि मनाला सतत नवनवीन आणि खडतर दिली तर येणाऱ्या कुठल्याही समस्येला तोंड देतान आपण डमगणार नाही. आणि आपण जर असं शरीर आणि मनाला आव्हान देत जगलो तरच शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त राहू. हे आव्हानं देणं, ती पेलणं पूर्ण करणं जमलं की आव्हानं आणि ते पूर्ण करण्यातलं समाधान यातलं सौंदर्य लक्षात येतं. आपण आपल्या जगण्यात विविध तंत्रज्ञानाचा आधार घेतो. त्यामुळे आपलं जगणं गतिशील झालं आहे, सुख, समाधान आणि आपल्याला आराम मिळत आहे असं आपल्य वाटतं ते खरं नाही, तो केवळ एक भ्रम आहे. खरं जगणं आणि खरं सुख आव्हानात आहे . येणाऱ्या वर्षात नवीन आव्हानांसाठी स्वत: ला सज्ज करण्यास म्हणून आम्ही 31 डिसेंबरला दीर्घ पल्ल्याचं अंतर पळून गाठतो.'
Image: Google
मिलिंदने आपलं ध्येय गाठल्यानंतर 'हीच आपली पार्टी' म्हणत पोस्ट शेअर केली होती. नंतर दुसऱ्या दिवशी अंकितानं शेअर केललेल्या पोस्टमधे निवांत क्षणी दोघेही एकमेकांसमोर बसले आहेत. आणि अंकिता नवीन वर्षाचं स्वागत गिटार वाजवून संगीतानं आणि भरपूर प्रेमानं करत असल्याचं म्हटलं आहे.
मिलिंद अंकिता रोजच्या जगण्यासाठी स्वत:ला कसं तयार करतात, त्यांची सेलिब्रेशनची व्याख्या , आनंद शोधण्याचा मार्ग काय आहे यातून इतरांनाही आनंदाची, समाधानाची त्यांची स्वत:ची जगावेगळी व्याख्या सापडेल, काही नवीन मार्ग सापडतील हे नक्की!