नवरा आणि बायको ही रथाची दोन चाकं असतात असं आपण नेहमी म्हणतो. मूल झालं की या दोन्ही चाकांची तितकीच महत्त्वाची भूमिका असते पण अनेकदा काही कारणांनी आई वड़ील विभक्त झाल्यामुळे किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्यामुळे सिंगल पॅरेंटींग करण्याची वेळ अनेकांवर येते. एकीकडे जोडीदार गेल्याचे दु:ख पचवत पदरात असलेले मूल एकट्याने सांभाळणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. ज्याच्यावर ही वेळ येते त्यालाच त्यासाठी काय करावे लागते हे समजते. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. आपल्या मुलाचा एकटीने जिद्दीने सांभाळ करणाऱ्या मातेची ही गोष्ट वाचून आपल्याला तिचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही (Chanchal Sharma Uttar Pradesh Single Mom Drive Rickshaw With Baby).
दु:ख कुरवाळत बसून त्यातच अडकून बसणे सोपे असते. पण त्याच परिस्थितीला संधी मानत तिचे सोने करणे सगळ्यांनाच जमते असे नाही. उत्तर प्रदेशातील चंचल शर्मा नावाची महिला काही कारणाने आपल्या पतीपासून वेगळी झाली. साहजिकच पतीपासून वेगळी झाल्यानंतर ती आपल्या आईकडे राहायला आली. आई कामासाठी बाहेर जात असल्याने तिच्या बाळाला सांभाळायला कोणीच नव्हते. अशावेळी एखादीने बाहेर न पडता घरात बसून बाळाला सांभाळण्याचा पर्याय स्वीकारला असता. पण चंचल जिद्दीची होती. झाशीची राणी ज्याप्रमाणे कोणताही विचार न करता लहानग्या बाळाला घेऊन लढण्यासाठी गेली त्याचप्रकारे आपल्या चिमुकल्याला पोटाशी बांधत चंचलने रीक्षा चालवण्याचे ठरवले आणि ती घराबाहेर पडलीही.
नोएडाच्या रस्त्यावर ई रीक्षा चालवताना अनेकदा बाळ रडते. उन्हाचा त्रास होत असल्याने त्याला असह्य होते. पण समोर दुसरा पर्याय नसल्याने स्वत:चा आणि मुलाचा सांभाळ करण्यासाठी चंचल हे काम अतिशय कष्टाने करते. एकीकडे बाळाच्या तोंडात दुधाची बाटली देऊन त्याला मांडीत घेऊन चंचल प्रवाशांची ने- आण करते आणि दिवसाकाठी काही रक्कम मिळवते. कर्ज काढून तिने ई-रीक्षा खरेदी केली असून या कर्जाची परतफेड करण्यासाठी कमाईतील रक्कम ती बाजूला काढते. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी चंचलची कहाणी असून बाळासाठी आई काय तऱ्हेचे कष्ट करते हेच या घटनेवरुन पाहायला मिळते.