दिल्लीची अवघी २३ वर्षांची तरुणी तुलिका सतबीर मान (Tulika Maan). अगदी लहानपणापासून ती ज्यूडो खेळायची आणि यातच काहीतरी करायचं, असं स्वप्न तिनं आणि तिच्या आईचंही. आईनं त्यासाठी खूप कष्ट घेतले. लहानपणीच वडिलांचं छत्र कौटुंबिक समस्येमुळे दूर झालं. आईनं एकटीनं तिला वाढवलं. पण या मायलेकींनी आपला संघर्ष आणि स्वाभिमान सोडला नाही.(Indian athlete Tulika Maan won silver medal in judo)
तिच्या आईने लेकीकडे पाहून पुन्हा हिंमत धरली आणि तुलिकाचा खेळ पुन्हा एकदा सुरु केला. तुलिकानेही कसून सरावाला सुरुवात केली. तिच्या आई अमृता मान पोलीस उपनिरिक्षक म्हणून काम करत असून त्याच तुलिकाची खरी प्रेरणा आहेत. तुलिकाचा खेळ दिवसेंदिवस वेग घेत गेला. तिने आजवर ४ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवले असून नुकतंच कॉमनवेल्थमध्ये तिनं मिळवलेलं रौप्य ही तिची आजपर्यंतची सर्वात यशस्वी खेळी ठरली आहे.
पण तरीही रौप्य पदक जिंकूनही तुलिका मात्र नाराजच आहे. ७८ किलो वजनी गटात न्युझीलंडच्या सिडनी ॲन्ड्र्यू हिचा पराभव करून तिने अंतिम फेरीत धडक मारली आणि तिथूनच तिच्या सुवर्ण पदक पटकाविण्याच्या आशा आणखी पल्लवित झाल्या. पण अंतिम लढतीत स्कॉटलंडच्या सारा ॲडलिंग्टन हिच्याकडून पराभव स्विकारावा लागल्याने तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. यामुळे ती कमालीची नाराज झाली. खेळ संपल्यावर त्याच भावनेच्या भरात तिने आईला फोन केला आणि 'माफ कर देना गोल्ड नहीं ला पाई' अशा शब्दांत आईकडे दु:ख व्यक्त केले. लेकीचा दुखरा आवाज ऐकून आईही कमालीची नाराज झाली. पण पदकाचा रंग पिवळा नसला तरी तिने पटकाविलेले रौप्य पदकही काही कमी मानाचे नाही, अशा शब्दांत आईने लेकीची समजूत घातली. चार वर्षांनी मला सुवर्ण पदक जिंकण्याची पुन्हा एकदा संधी मिळेल.. पण आज ती संधी हुकली याचं वाईट वाटतं, अशा भावना तुलिकाने व्यक्त केल्या.