अफगाणिस्तानातल्या मुली आणि महिला तालिबानच्या दहशतीनं घाबरल्या आहेत. कोणी देश सोडून बाहेर पडण्यासाठी तळमळत आहे तर अनेकींनी स्वत:ला घरात चार भिंतीत कोंडून घेतलं आहे. आपल्या स्वातंत्र्याचा, अधिकारांचा गळा आवळला जाणार या विचारानंच त्यांच्या हातापायातलं बळ गेलंय. तर दुसर्या बाजूला क्रिस्टल बयात ( Crystal Bayat,Afghanistan ) ही 24 वर्षीय अफगाण तरुणी मात्र तालिबानांच्या , त्यांच्या दहशतीविरुध्द निडरपणे उभी ठाकली आहे. क्रिस्टल ही राजकीय आंदोलक असून ती अफगाणिस्तानातल्या महिलांना आपल्या हक्क अधिकारांबद्दल आवाज उठवण्यास उद्युक्त करत आहे.
क्रिस्टल बयात या अफगाणिस्तानातल्या तरुणीनं भारतात दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी मिळवी. पदव्युत्तर शिक्षण दिल्लीमधील युनायटेड नेशन्स इन्स्टियूट येथून पूर्ण केलं. क्रिस्टलची आई ही डॉक्टर असून वडील अफगाणिस्तान सरकारच्या मंत्रालयात काम करतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2019 मधे क्रिस्टल अफगाणिस्तानात परतली.
तालिबान अफगाणिस्तानवर कब्जा मिळवत असताना या देशात केवळ महिलांचे तालिबानविरुध्द दोन निदर्शनं झाली. ती छोटी होती पण महत्त्वाची होती. गेल्या वीस वर्षात शिक्षण, नोकरी, व्यवसाय यातून अफगाण महिला आणि मुलींनी मिळवलेल्या आत्मविश्वासाचं प्रतिनिधित्त्व करणारी होती. 17 ऑगस्टला चार महिलांनी तालिबानविरुध्द काबूलच्या रस्त्यावर निदर्शन केलं. तर त्याच्या दुसर्याच दिवशी 18ऑगस्टला म्हणजे अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी सात महिलांनी काबूलमधील वाझी अकबर खान परिसरात निदर्शन केलं. ही दोन्ही निदर्शनं एकाच आठवड्यात एका पाठोपाठ झालीत. ही निदर्शनं करुन या महिला आंदोलक अफगाण स्त्रियांच्या हक्क अधिकारांच्या सुरक्षेबद्दल मागण्या करत होत्या. तर त्याच वेळी तालिबान कमांडर महिलांच्या हक्काबद्दल काय? या प्रश्नावर कुत्सितपणे हसतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
छायाचित्र- गुगल
तालिबाननं अफगाणिस्तान ताब्यात घ्यायला सुरुवात केल्यानंतर केवळ अफगाणिस्तानातूनच नाही तर जगभरातून अफगाण महिलांच्या हक्कांबद्दल , त्याच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त होते आहे. तालिबाननं काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर शासकीय कार्यालयात काम करणार्या महिलांना नोकरी सोडून घरी पाठवलं गेलं. तर ज्या मुली महिला या देशाबाहेर होत्या त्यांनी आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधून आपली शैक्षणिक प्रमाणपत्रं लपवून ठेवण्यास किंवा नष्ट करण्यास सांगितली. तर दुसरीकडे तालिबान मात्र ,आम्ही महिलांना त्यांच्या नोकर्या सुरु ठेवण्यास परवानगी देऊ असं म्हणत आहे. पण अफगाणिस्तानातल्या महिलांनी तालिबानची दहशत यापूर्वीही अनुभवली आहे. त्यामुळे अफगाण महिलांचा यावर अजिबात विश्वास नाही. या महिलांना तालिबानची भीती तर वाटतेच सोबत स्वतः:च्या जीविताचीही भीती वाटतेय. म्हणूनच त्यांनी स्वत:ला चार भिंतीत कोंडून घेतलं आहे.
पण क्रिस्टल बयातला हे माहिती आहे की आता जर आपण घरात स्वत:ला कोंडून घेतलं तर आपलं शिक्षण, आपलं स्वातंत्र्य सर्व धुळीस मिळेल. तिने महिलांना घरात न बसता रस्त्यावर उतरुन तालिबान विरुध्द आवाज उठवण्यास प्रेरित केलं. त्यासाठी तिनं समाज माध्यमांचा वापर केला. महिलांना व्हॉटसअप संदेश पाठवून निदर्शनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. पण तिच्या या हाकेला साद देण्यास भीतीपोटी महिला घराबाहेर पडल्या नाहीत. क्रिस्टलनं घरोघरी फिरुन महिलांना साद घातली होती. शंभर घरं फिरल्यानंतर तिच्या हाकेला साद देणार्या केवळ सात महिला निदर्शनात सहभागी झाल्या. अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी जे निदर्शन झालं त्यात 1500 पुरुष होते तर महिला होत्या केवळ सात.
छायाचित्र- गुगल
हे निदर्शन चालू असताना तालिबाननं क्रिस्टलला अनेकदा घाबरवलं, धमकावलं. बायकांनी अशा पध्दतीनं आवाज उठवणं हराम असल्याच, निषिध्द असल्याचं तिला सांगून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तिला बंदुकीचा धाक दाखवला. तिला मागे फिरण्यास, निदर्शन थांबवण्यास सांगितलं. पण क्रिस्टल घाबरली नाही. तिनं तालिबानविरुध्द निदर्शन सुरु ठेवलं. न घाबरता तालिबानविरुध्द ती घोषणा देत राहिली.
क्रिस्टलनं हे जीवावर उदार होवून धाडस केलं ते अफगाणिस्तानातल्या सर्व महिला आणि मुलींसाठी, गेल्या वीस वर्षात इथल्या मुली शिकल्या. त्या सरकारी आणि खाजगी कार्यालयात काम करु लागल्या, अनेकींनी स्वत:चे व्यवसाय सुरु केले. आता तालिबानच्या राजवटीत हे सर्व पुसलं जाणार. हे होवू नये, याविरुध्द महिलांनी पेटून उठावं म्हणून क्रिस्टल धाडसानं तालिबानच्या समोर उभी ठाकली. समोरासमोर तालिबानचा सामना करताना ती जराही डगमगली नाही. काही झालं तरी मी मागे हटणार नाही असं ती म्हणत होती आणि तालिबान चवताळून आंदोलकांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार करत होते. या निदर्शनानंतर जगभरातल्या माध्यमात 24वर्षीय क्रिस्टल बयातच्या या धाडसाच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. अफगाणिस्तानातल्या महिलांना तालिबानच्या राजवटीत न्याय मिळवून देण्यासाठी क्रिस्टल बयातचा हा निडर बाणा किती पुरे पडणार असा प्रश्नही निर्माण झाला.