Join us  

फक्त शाळेतच नाही करिअर-लग्नापर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांना सोबत करणाऱ्या शिक्षिका-अर्चना कोठावदेंची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 5:12 PM

नवरात्र विशेष : नाशिकच्या महाराष्ट्र सेवा संघ संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयातल्या शिक्षिका अर्चना कोठावदे सांगतात, कर्णबधीर मुलांना शिकण्या शिकवण्यातून घडलेलं आयुष्य.

ठळक मुद्देमी या क्षेत्रात आले त्यामुळे फक्त माझ्यासाठी जगले नाही तर इतर लोकांना जगायला शिकवलं. यापेक्षा मोठं यश कोणतं असू शकतं!

माधुरी पेठकर

मी जर समजा शिक्षक झाले नसते तर 'मदत' या गोष्टीचा खरा अर्थ मला कसा कळला असता? मदत करणं मी खऱ्या अर्थाने कसं अनुभवलं असतं? असं सांगत असताता नाशिकच्या महाराष्ट्र सेवा संघ संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयातल्या शिक्षिका अर्चना कोठावदे. खरंतर बळजबरीनं त्या शिक्षक झाल्या, त्यांनी  कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं. मास्टर करुन आयटी क्षेत्रात जायचं होतं. त्यांचा ट्रॅक फिक्स होता. पण अचानक स्पेशल एज्युकेशन त्यांच्या आयुष्यात आलं. आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांचं आयुष्य तर बदललंच, त्यांनीही अनेकांच्या आयु्ष्याला उमेदीनं आकार दिला.

अर्चना कोठावदे सांगतात..

खरंतर मला करायचा नव्हता तरी मी नाईलाजानं स्पेशल एज्युकेशनमध्ये डिप्लोमा केला. डिप्लोमाच्या एका टप्प्यावर वाटायचं की काय करतोय आपण हे? कशाला करतोय? आपण पुन्हा आपल्या कम्प्युटरच्या फिल्डकडेच वळणार आहोत. स्पेशल एज्युकेशनचा डिप्लोमा टप्प्याटप्प्याने पुढे जात होता. नंतर मात्र मला हे क्षेत्र आवडू लागलं. इतकं की मी गुरफटून गेले. डिप्लोमा पूर्ण केला आणि महाराष्ट्र सेवा संघाच्या माई लेले कर्णबधिर शाळेत १९९८ मध्ये शिक्षक म्हणून काम करु लागले ते आजतागयत हे काम सुरुच आहे. स्पेशल एज्युकेशनमध्ये शिक्षक म्हणून काम करताना वर्गात शिकवण्यापुरतीच भूमिका मर्यादित राहात नाही. वर्गात शिकवणं हा तर एक टप्पा असतो. पण त्यापलिकडे या मुलांचं शिकणं जगणं सोपं आणि सुकर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. एक शिक्षक म्हणून आपलं काम फक्त मुलांपर्यंतच मर्यादित राहात नाही तर त्यांच्या पालकांना समजावण्यातून अनेक गोष्टी शिकवाव्या लागतात. शाळेतून मुलं बाहेर पडली की त्यांच्या आयुष्याचा एक नवा टप्पा सुरु होतो. शालेय शिक्षकांपासून मुलं दूर होतात. पण आमचं तसं होत नाही. मुलं शाळेतून बाहेर पडली, शिक्षण पूर्ण करुन कामाला लागली, लग्न केलं, त्यांना मुलं झाली तरी त्यांच्या आयुष्यात आमची भूमिका असते. अर्थात मुलांच्या या टप्प्यापर्यंत त्यांची साथसोबत करावी असं काही आमच्या जाॅब चार्टमध्ये नसतं, पण हे जगच असं आहे की शिक्षक गुरफटत जातो, गुंतून राहातो. तो बाहेर पडत नाही आणि त्यांना बाहेर पडायचंही नसतं. माझं अगदी तसंच झालं.

आव्हानं काय असतात?

अर्चना कोठावदे सांगतात, कर्णबधिर मुलांना शिकवताना, घडवताना त्यांना असलेल्या, येणाऱ्या अनेक अडचणी समजत गेल्या. त्यावर उपाय शोधत गेले आणि या उपायांचा चांगला परिणामही दिसायला लागला. या कर्णबधिरांचं जग कानातल्या मशीनवर अवलंबून असतं. हे मशीन सेलवर चालतं. सहा सेलचं एक पॅकेट् २८० रुपयांना मिळतं. मग या मुलांचे पालक काय करायचे की मुलं जेव्हा शाळेत असतील तेवढ्या वेळेपर्यंत मुलांच्या कानात मशीन ठेवायचे आणि घरी आल्यानंतर ते काढून ठेवायचे. पण यामुळे काय व्हायचं की घरी गेल्यानंतर मुलांचं ऐकणं बंद व्हायचं. मुलांच्या कानावर काही पडतच नव्हतं तर मुलं शिकतील कशी? ही अडचण लक्षात आल्यावर महाराष्ट्र सेवा संघाच्या रचना शाळेतल्या माजी मुलांचा मेळावा घेतला. त्यांच्याकडून मदत गोळा केली. आणि शाळेत सेल बॅंक सुरु केली. जे सेलचं पॅकेट बाहेर २८० रुपयांना मिळतं ते शाळेत ११० रुपयांना उपलब्ध करुन दिलं. पालकांना ते परवडू लागलं. मुलांच्या कानात दिवसभर मशीन राहू लागलं. त्याचा फायदा मुलांना झाला. सेल बॅंकेतले सेल ही सेवा फक्त शाळेतल्या मुलांसाठीच नाही तर शाळेबाहेरच्या इतर कर्णबधिर मुलांसाठीही राबवली. नाशिकपुरती मर्यादित न ठेवता ती जिल्ह्याच्या बाहेर व्यापक केली. आज महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यातील कर्णबधिर मुलांचे पालक या सेवेचा लाभ घेत आहे.

कर्णबधिर मुलांना शिकवताना त्यांच्या पालकांनाही शिकवावं लागतं. आपलं मूल कर्णबधिर आहे म्हणजे आता त्याचं आयुष्य संपलं त्याचं काहीच होणार नाही असं नाही, हे पालकांना पटवून आपण या मुलांना पुढे जाण्यासाठी, त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी काय करु शकतो हे सांगावं लागतं. यासोबतच मशीनची देखभाल कशी करायची हे समजावून सांगावं लागतं.

माई लेले शाळेत सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. पण सातवीनंतर शाळेतून मुलं बाहेर पडली तरी माझी भूमिका संपत नाही. शिक्षक या भूमिकेचा विस्तार समाज सेवेपर्यंत होतो. या मुलांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवरही मार्गदर्शन करावं लागतं. करिअरसोबतच नंतर लग्न करताना काय काळजी घ्यावी, जोडीदारही दिव्यांग असल्यास येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी. पुढे मूल कर्णबधिर असेल तर काय करावं, ते जर सामान्य असेल तर काय करावं इथपर्यंत या मुलांना मार्गदर्शन करावं लागतं, मदत करावी लागते. या कामाचा आवाका मोठा असला तरी त्याचं ना दडपण येतं, ना त्रास होतो. उलट आपण हे करु शकतोय त्याचा आनंदच जास्त होतो.

दिव्यांगाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे. ही मुलं योग्य वेळेत योग्य मदत मिळाली नाही तर काहीच करु शकत नाही. मग भार असल्यासारखी वाटतात. हे असं व्हायला नको असं मला कायम वाटतं. मुलांना त्यांच्या पायावर उभं करण्याइतपत मार्गदर्शन मी आज अनेक मुलांना केलं आहे. ती मुलं स्वत:च्या पायावर उभी राहिली. स्वत:ची जबाबदारी स्वीकारली आणि इतकंच नाही तर स्वत:च्या आई बाबांना सांभाळण्याइतपत बळ त्यांच्यात आलं आहे. अशी जास्तीत जास्त मुलांना मदत करुन त्यांना पायावर उभं करण्याचं ध्येय आहे.

कोरोना काळात दिव्यांग मुलांसाठी, त्यांच्या पालकांच्या लसीकरणासाठी मी पुढाकार घेतला. अंध, कर्णबधिर मुलांना तर काय होतंय हेच कळत नव्हतं. त्यामुळे त्यांना परिस्थिती समजून सांगणं, त्यांना लसीकरणासाठी तयार करणं आणि प्रत्यक्ष त्यांना लस देण्यासाठी केंद्रावर आणणं या गोष्टी धडपड करुन यशस्वीपणे घडवून आणल्या. जगताना अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या मुलांसाठी धडपडण्याचा, काहीतरी करण्याचा आनंद मला या कामातून मिळतोय. २३ वर्षांनंतर मागे वळून पाहाताना आपण चुकीच्या नाही तर योग्य क्षेत्रात काम करत असल्याचं समाधान वाटतं. मी या क्षेत्रात आले त्यामुळे फक्त माझ्यासाठी जगले नाही तर इतर लोकांना जगायला शिकवलं. यापेक्षा मोठं यश कोणतं असू शकतं! 

(अर्चना कोठावदे नाशिकच्या श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयायतल्या शिक्षिका आहेत.)

 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023प्रेरणादायक गोष्टी