सायली जोशी-पटवर्धन
स्त्री. सुंदरच हवी, तिचा बांधा कमनीय हवा, तिचा रंग गोरा हवा. लांबसडक केस हवेत अशी सौंदर्याची व्याख्या अनेकांची असते. नकळत ती मनात रुजवलेलीही असते. तिच्यामध्ये याहून वेगळं काही असलं की एकतर आपण तिला नावं ठेवतो किंवा तिची थट्टा मस्करी करतो. जोक केला म्हणत निभावून नेतो गोष्टी. पण असतात टोमणेच किंवा टिंगल. नुकत्याच झालेल्या ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात (Oscar Ceremony 2022) तरी वेगळं काय घडलं? अभिनेता विल स्मिथने (Will Smith) निवेदक क्रिस रॉकच्या (Chris Rock) कानशिलात लगावली आणि उपस्थित सगळे अवाक झाले. जगभरातील मिडियामध्येही या विषयाची जोरदार चर्चा झाली. जागतिक स्तरावरील कार्यक्रमात अशाप्रकारचे कृत्य घडल्यामुळे सगळ्यांनाच याबद्दल काहीसा धक्का बसला. पण विल स्मिथने दिलेली चपराक ही केवळ क्रिससाठी नसून आपल्यातील अनेकांना लागू पडणारी आहे. एखाद्याची मस्करी करणे वेगळे आणि व्यंगावरुन किंवा सौंदर्याच्या मोजमापात एखादी व्यक्ती बसत नसेल तर सार्वजनिकपणे तिची चेष्टा करणे हे नक्कीच सभ्यपणाचे नाही. त्यामुळे आपणही अशी थट्टामस्करी करत असू तर स्मिथने दिलेली ही चपराक आपण गंभीरपणे घेण्याची गरज आहे. कारण अशापद्धतीची जोक म्हणून टोमणेमारु विधाने आपण करत असू तर नक्कीच काहीतरी चुकतंय एवढं लक्षात घेतलं तरी पुरे.
तर त्याचे झाले असे, की लॉस एजेलिसमध्ये तब्बल तीन वर्षानंतर जगभरात प्रतिष्ठित मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळा सुरू होता. जगभरातील दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान सूत्रसंचालक क्रिस रॉकने विलच्या पत्नीच्या टकलावर कमेंट केली. विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट जेडाला टक्कल असल्यामुळे तिला अमुक चित्रपटात भूमिका मिळेल, असं तो म्हणाला. पत्नीची केलेली ही मस्करी विल स्मिथला अजिबात आवडली नाही. तो सरळ मंचावर गेला आणि काही कळायच्या आत त्याने क्रिसच्या कानशिलात लगावली. पुन्हा माझ्या पत्नीचं नाव घ्यायचं नाही अशा विलने क्रिसला दिला. नंतर घडल्या प्रकाराबाबत क्रिसनेही माफी मागत आपलं चुकल्याचं मान्य केलं.
त्या विषयावर पडदा पडला असला तरी या निमित्ताने स्त्रियांची वाह्यात थट्टा मस्करी करण्याचा विषय जागतिक पातळीवर चर्चेत आला असे म्हणायला हरकत नाही. एखाद्या स्त्रीकडे कमनीय बांध नसेल, ती गोरी नसेल, सौंदर्याच्या मापदंडात तिची चेहरेपट्टी बसत नसेल , तिच्या डोक्यावर लांबसडक केस नसतील तर तिची चेष्टा करणे कितपत योग्य आहे? तसे जोक करणे, ते व्हायरल करणे, जेंडर कमेण्ट करणे ना सभ्यपणाचे आहे ना माणुसकीचे ना ते विनोद म्हणूनही उच्च दर्जाचे आहेत. चेष्टेचे आणि मस्करीचे माध्यम म्हणूनच आपण कायम स्त्रिया, त्यांचं रंगरुप, बांधा, स्वभाव याकडे पाहणार का? याचा विचार आपल्यातील प्रत्येकाने करायला हवा. पण तशी ‘विल पॉवर’ आपल्यात आहे का?