Join us  

घ्या हो घ्या, भाजीची पिशवी भाड्याने घ्या! प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी एक भन्नाट प्रयोग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 4:20 PM

Dr. Ruby Makhija Is Replacing Plastic With Cloth Bags : प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भाजी-सामान भरुन आणण्यापेक्षा पिशवीच जर भाड्याने मिळाली तर? असा प्रयोग करणाऱ्या महिलांची अनोखी गोेष्ट

सध्या जगभरात 'प्लास्टिक प्रदूषण' ही खूप मोठी समस्या आपल्या समोर उभी ठाकली आहे. एकदा वापरल्यावर परत वापरात न येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू  टाकायच्या कुठे आणि त्यांची विल्हेवाट कशी लावायची ही समस्या जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे आपल्या पर्यावरणाला खूप वेगाने हानी पोहोचत आहे. प्लास्टिक पिशव्या, भांडी, आणि फर्निचरच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिक कचऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, यामुळेच प्लास्टिक प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. 

दिल्लीच्या डॉ. रुबी मखिजा या पर्यावरण आणि प्रदूषणाबाबत अत्यंत जागरूक आहेत म्हणूनच त्यांनी शहरातील प्लास्टिकच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'विकल्प' हा प्रकल्प सुरू केला. बेटर इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, प्लास्टिकचा वाढता वापर रोखण्यासाठी 'विकल्प' सारखी मोहीम अधिक शहरांमध्ये सुरू करण्यासाठी डॉ. रुबी यांना दिल्ली बाहेरूनही अनेक फोन येतात. ही संकल्पना लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी अनेक वेबिनारही केले आहेत. या मोहिमेचा दिल्ली प्रमाणेच अनेक ठिकाणी विस्तार करण्यासाठी त्या अनेक एनजीओ आणि सीएसआर संस्थांशी चर्चा करत आहेत(Dr. Ruby Makhija Is Replacing Plastic With Cloth Bags).

'विकल्प' हा उपक्रम नक्की काय आहे ? 

प्लास्टिक प्रदूषणापासून पर्यावरणाला हानी पोहोचू नये या उद्देशाने डॉ. रुबी मखिजा यांनी नोव्हेंबर २०२१ रोजी 'विकल्प' नावाने एक मोहिम सुरु केली. या मोहिमेद्वारे दिल्लीतील ३०० हून अधिक दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. असं पहायला गेलं तर या पिशव्या एक प्रकारे मोफतच दिल्या जात आहेत. या उपक्रमांमध्ये आपल्याला फक्त २० रुपये जमा करुन एक कापडी पिशवी उधारीवर घ्यायची आहे. या पिशवीत आपण आपले सामान भरुन ही पिशवी घरी घेऊन जाऊ शकता. आपण जेव्हा पुढच्यावेळेस पुन्हा खरेदीस याला तेव्हा जर आपण ही पिशवी परत केली तर आपल्याला आपले जमा केलेले २० रुपये परत मिळतील. डॉ. रुबी सांगतात की, खरेदीला बाहेर जाताना लोकांना आपली स्वतःची पिशवी घेऊन बाहेर निघण्याची सवयच आता राहिली नाही. लोकांना स्वतःची पिशवी घेऊन जाण्याची सवय गेल्या अनेक वर्षांपासून सुटली आहे. त्याचबरोबर काहीवेळा आपण खरेदी करण्याच्या उद्देशाने बाजारांत आलेलो नसतो, काही लोक लोक थेट ऑफिसमधून खरेदी करण्यासाठी येतात, तर काही पिशव्या आणायला विसरले असतात अशा परिस्थितीत त्यांना सामानासाठी पिशवी लागते, त्यामुळे या 'विकल्प' पिशव्या त्यांच्या कामी येतात. आता सध्या विकल्पचे दिल्लीमध्ये एकूण ३५० सेंटर्स आहे आणि अजून ३५० सेंटरचे काम सुरु आहे. 

'विकल्प' पिशव्यांची सुविधा कुठे आहे हे कसे कळणार ?

डॉ. रुबी यांनी विकल्पच्या प्रत्येक पिशवीवर एक कोड दिला आहे जेणेकरून कोणताही ग्राहक विकल्पच्या एका सेंटरमधून खरेदी केलेली पिशवी या ३५० सेंटर्सपैकी कोणत्याही दुकानात परत करू शकेल. जेव्हा ग्राहक विकल्पची पिशवी घेऊन घरी जाईल आणि त्यावर दिलेला कोड स्कॅन करेल तेव्हा तो 'विकल्पच्या' वेब पेजवर पोहोचेल. या वेबपेजवर त्याला सर्व 'विकल्प स्टोअर्स'ची यादी दिसेल. ग्राहकाकडे आता यापैकी कोणत्याही दुकानात पिशवी परत करण्याची आणि त्याचे २० रुपये परत घेण्याची सुविधा उपलब्ध असेल. 

'नमकवाली है हम'! उत्तराखंडातल्या पर्वत रांगांमधलं नैसर्गिक मीठ जगानं खावं म्हणून राबणाऱ्या महिलेची गोष्ट...

हजारो प्लास्टिक पिशव्यांपासून सुटका... 

डॉ. रुबी सांगतात,सध्या बाजारात किमान ३० ते ४० हजार 'प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. एखाद्या व्यक्तीने कापडी पिशवीचा वापर केल्यास वर्षभरात ५०० प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोखला जातो असं म्हटलं जातं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने एक पिशवी वापरली तर त्याचा पर्यावरणावर किती चांगला परिणाम होतो हे दिसून येते. 

गरीब महिलांना मिळाला रोजगार... 

या उपक्रमांतून काही गरीब महिलांना रोजगार देखील मिळत आहे. या पिशव्या बनवण्यासाठी मोठमोठ्या कपड्यांच्या मिलमधील किंवा टेलरकडे उरलेल्या कपड्यांचा वापर केला जातो. तर काही लोक आपल्याकडील कपडे डोनेशन म्हणून देतात यातून या सुंदर कापडाच्या वापरण्यायोग्य पिशव्या बनविल्या जातात. या कापडांपासून पिशव्या बनून पूर्ण झाल्यानंतर, त्यांना शिवणकामासाठीचे पैसे दिले जातात.

डॉ. रुबी यांचा समाजाला संदेश... 

“आपण प्लास्टिकचा वापर पूर्णपणे आपल्या आयुष्यातून काढून टाकू शकत नाही, कारण ते आपल्या आयुष्यात आणि रोजच्या वापरात खूप खोलवर जाऊन बसले आहे. पण जर आपण सिंगल यूज प्लॅस्टिक वापरायचे टाळले आणि त्याच्या जागी दुसरा पर्याय वापरला तर ते पर्यावरणासाठी खूप चांगले होईल. आपल्या भावी पिढ्यांवरही प्लास्टिकचा खूप वाईट परिणाम होत आहे. मग आजपासून तुम्ही तुमची स्वतःची पिशवी वापरायला सुरुवात कराल की पर्यावरणातील  प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण वाढवत रहाल?"

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी