- अभिजित पानसे
जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोणीतरी एमा रादूकानू नावाच्या एका टीनएजर टेनिसपटूने विम्बल्डनमधून माघार घेतली, अशी बातमी आली. ती काही कुणी फार ग्रेट नव्हती, त्यामुळे तिनं ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली याची तशी काही बातमी झाली नाही की, तिचं नावही कुणाच्या लक्षात राहिलं नाही. थोडीफार टिंगल नाही म्हणायला झाली. एका नावाजलेल्या पाश्चिमात्य न्यूज पेपरने त्या मुलीची थट्टाही केली. काही विनोदही अनेकांनी तिच्यावर सोशल मीडियात केले. तसं होणं साहजिकच होतं. १८ वर्षांची ही खेळाडू. विम्बल्डन खेळत होती आणि चौथ्या राऊंड मॅचनंतर म्हणाली की, मला चक्कर येते आहे. श्वास घेताना त्रास होतोय, मी नाही खेळू शकत आणि हे सारं असं सांगून तिनं स्पर्धेतून माघारच घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी तिनेच सोशल मीडियावर जाहीर केलं की, आता मला बरं वाटतंय, तब्येत ठीक आहे. पण मॅच न खेळल्याचं दुःख आहे. त्यावरही मग टीका झाली. एका वृत्तपत्रानं तर मथळाच केला की, ‘आता तिला बरं वाटतंय!’
एकप्रकारे ती टेनिसमधील मोठ्या व्यावसायिक स्पर्धेचा ताण झेलू शकली नाही, घाबरून पलायन केलं, असा सगळ्यांचा सूर होता. तिची टिंगलच नाही तर बदनामीही झाली. आजकालच्या मुलांना जराही ताण सहन होत नाही, आपण विम्बलडन खेळतोय याचंही भान या तरुण मुलीला नाही, काय तिची थेरं अशाप्रकारची सगळीकडून तिच्यावर टीका झाली आणि वास्तवही तेच होतं की, ऐन मोक्याच्या क्षणी तिची ताकद सरली, हातातून रॅकेट गळून पडली. तिच्यावर पळपुटेपणाचा, ताण सहन न होण्याचा, स्पर्धेत न टिकण्याचा आरोप झाला.
एखादी असती तर या साऱ्यामुळे किती खचून गेली असती. कदाचित घरीच बसली असती. पण तिनं तसं केलं नाही... ती परत आली आणि तिनं ग्रॅण्डस्लॅम जिंकून दाखवलं. तिचं नाव एमा रादूकानू. अगदी चारच दिवसांपूर्वी युएस ओपन ग्रँडस्लॅम जिंकून तिनं नवीन रेकॉर्ड केलं. आतापर्यंत फारशी कुणालाही माहीत नसलेली ही १८ वर्षांची मुलगी एकदम युवा स्टार झाली. फायटर ठरली. बालचमत्कार ठरली. इंटरनेटवर ती स्टार झाली आहे. जग तिचे गोडवे गाऊ लागले.
२००४ नंतर, म्हणजेच मारिया शारापोवानंतर सगळ्यात कमी वयात ग्रँडस्लॅम जिंकणारी टेनिसपटू होण्याचा विक्रम एमानं करुन दाखवला. यावेळी युएस ओपन स्पर्धेत एक सुंदर योगायोग म्हणजे दोन टीनएजर महिला टेनिसपटू फायनलपर्यंत पोहोचल्या होत्या. ७३ व्या मानांकनावर असलेली कॅनडाची १९ वर्षाची लेला फर्नांडिज फायनलमध्ये एमाविरुद्ध होती. तर फायनलपूर्वी एमा १५० रँकवर होती. कुठे १५० ही रँक, कुठं चॅम्पिअनशिप. कुठं आधीच्या ग्रॅण्डस्लॅमला माघार घेणं, कुठं दणकून जिंकणं. पण या मुलीनं करुन दाखवलं आणि जिंकल्यावर माध्यमांना मुलाखती देतानाही तिचा चेहरा हसरा, लाघवीच होता.
कुठंही बघा, तुम्ही माझ्यावर टीका केली ना, मला नाही नाही ती नावं ठेवली, मी जिंकून दाखवलंच, असा आवेश नव्हता. ना जिंकल्याचा गर्व, ना काहीतरी सिध्द केल्याचा माज, ना टीनएजर ॲटिट्यूड. तिला जे करायचं ते करुन झालं होतं. ती जिंकली, तिनं तिच्या खेळावर होणाऱ्या टीकेला उत्तरं खेळातूनच दिली होती. १९६८ नंतर कुणाही ब्रिटीश महिलेने युएस ओपन स्पर्धा जिंकून ब्रिटनचं नाव मोठं केलं ते एमाने. मुख्य म्हणजे युएस ओपनमध्ये एमाने सर्वच्या सर्व १८ सेट जिंकले आहेत. यात पात्रता फेरीतील ३ आणि मुख्य ६ सामन्यांचे सेट सामील आहेत.
एमाची आई चीनची तर वडील रोमानियाचे आहेत. तिचा जन्म कॅनडामध्ये झाला पण दोन वर्षांनीच ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आणि ब्रिटीश म्हणून या मुलीनं स्थलांतरित आणि स्थानिक दोघांना अभिमान वाटावा, असा खेळ करुन दाखवला. तिच्या माघार घेण्याची आणि जिंकण्याची ही गोष्ट म्हणूनच प्रेरणादायी आहे. डर सबको लगता है, एमाही विम्बल्डनमधून ताण सहन न झाल्याने बाहेर पडली होती. पण त्या भीतीसह स्वतःवर नियंत्रण मिळवून तिनं पुन्हा कमबॅक केलं, ते ही विनिंग. कोण म्हणतं, माघार घेणं कमीपणाचं असतं?
एमाचं भारताशी, पुण्याशी, सोलापूरशीही कनेक्शन
एमानं जिंकल्यानंतर भारतात खेळण्याच्या अनुभवाचाही उल्लेख केला. तो खराच होता, ती जानेवारी २०१८मध्ये चंदीगड आणि दिल्लीत खेळली. वैदेही चौधरीला तिने दिल्लीत हरवलं होतं. पुण्यात डेक्कन जीमखान्यातही ती मॅच खेळली आहे. आयटीएफ, इंटरनॅशनल वुमन फेडरेशन स्पर्धेसाठी ती सोलापूरमध्येही खेळली आहे.
‘‘एमा अत्यंत एनर्जेटिक खेळाडू आहे. तिच्या हालचाली खूप फास्ट आहेत.’ असं वैदेही चौधरीने एमाविरुद्ध दिल्लीत सामना हरल्यावर म्हटलं होतं. ऐन वयात येण्याच्या दिवसात ऊर्जा अनेकांत असते, मात्र ती सत्कारणी लावत जिंकण्यापर्यंत पोहोचणं एमासारख्या फार कमीजणांना जमतं.