भारतात चहा ही इतकी अत्यावश्यक गोष्ट आहे की अनेकदा भरपूर शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या लोकांपेक्षाही चहावाल्यांची कमाई काहीवेळा जास्त असते. झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत असंख्य जण आवडीने घेणारे पेय म्हणजे चहा. हल्ली बरेच जण उच्चशिक्षण घेऊनही आवड म्हणून किंवा आणखी काही कारणाने चहाचा व्यवसाय सुरू करतात. काही जण तर आपल्या दुकानाला नाव देतानाच एमबीए चहा, बी टेक चहा, बीएससी चहावाला अशीच नावे देतात. यांच्यासारखीच आणखी एक चहावाली गेल्या काही दिवसांत दिल्लीमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या तरुणीचे नाव शर्मिष्ठा घोष असून तिने थोडेथोडके नाही तर इंग्रजीमध्ये मास्टर्स केले आहे (English Literature Post Graduate Sharmistha Ghosh left Job to Start Tea Stall).
शर्मिष्ठाने आपले शिक्षण झाल्यावर ब्रिटीश काऊंसिल लायब्ररीमध्ये काही काळ काम केले. मात्र चहाची टपरी टाकण्यासाठी तिने आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. दिल्लीतील गोपीनाथ बाजार याठिकाणी तिने आपली टपरी टाकली आहे. आता टपरी असली तरी भविष्यात आपली चहाच्या दुकानांची चेन असावी असे शर्मिष्ठाचे स्वप्न आहे. भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त ब्रिगेडियर संजय खन्ना यांनी आपल्या लिंक्डीन अकाऊंटवर शर्मिष्ठाबाबतची ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या व्यवसायात तिच्यासोबत तिची मैत्रीणही असल्याचे पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
शर्मिष्ठाला आपल्या चहाचा चांगला ब्रँड बनवायचा आहे आणि भविष्यात चहाचाच व्यवसाय करण्याचे तिचे स्वप्न आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते आपण त्याकडे आपले स्वप्न म्हणून पाहायला हवे असा संदेशही संजय खन्ना आपल्या पोस्टमधून देतात. आपण उच्चशिक्षित आहे म्हणजे आपल्याला खूप गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळायला हवी असा विचार अनेक जण करतात. पण दिर्घकाळ चालणारे आणि आपल्याला आनंद देणारे असे काम प्रत्येकाने करायला हवे आणि आपली स्वप्ने पूर्ण करायला हवीत. त्यांच्या या पोस्टला बऱ्याच जणांनी लाईक केले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.