काही वर्षांपूर्वी महिला क्रिकेटकडे फारसं गांभिर्यानं बघितलं जायचं नाही. पण नंतर खेळण्याच्या कमी संधी असतानांही भारतीय महिला क्रिकेटपटूंनी आपल्या खेळानं देशातली आणि परदेशातली मैदानं गाजवली आणि आज महिला क्रिकेटबद्दलही कुतूहल, उत्सुकता आणि कौतुक निर्माण झालं आहे . महिला क्रिकेटच्या, महिला क्रिकेटपटुंच्या चाहत्यांची संख्या वाढते आहे. स्मृती मानधना, मिताली राज, हरमनप्रित कौर, झुलन गोस्वामी, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स ही नावं त्यांच्या परफाॅर्मन्ससह लोकांना माहीत असल्याची संख्या वाढते आहे. म्हणूनच जेव्हा मार्च2022 पासून् न्यूझिलंड येथे होणाऱ्या आंतरराष्टीय महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या भारतीय चमूमध्ये जेमिमा राॅड्रिग्जची निवड झाली नाही तेव्हा तिच्या चाहत्यांचीही निराशा झाली.
Image: Google
जेमिमालाही वाईट वाटलं, पण मैदानावर फक्त खेळ बोलतो, खेळ थोडा कमी पडला तर त्याचं नुकसान खेळाडुला सोसावं लागतंच हे जेमिमालाही माहीती असल्यानं आपण पुढच्या मालिकेसाठी जीव तोड मेहनत घेऊ असं निश्चय करुन जेमिमा महिला हाॅकी टुर्नामेण्टमधे खेळणार आहे. जेमिमा वर्ल्ड कप खेळणार नसली तरी म्हणून शांत घरी बसणार नाहीये. ती हाॅकीच्या टुर्नामेण्टमध्ये भाग घेऊन हाॅकी खेळणार आहे.
Image: Google
उत्तम बॅटर असलेली जेमिमा रॉड्रिक्स हाॅकीही छान खेळते. मैदान क्रिकेटचं असू देत किंवा हाॅकीचं तिथे खेळताना आपण फक्त खेळाडू असतो एवढंच डोक्यात ठेवायचं हे सत्य असलं तरी एक महिला म्हणून जे महिला खेळाडुंना आव्हान असतं, त्याचा सामना करताना टेन्शन येतंच असं जेमिमा सांगते. खेळाला लिंग नसतं. लिंगभेदापलिकडे एक खेळाडू म्हणून आपली ओळख व्हावी ही इच्छा प्रत्येक खेळाडुची असते. पण म्हणून खेळताना महिला म्हणून तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानाची तीव्रता कमी होत नाही. असं जेमिमानं यूट्यूबर रणवीर सिंहला त्याच्या 'बीर बायसेप्स' या चॅनेलला मुलाखत देताना सांगितलं.
Image: Google
क्रिकेट, मोरल सपोर्ट, यश, अपयश यासोबत खेळातल्या 'जेंडर 'बद्दल बोलताना जेमिमानं पाळीचा त्रास आणि महिला क्रिकेटबद्दलचा अनुभव सांगितला. क्रिकेट या खेळात असं कोणतं आव्हान आहे ज्याचा सामना पुरुषांना करावा लागत नाही, महिला क्रिकेटपटुंना मात्र करावा लागतो या मुद्यावर बोलताना जेमिमानं स्वत:सह आपल्या सहकारी खेळाडुंचा पाळीतला अनुभव आणि टेन्शन याबद्दल सांगितलं आहे.
पाळीत होणारा त्रास हा वैयक्तिक आणि अनुवांशिक असतो . प्रत्येकीला होणारा त्रास, त्रासाचं स्वरुप, त्याची तीव्रता वेगळी असते. जेमिमा म्हणते आईला पाळीत खूप त्रास व्हायचा पण तितक्या तीव्रतेचा त्रास आपल्याला होत नाही. पण त्रास होतोच. पाळीतल्या त्रासाचा आपल्या खेळावर परिणाम होवू द्यायचा नाही हा स्वत:सह इतरांचाही प्रयत्न असतोच. त्रास होतांनाही खेळावं लागतं हे वास्तव असल्याचं जेमिमा सांगते.
Image: Google
जेमिमा म्हणते की माझ्या अनेक सहकारी खेळाडुंना अशक्यप्राय त्रास होतो. कंबरेत , पोटात दुखतं, असह्य चमका येतात, अनेकींच्या वेदनांची तीव्रता इतकी असते की त्यांना एक पाऊलही पुढे टाकणं अशक्य होतं. तरीही अशा परिस्थितीत खेळासाठी मैदानावर उतरावंच लागतं आणि तिथे स्वत:मधल्या क्षमतेचे 100 टक्के द्यावे लागतात.
Image: Google
एरवी पाळी असली तर मध्ये थोडा आराम करता येतो, पण मॅचेस चालू असताना पाळी आली तर पाळीचा होणारा त्रास कमी करण्यासाठी पेनकिलर घेऊन खेळावं लागतं. आजपर्यंत अजूनतरी आपल्या स्वत:ला आणि इतर सहकारी खेळाडुंना पाळीमुळे माघार घ्यावी लागली नाही. पण पाळीच्या त्रासाचं स्वरुप , तीव्रता वेगवेगळी असल्याने पाळीच्या त्रासामुळे एखाद्या खेळाडुला एखाद्या मॅचमधून कदाचित माघार घ्यावी लागूही शकते. महिला क्रिकेटपटुंना पाळीत होणारा हा त्रास पुरुष खेळाडुंना कधीच समजणार नाही असं जेमिमा सांगते.
पाळी सुरु असताना जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा वेदनांसोबतच खेळताना कपड्यांना डाग तर पडणार नाही ना, त्यावर काही कमेण्टस पास होणार नाही ना असं टेन्शन मनात असतं. सारखं वाॅशरुममध्ये जाऊन पॅड बदलावी लागतात. तेव्हा आज पाळी आहे, पाळीचा त्रास होतोय म्हणून माघार घेण्याचा पर्याय नसतो. फक्त खेळणं, देशासाठी खेळणं एवढंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच पाळीतल्या वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर घेऊन खेळण्यासाठी उतरतो आणि जीव तोडून खेळतो...' असं जेमिमा सांगते.
पाळीचा खेळावर परिणाम होतो का? या प्रश्नावरचं जेमिमाचं हे उत्तर आहे. त्रास होतो, पण सांगायचा कुणाला? अशी परिस्थिती जेमिमाप्रमाणे अनेक महिला खेळाडुंना केवळ क्रिकेटमध्येच नाही तर वेगवेगळ्या खेळात अनुभवावी लागते हे नक्की. पाळीतल्या त्रासाकडे दुर्लक्ष करुन खेळणाऱ्या या महिला खेळाडुंच्या खेळाबद्दलाच्या 'जिगर'चं कौतुक करावं तेवढं कमीच!