दिल्लीत राहणाऱ्या ४ महिला अमेरिकी राजदूतांबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे कारणही तसेच आहे. राजदूत म्हटल्यावर त्यांनी बुलेटप्रूफ कारने फिरणे अपेक्षित आहे. मात्र या ४ महिला चक्क स्वत: रिक्षा चालवत दिल्लीमध्ये फिरत आहेत. आता त्या असे का करतात असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडेल. तर त्याचे कारणही तसेच आहे. सरकारकडून मिळालेल्या बुलेटप्रूफ गाड्या सोडून त्या ऑफीसला चक्क रिक्षाने जातात. त्यांचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे (Female American Diplomats Driving Auto Rickshaw in Delhi).
याबाबत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना एन.एल.मेसन यांनी सांगितले, की मी कधीच क्लच असलेल्या गाड्या चालवलेल्या नाहीत. मी कायमच ऑटोमॅटीक कारच चालवल्या आहेत. पण मी जेव्हा भारतात आले तेव्हा रिक्षा चालवण्याचा अनुभव माझ्यासाठी एकदम नवीन होता. पाकिस्तानमध्ये असताना मी कायम मोठमोठ्या बुलेटप्रूफ गाड्यांनी फिरायचे. पण बाहेर रीक्षा पाहून मलाही अशी रिक्षा चालवायची इच्छा व्हायची. त्यामुळे जेव्हा भारतात आले तेव्हा आधी मी रिक्षा खरेदी केली. विशेष म्हणजे माझ्यासोबत अमेरिकी दूतावासामध्ये काम करणाऱ्या रुथ, शरीन आणि जेनिफर यांनीही रिक्षा खरेदी केल्या. त्यामुळे आम्ही सगळ्या दिल्लीमध्ये रिक्षाने फिरतो.
मूळ भारतीय वंशाची असलेल्या शरीन जे किटरमॅनने गुलाबी रंगाची रीक्षा खरेदी केली असून यामध्ये तिने दोन्ही देशांचे झेंडे लावले आहेत. त्यांचा जन्म कर्माटकात झाला असला तरी त्या अमेरीकेच्या नागरीक आहेत. ऑफीसला जाण्याबरोबरच आजुबाजूला असलेली कामेही या सगळ्या रीक्षानेच करतात. त्यामुळे त्यांच्या आसपासच्या लोकांना याबाबत विशेष कौतुक वाटत आहे. या चौघींचा रिक्षाने फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या चौंघींच्या अनोख्या कृतीमुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.