गर्भारपण म्हणजे महिलेसाठी दुसरा जन्मच. त्यातही ते पहिले असेल की गर्भवती महिला पार गोंधळून जातात. नवव्या महिन्यात अवघडलेली अवस्था असल्याने नीट बसता येत नाही आणि काहीच करता येत नाही. इतकंच नाही तर या काळात महिलेने आणि तिच्या आजुबाजूच्यांनी तिला मानसिक, भावनिक आणि शारीरिकरित्या जपणे अतिशय आवश्यक असते. असे असताना एखादी महिला खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करुन पदक मिळवून देत आपले कर्तृत्व सिद्ध करत असेल तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे. हरिका द्रोणावल्ली या बुद्धीबळपटूने ऑलम्पियाड स्पर्धेत देशासाठी योगदान देत स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बुद्धीबळ ऑलिम्पियाड 2022 (Chess Olympiad 2022) स्पर्धेत भारतीय महिलांनी कांस्य पदक मिळवलं. पहिलं बाळंतपण म्हटल्यावर डोहाळजेवण, बेबी शॉवर पार्टी हे ओघानेच आलं, पण हरिकाचा पूर्ण वेळ बुद्धीबळाच्या सरावात गेल्याने यांपैकी कोणत्याच गोष्टी तिला करता आल्या नाहीत. अशावेळी पदक जिंकल्यावरच खरं सेलिब्रेशन करु असं मी स्वत:ला सांगत होते आणि ते मी सत्यात उतरवून दाखवले (Harika Dronavalli Realises Chess Olympiad Dream At 9 Months of Pregnancy no Baby Shower Until I Win a Medal).
भारतीय संघातील खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली हीचाही समावेश होताय नऊ महिन्यांची गर्भवती असताना हरिकाने संघासाठी उत्तम कामगिरी करत भारताला पदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मागील दोन वर्षे कोरोनामुळे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा ऑनलाईन पार पडली होती. यावर्षी ही स्पर्धा चेन्नई शहरात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या महिला गटाने कांस्य पदकाला गवसणी घातली. भारतीय संघातून कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली, तानिया सचदेव, आर वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांनी मिळून ही कामगिरी करत कास्य पदक पटकावले. हरिका ९ महिन्यांची गर्भवती असताना तिने केलेली कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. पहिलं आणि दुसरं स्थान युक्रेन आणि जॉर्जिया यांनी मिळवलं होतं. पण तिसऱ्या स्थानासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात तगडी टक्कर होती. पण अखेर आकडे भारताच्या दिशेने झुकले आणि भारतीय महिलांनी कांस्य पदकावर नाव कोरलं.
या विजयानंतर प्रतिक्रिया देताना हरिका म्हणाली, ''मी वयाच्या १३ व्या वर्षी भारतीय महिला बुद्धिबळ संघात पदार्पण केलं. आतापर्यंत मी अनेक स्पर्धा खेळल्या. गेल्या १८ वर्षांत ९ ऑलिम्पियाड खेळल्यानंतर भारतीय महिला संघाला पदक मिळवून देण्यासाठी पोडियमवर येणं माझं स्वप्न होतं. यंदा ते स्वप्न काही प्रमाणात का होईना पूर्ण झाले आहे. मी ९ महिन्यांची गर्भवती असताना हे स्वप्न साकार झाल्याने माझ्यासाठी ही गोष्ट विशेष भावनिक आहे. भारतात ऑलिम्पियाड आयोजित केल्याबद्दल मी ऐकले तेव्हा माझ्या डॉक्टरांशी स्पर्धेत खेळण्याबाबत सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी योग्य काळजी घेऊन तणाव न घेता खेळू शकत असलीस तर अवश्य खेळ असा सल्ला दिला. गेले काही महिने जास्तीत जास्त वेळ सराव आणि सामन्यात गेल्याने प्रेग्नन्सीचे कोणतेही सेलिब्रेशन करता आलं नाही. पण पदक जिंकल्यावरच हे सेलिब्रेशन करायचे असे मी ठरवले होते. भारतीय महिला बुद्धिबळ संघासाठी पहिले ऑलिम्पियाड पदक मिळाले असून सर्वच खेळाडूंसाठी ही आनंदाची बाब आहे. ''