Lokmat Sakhi >Inspirational > साडेपाच वर्षांच्या ओवीने सर केलं कळसूबाई शिखर, छोट्या पावलांच्या मोठ्या जिद्दीची कहाणी!

साडेपाच वर्षांच्या ओवीने सर केलं कळसूबाई शिखर, छोट्या पावलांच्या मोठ्या जिद्दीची कहाणी!

नाशिकची ओवी शिंदे, वय फक्त साडेपाच, पण डोंगरांच्या हाकांना ओ देत ती ट्रेकिंग करु लागली आणि सहज सर केलं कळसूबाई.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 04:46 PM2021-12-28T16:46:10+5:302021-12-28T16:53:07+5:30

नाशिकची ओवी शिंदे, वय फक्त साडेपाच, पण डोंगरांच्या हाकांना ओ देत ती ट्रेकिंग करु लागली आणि सहज सर केलं कळसूबाई.

Five and a half year old Ovi shinde from Nashik, Trekker climb Kalsubai summit | साडेपाच वर्षांच्या ओवीने सर केलं कळसूबाई शिखर, छोट्या पावलांच्या मोठ्या जिद्दीची कहाणी!

साडेपाच वर्षांच्या ओवीने सर केलं कळसूबाई शिखर, छोट्या पावलांच्या मोठ्या जिद्दीची कहाणी!

Highlightsपालकांसह तिच्या ट्रेकिंग ग्रुपचंही विशेष सहकार्य  तिला लाभलं.

साडेपाच वर्षांची मुलगी सहज सरसर कळसूबाईसारखं अवघड शिखर सर करते आणि  हिरकणीचा वारसा अजून इथल्या लेकींच्या जिद्दीत आहे हे सांगते हीच किती सुंदर गोष्ट आहे. तर त्या गोष्टीतली ही ओवी. वय वर्षे फक्त साडेपाच. आपण कळसूबाईवर चढाई केली, एवढा अवघड ट्रेक केला याचं काय मोठं अप्रूप मोठ्यांना वाटतं हे कळण्याचं तिचं वयही नाही. कळसूबाई शिखरावरुन खाली उतरल्यावर तिच्या मनात होतं पुन्हा जाऊन इथं सकाळी उगवता सूर्य पाहता आला तर, ती वडिलांना म्हणालीही की जाऊया का आपण परत डोंगरावर! तिच्या निरागस मनातल्या आणि पावलांतल्या जिद्दीचीच ही ओढ म्हणून मोठ्यांना अवघड वाटणारा ट्रेक तिनं सहज केला. 
नाशकात ट्रेकिंग ग्रुप्स भरपूर. इथल्या डोंगरवेड्यांना सह्याद्रीच्या साखळीतले गडकिल्ले हाका मारतातच. त्यातलाच हा एक ग्रुप एम एच १५. ओवीचे वडील डॉ. योगेश शिंदे त्या ग्रुपचे सदस्य. नाशिकजवळचे छोटे मोठे ट्रेक ते नेहमी करतात, त्यांच्या सोबतीने लहानगी ओवीही जाते. कळसूबाई सर करण्यापूर्वी ती वणीचा गड रडतोंडी घाटातून चढून आली होती. तिच्या वडिलांना खात्री होती की आपली लेक हा अवघड ट्रेकही करु शकेल. ओवीही आनंदाने वडिलांसोबत आणि त्यांच्या मित्रांसोबत ट्रेकला गेली.

ओवीचे वडील डॉ. योगेश शिंदे सांगतात, साधारणतः अडीच वर्षांपूर्वी आम्ही नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात राहण्यास आलो. जवळच पांडवलेणी आहेत.   फिटनेसच्या दृष्टीने पांडवलेणी ट्रेकिंग सर्वांत सोयीस्कर पर्याय होता. दर आठवड्याला मी स्वतः पांडवलेणी ट्रेकिंगची सुरुवात केली. त्यानंतर पुढील २-३ महिन्यात ओवीलाही सोबत घेवून जाण्यास सुरुवात केली. अगदी सुरुवातीपासूनच ओवी पांडवलेणी विनासायास विनामदत चढत उतरत असे. सुरुवातीला तिला कंटाळा येत असला तरी वेगवेगळे पक्षी, प्राणी, मासे, फुले दाखविण्याच्या बहाण्याने तिच्या ट्रेकिंगमध्ये खंड पडू दिला नाही. त्यानंतर मग हळू हळू नाशिकजवळील रामशेज, चामरलेणी, सप्तशृंगी गड, रडतोंडी असे ट्रेक पूर्ण केले. आता त्यानंतर ती स्वतःच ट्रेकिंगला जाण्याचा आग्रह धरू लागली.
आमच्या ग्रुपचे कळसूबाई ट्रेकिंग करण्याचे नियोजन ठरले. यावेळी ओवीला सोबत न्यावे की नाही थोडा प्रश्न पडला. याच वर्षी जानेवारीत मी स्वतः कळसूबाई ट्रेक पूर्ण केल्याने पूर्ण ट्रेकचा अंदाज होता. फक्त अंतर आणि वेळ या गोष्टीचा विचार करता ओवी ट्रेक पूर्ण करेल असा मला विश्वास होता. परंतु अगदीच वेळेवर काही अडचणी येवू शकतात का याचा अभ्यास केला. यासाठी पुन्हा एकदा स्वतःचेच मागचे कळसूबाई ट्रेकिंगचे फोटो शोधून त्यांच्या नीट अभ्यास केला. त्यातून या निष्कर्षाप्रत पोहोचलो की लोखंडी जिण्यांव्यतिरिक्त बाकी ट्रेक नक्की ओवी पूर्ण करेल. जिन्याच्या अभ्यासासाठी मी पुन्हा वेगवेगळ्या ५-६ ब्लॉगर्सचे यूट्यूब वरील व्हिडिओ बघितले. जिन्यांच्या लांबी, रुंदी, उंची यांचा पूर्ण अंदाज घेतला. सोबतच्या सहकाऱ्यांच्या साथीने मला  आत्मविश्वास वाटला की ओवी हा ट्रेक पूर्ण करणारच.
आणि  ओवीने माझा विश्वास सार्थ ठरवला. कळसूबाईचा ट्रेक २६ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण केला.’
ओवी अशी वडिलांसोबत डोंगरचढाई करत असली तरी तिच्या आईचं काय मत लेकीनं इतक्या लहान वयात ट्रेकिंगला जाण्याविषयी असं विचारलं तर तिची आई डॉ. अपूर्वा खांडे -शिंदे सांगतात,  आम्ही दोघेही डॉक्टर असल्याने ओवीच्या आहारविहाराकडे विशेष लक्ष देतोच. ओवीचा आहार चौरस ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यात प्रथिनयुक्त पदार्थांसाठी पनीर, अंडी यांचा समावेश आहे.  फास्टफुड - जंकफूड या पासून शक्य तितके लांब ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. वेळेअभावी मला स्वतःला जरी ट्रेकिंगला जाणे शक्य नसले तर ओवीला मी वारंवार वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांबदल माहिती देत असते. टीव्हीवरदेखील यासंदर्भातील कार्यक्रम तिला दाखविण्यास भर असतो. तसेच तिला स्वतःला निसर्गाची प्रचंड आवड आहे. नवनवीन प्राणी, पक्षी, वृक्ष, किल्ले याबद्दल तिला कुतूहल आहे. याबद्दल माहितीसाठी ती अनेक प्रश्न मला विचारत असते. ट्रेकिंगला चल म्हणून आग्रहही करते. तिनं या वयात कळसूबाई ट्रेक केला याचा आनंदच आहे. ’
आणि पालकांसह तिच्या ट्रेकिंग ग्रुपचंही विशेष सहकार्य  तिला लाभलं. एवढ्या लहान मुलीला घेऊन काय ट्रेकला जायचं याचा विचार न करता,
एम एच १५ ट्रेकिंग ग्रुपचे  रमेश लोहार, रुद्राक्ष लोहार, प्रकाश सपकाळे यांनीही ओवीच्या जिद्दीला प्रोत्साहन दिलं. वर्षाखेर अशी सुंदर साजरी केली.

Web Title: Five and a half year old Ovi shinde from Nashik, Trekker climb Kalsubai summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.