Join us  

हिंदीला पहिला बुकर पुरस्कार मिळवून देणाऱ्या गितांजली श्री, रेत समाधी-सारे पहलू एकसंग नहीं खुलते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 5:15 PM

गीतांजली श्री यांच्या रेत समाधी या हिंदी पुस्तकाला बुकर पुरस्कार जाहीर झाला, हिंदी भाषेतल्या पुस्तकाला मिळालेलं हा पहिला बुकर पुरस्कार. (geetanjali shree tomb of sand -ret samadhi - wins international booker-prize)

ठळक मुद्दे हिंदीत लिहिलेल्या रेत समाधी नावाच्या पुस्तकाला बुकर पुरस्कार जाहीर झाला.

आपण इंग्रजीत लिहिलं तरच आपण जगप्रसिध्द होतो, भारतीय भाषांना विचारतो कोण? असं तुच्छतेनं म्हणण्याचा एक लोकप्रिय सूर सध्या दिसतोच. इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं, आपल्याच भारतीय भाषांपासून तुटतात हे लक्षातही येत नाही. त्यात ‘हिंदी मिडिअम’ म्हणून हेटाळणीचे सूर तर उत्तर भारतातही कमी नाही. वो तो हिंदी मिडिअमवाला है, जिंदगी में क्या कर लेगा..पिछडा है.. असे टोमणे मारले जातात. आपण भारतीय भाषांत शिकलो, लिहितो,वाचतो, बोलतो याचा न्यूनगंड देशात सर्वदूर आहे.  अन्य भाषा आणि भाषकही त्याला अपवाद नाहीत. पण शुक्रवार  सकाळ झाली तीच आनंदाची बातमी घेऊन, हिंदीत लिहिलेल्या रेत समाधी नावाच्या पुस्तकाला बुकर पुरस्कार जाहीर झाला. (डेझी रॉकवेल यांनी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. पुरस्काराची रक्कम दोघींना विभागून देण्यात येईल.) गीतांजली श्री या पुस्तकाच्या लेखिका. बुकर पुरस्कार मिळवणारं हे पहिलं हिंदी पुस्तक. पुरस्कारानंतर गीतांजली श्री म्हणाल्या तेच फार महत्त्वाचं आहे. त्या म्हणतात, ‘माझ्या आणि या पुस्तकाच्या मागे हिंदीची श्रीमंत-समृद्ध साहित्य परंपरा आहे. हिंदीच नाही तर बाकी सर्व दक्षिण भारतीय भाषांचा वारसा आहे. या सर्व भाषांमधलं साहित्य वाचून जागतिक साहित्यही समृद्ध होईल..’

(Image : Google)

एका बुकर पुरस्काराच्या निमित्ताने हिंदी साहित्याची चर्चा जगभर होईल हे जितकं खरं तितकीच हिंदी आणि अन्य भारतीय भाषांतल्या दर्जेदार लेखनाची, पुस्तकांची चर्चा भारतभर होईल का? हा प्रश्न अवघड असला तरी त्याचं उत्तर तेच की भाषा माध्यम कोणतं यापलिकडे उत्तम कलाकृती जगभरात माणसांना आपल्या वाटू शकतात. पाउलो कोएलो नावाचा लोकप्रिय लेखक पोर्च्युगिजमध्ये लिहितो आणि त्याचे अनुवाद जगभर गाजतातच. त्यामुळे केवळ इंग्रजीत लिहिलं की ते सरस असं काही नसतं, आपल्या स्थानिक भाषेत, मातृभाषेतही उत्तम लिहिता येऊच शकतं हे जरी यानिमित्तानं ठळकपणे पोहोचलं तरी ते महत्त्वाचं आहे.गीतांजली श्री मूळच्या उत्तरप्रदेशातल्या मैनपुरी भागातल्या. जेनएनयूत आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजात शिकलेल्या ६४ वर्षीय लेखिका. त्यांच्या आजवर तीन कादंबऱ्या गाजलेल्या आहेत. रेत समाधी हे पुस्तकही एका आजीची आणि सोबत एका काळाची कहाणी सांगतं. थेट फाळणीपर्यंत घेऊन जातं माणसांच्या दुराव्याच्या, वर्तनामानाच्या आणि भूतकाळाच्या गुंत्याला.

(Image : Google)

त्या पुस्तकात एक वाक्य आहे. ‘बातों का सच ये है कि सारे पहलू एक संग नहीं खुलते..’ चंदप्रभा नावाची आजी एकेकाळच्या चंदाला शोधत पाकिस्तानात कशी जाते याची गोष्ट हे पुस्तक सांगतं. शोध आहे हे पुस्तक मानवी भावनांचा आणि काळाचाही.सारे पहलू एकसंग नहीं खुलते म्हणणणारी ही गोष्ट..त्या गोष्टीला मिळालेल्या बुकरचं आणि हिंदीच्या पहिल्या बुकरचं हेे कौतुक..

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी