भारतीय महिला विज्ञान तंत्रज्ञान विषयात संशोधन करते आणि गुगल डूडलच्या माध्यमातून त्याची दखल घेते ही भारतीयांसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. महिलांना आणखी बरीच मजल पार करायची आहे असे म्हणत असतानाच एक महिला आपल्या कार्यकतृत्त्वाचा ठसा उमटवते आणि जगात नाव कमावते ही खऱ्या अर्थाने कौतुकास्पद बाब आहे. या कतृत्ववान महिलेचे नाव आहे डॉ. कमल रणदिवे, त्यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. कॅन्सर विषयातील बहुमूल्य संशोधनासाठी त्यांना सलाम करण्यात आला आहे. हे डूडल भारताचे गेस्ट आर्टीस्ट म्हणून काम करणारे प्रसिद्ध कलाकार इब्राहिम रयिन्ताकथ यांनी काढले आहे. यामध्ये डॉ. कमल रणदिवे एका मायक्रोस्कोपमधून पाहत असल्याचे दिसते.
मूळच्या पुण्यातील असलेल्या डॉ. रणदिवे यांनी शालेय शिक्षण हुजूरपागा शाळेतून तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून घेतले. पुढे कृषी महाविद्यालयातून त्यांनी एम.एस्सी केले. त्यांचे वडील दिनकर दत्तात्रेय समर्थ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते तसेच ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापकही होते. १९३९ मध्ये त्यांचे प्रसिद्ध गणितज्ज्ञ जे. टी. रणदिवे यांच्याशी लग्न झाले. यानंतर कमल रणदिवे यांनी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम केलं. कमल यांची बुद्धिमत्ता ओळखून त्यांच्या वडिलांनी त्यांना पी.एचडी करण्यास सुचवले. कमल यांनीही मनावर घेऊन मुंबई विद्यापीठातून आपली पी.एचडी पूर्ण केली. सोबतच त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी पदवी देखील घेतली. वडिल आणि पती यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे कमल कधीही मागे हटल्या नाहीत. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. मात्र उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलो तरी त्यानंतर भारतात परतून देशाला त्याचा लाभ करुन द्यायला हवा असे त्यांचे ठाम मत होते, त्याच विचाराने त्या १९६० मध्ये पुन्हा भारतात आल्या.
‘कॅन्सर संशोधन केंद्राचे’ ‘भारतीय कॅन्सर संशोधन संस्थे’त रुपांतर करुन ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारुपाला आणण्यात डॉ. कमल यांचा महत्त्वाचा वाटा होता. व्यक्तीची किंवा प्राण्याची कॅन्सर होण्याची प्रवृत्ती, त्याच्या शरीरात स्रवणारे हार्मोन्स आणि ट्यूमर व्हायरस यांचा परस्पर संबंध शोधून तो पटवून देणाऱ्या त्या पहिल्या संशोधक ठरल्या. भारतात पहिल्यांदाच कर्करोग संशोधनाची सुरुवात करणाऱ्या शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली. त्यांनी केलेला अभ्यास रक्ताचा कर्करोग, घशाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग यासाठी उपयुक्त ठरला. यासोबतच त्यांनी महारोगाच्या जंतूवरही काम केले, त्यामुळे महारोगावरील लस तयार करण्यास त्याचा फायदा झाला. संशोधनाचे काम करत असतानाच त्यांनी स्त्री शास्त्रत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी Indian Women Scientist association (इव्सा) ही संस्था स्थापन केली. डॉ. कमल यांना त्यांच्या संशोधन क्षेत्रातील कार्याबद्दल १९८२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.