Join us  

आजीबाई जोरात! वयाच्या ७८व्या वर्षी आजीने नातीसोबत सुरू केला विणकामाचा बिझनेस, आजीच्या कामाचे तरुण 'इंस्टा' दिवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2022 5:19 PM

हा व्यवसाय त्यांच्या छंदातूनच निर्माण झाल्यामुळे या वयातही आजी अतिशय उत्साहाने आपल्या आवडीचे काम करतात

ठळक मुद्देसुरुवातीला त्यांना ८ ते १० ऑर्डर महिन्याला येत होत्या मात्र आता त्यांना महिन्याला साधारण २० ऑर्डर असल्यानचे युक्ती सांगते. कोणतीही गोष्ट तयार करायला किती दिवस लागतात त्यावरुन त्याची किंमत ठरत असल्याचे शीला सांगतात.

तरुण वयात आपल्याला अनेकदा काहीच न करता आराम करावा असं वाटत असताना ७८ वर्षांच्या आजींची जिद्द तरुणांनाही लाजवेल अशी आहे. वयाची पन्नाशी जवळ आली की आपल्यातील अनेक जण शरीराने आणि मनाने खचतात. नवीन काही करण्याची उर्मी अनेकदा वयानुसार कमी होते म्हणतात. पण दिल्लीमध्ये राहणाऱ्या शीला बजाज या मात्र या सगळ्याला अपवाद आहेत. अवघ्या २७ वर्षांची नात युक्ती बजाज हिच्या मदतीने शीला यांनी अजिबात न डगमगता या वयातही नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे. हा व्यवसाय त्यांच्या छंदातूनच निर्माण झाल्यामुळे या वयातही त्या अतिशय उत्साहाने आपल्या आवडीचे काम करत आहेत. युक्ती ही आताच्या काळातील असल्याने आपल्या आजीच्या व्यवसायाचे प्रमोशन ती इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर करुन करत असून त्यावर तिला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ती सांगते. 

(Image : Google)

पूर्वीच्या काळी महिला आपल्या मुलांसाठी नातवंडांसाठी सुयांनी हातानेच घरात लोकरीचे कपडे विणत असत. यासाठी बरेच दिवस लागत असले तरी आपल्या आईने किंवा आजीने विणलेल्या लोकरीच्या कपड्यांना असलेली उब बाजारात हजारो रुपयांना मिळणाऱ्या कपड्यांना नसल्याने त्यांच्या या लोकरीच्या कपड्यांना सोशल मीडियावरुन विशेष पसंती मिळत आहे. युक्ती ज्यावेळी एकटी होती तेव्हा तिच्या आजीने तिचा सांभाळ केला. मात्र आता आजी जेव्हा एकटी आहे तेव्हा तिला तिचे एकटेपण खायला उठले. अशावेळी ही समजदार नात आपल्या आजीसाठी धावून गेली आणि तिने आजीला लोकरीच्या कपड्यांचा बिझनेस सुरू करण्याविषयी सुचवले. युक्तीचे वडील खूप लहानपणी गेल्याने ती लहानपणापासून आपल्या आजीकडेच राहीली. त्यानंतर काही काळाने तिने आईलाही गमावले. मात्र आजी कायम तिच्या सोबत असल्याने तिचे आणि आजीचे खूप खास नाते असल्याचे ती सांगते. 

युक्ती सांगते, “इतर आजींप्रमाणेच आमच्या आजीनेही आमच्यासाठी लहानपणी स्वेटर विणलेले. घरातही ती कोणासाठी काही ना काही लोकरीचे, क्रोशाचे विणायची. यामध्ये तिचा वेग आणि कल्पकता इतकी छान होती की तिचा वेळ घालवण्यासाठी ती करत असलेल्या गोष्टीचे व्यवसायात रुपांतर करावे असे मला वाटले. मग मी तिच्यासाठी एक इन्स्टाग्राम पेज ओपन केले आणि त्यावरुन ती करत असलेल्या वस्तू पोस्ट करायला सुरुवात केली. सुरुवातीला यावरुन काहीच विशेष प्रतिसाद मिळाला नाही.” सुरुवातीला शीला आजी त्यांना येत असलेले स्वेटर, स्कार्फ, क्रोशाचे शो पीस, कुशन कव्हर असे तयार करायच्या. मग नंतर त्यांनी इंटरनेटवर सर्च करुन आपल्याला येत नसलेल्या वस्तू शिकल्या. त्यामुळे आता त्या बॉटल कव्हर, हेअरबँड, वेगळ्या प्रकारचे स्वेटर, स्कार्फ अशा अनेक वस्तू करते. 

(Image : Google)

आधी आजी घरभर फिरत राहायची आणि घरात काही काम आहे का ते शोधत बसायची. मात्र आता तिला तिच्या आवडीचे काम मिळत असल्याने ती खूप खूश असते. आणि तिचा दिवसाचा वेळ आनंदात जात असल्याने आम्हालाही खूप छान वाटते. नवजात बाळ ते तीन वर्षापर्यंतच्या बाळांसाठी कपडे बनवायला साधारणपणे ३ दिवस लागतात तर त्यासाठी १६०० रुपये मोजावे लागतात. कोणतीही गोष्ट तयार करायला किती दिवस लागतात त्यावरुन त्याची किंमत ठरत असल्याचे शीला सांगतात. युक्ती आपल्या आजीसोबत दिवसातील जास्तीत जास्त वेळ घालवत असून आजीला नवनवीन डिझाइन्स दाखवणे, ऑर्डर घेणे, त्या वेळेत पोहोचवणे, ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे कच्चा माल खरेदी करणे अशा इतर कामांत मदत करते.  सुरुवातीला त्यांना ८ ते १० ऑर्डर महिन्याला येत होत्या मात्र आता त्यांना महिन्याला साधारण २० ऑर्डर असल्यानचे युक्ती सांगते.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसाय