तुमच्यामध्ये मूळातच जिद्द आणि एखादी गोष्ट करण्याची उर्मी असेल तर त्यासाठी कोणतंच बंधन आड येत नाही. मुंबईतील ७८ वर्षांच्या आजींनी हे सिद्ध करुन दाखवले आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या उर्मिला आशेर यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले. नुसता व्यवसाय सुरू करुन त्या थांबल्या नाहीत तर कष्टाची तयारी आणि या वयातही असलेली सकारात्मकता याच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय यशस्वी करुन दाखवला आहे. उर्मिला यांचे वयाच्या १८ व्या वर्षी लग्न झाले, त्यानंतर ३ मुलांची आई झालेल्या उर्मिला यांनी आपण भविष्यात व्यवसाय करु असा स्वप्नातही विचार केला नसेल. मात्र गुजराती असल्याने त्यांना सुरुवातीपासूनच वेगवेगळे पदार्थ करायची आवड होती. त्यामुळे त्यांनी खास गुजराती पदार्थांचा व्यवसाय सुरू केला (Gujju Ben na Nashta Urmila Asher Business 78 Years Old Business Women from Mumbai).
आता त्यांचा व्यवसाय इतका वाढला की मुंबई शहरात आणि मुंबई बाहेरही त्यांच्या पदार्थांना भरपूर मागणी आहे. उर्मिला यांना गुज्जू बेन म्हणजेच गुजराती बहिण या नावाने ओळखले जाते. त्यांच्याकडे तयार होणारे ढोकळा, नमकीन पदार्थ, गुजराती लोणची, कुकीज यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. उर्मिला यांच्या आयुष्यातही बरेच चढ-उतार आले. मात्र त्यांनी न थकता आणि हार न मानता आयुष्याला सामोरे जायचे ठरवले. अवघी अडीच वर्षाची असताना एका अपघातात त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर ब्रेन ट्यूमर झाल्याने त्यांचा मोठा मुलगा दगावला. ही दु:ख पचवतात न पचवतात तोच त्यांच्या तिसऱ्या मुलाचाही मृत्यू झाल्या. मात्र उर्मिला यांनी हे सगळे घाव सोसले. या सगळ्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती हालाखीची असताना उर्मिला यांना बिझनेस करण्याची कल्पना सुचली. स्वयंपाक करायला आवडत असल्याने आपण गुजराती पद्धतीचे स्नॅक्सचे पदार्थ करायचे असे त्यांनी ठरवले. सगळ्यात आधी त्यांनी लोणची बनवली. मात्र कोरोना महामारीमुळे त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचा नातू हर्ष याने त्यांना या उत्पादनांचे मार्केटींग करण्यात मदत केली आणि त्यांच्या लोणच्यांना काही दिवसांतच प्रचंड मागणी यायला लागली.
लोणचं प्रसिद्ध झाल्यावर काही दिवसातच त्यांनी गुज्जू बेन ना नाश्ता नावाचे दुकान सुरू केले. आज त्यांनी बनवलेले खाकरे, चिप्स, कुकीज, लोणची यांना मुंबईत आणि मुंबईच्या बाहेरही प्रचंड मागणी आहे. ही मागणी इतकी वाढली की काही दिवसांतच त्यांनी एक किचन भाडेतत्त्वावर घेतले आणि काही लोकांना कामाला ठेवून मागणीनुसार पदार्थ बनवायला सुरुवात केली. ‘शी द पिपल’ने दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांना TEDx मध्ये त्यांचा प्रवास शेअर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यांच्या हाताची चव आवडल्याने अवघ्या एका वर्षात त्यांनी थोडाथोडका नाही तर तब्बल ४५ लाखांचे उत्पन्न मिळवले. त्यामुळे वय हे केवळ नावाला असते. तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही ठरवलेली गोष्ट पूर्ण करुन त्यात यश मिळवून शकता हेच या आजींनी दाखवून दिले.