वय हा केवळ आकडा असतो. जिथे इच्छाशक्ती असते तिथे वय आडवं येत नाही हे चंदीगडच्या हरभजन कौर (Harbhajan Kaur) यांनी सिध्द करुन दाखवलं आहे. वयाच्या नव्वदीत त्यांनी त्यांच राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं आणि आज त्या 96 वर्षांच्या असून हरभजन कौर यांची ओळख देशभरात पोहोचली आहे. बेसन बर्फी (Harbhajan Kaur's besan barfi startup) बनवणाऱ्या आजी म्हणून हरभजन कौर (startup at the age of 90) ओळखल्या जातात. 6 वर्षांपूर्वी त्यांनी बेसन बर्फी बनवण्याचा व्यवसाय सुरु केला, आज चंदीगडमध्ये त्यांचा हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरु आहे.
Image: Google
हरभजन कौर या मुळच्या अमृतसर येथील तरण तारण या गावातल्या. लग्न होवून त्या लुधियानाला आल्या. त्या नव्वद वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचं निधन झालं. हरभज कौर यांना तीन मुली. त्या आपल्या लहान मुलीसोबत राहातात. एकदा त्यांच्या मुलीनं त्यांना त्यांची राहून गेलेली इच्छा विचारली. असं काय आहे जे या वयातही करावंसं वाटतं असं मुलीनं विचारल्यावर क्षणाचीही उसंत न घेता हरभजन यांनी आपल्या पैसे कमवायची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. वय बघता बाहेर जाऊन नोकरी करुन पैसे कमावणं अशक्य होतं. थोडा विचार केल्यावर त्यांना पैसे कमावण्याचा माग सूचला. हरभजन कौर यांना बेसन बर्फी उत्तम यायची. त्यांनी तीच करुन विकायचं ठरवलं. सुरुवातीला त्यांनी 5 किलो बेसनाची बर्फी केली. त्यांनी 18 ऑरगॅनिक मंडी येथे ती विकावयास ठेवली. लोकांनी बर्फीची चव घेतली आणि पहिल्या दिवशी काही तासांतच त्यांची बेसन बर्फी हातोहात खपली. त्या दिवशी त्यांनी पैसे कमावण्याची आपली इच्छा पूर्ण केली. ही पहिली कमाई त्यांनी आपल्या तिन्ही मुलींमध्ये समान वाटली.
Image: Google
हरभजन कौर यांच्या बेसन बर्फीला मोठी मागणी यायला लागली. वयाची तमा न बाळगता हरभजन मोठ्या उत्साहानं बर्फी बनवायच्या आणि लोकांच्या ऑर्डरी पूर्ण करायच्या. दोन वर्षांपूर्वी हरभज कौर यांच्या जिद्दीचं कौतुक वाटून उद्योजक आनंद महिंद्रा यांनी हरभजन कौर यांचा बर्फी बनवतानाचा व्हिडीओ ट्विटरवरुन पोस्ट केला आणि चंदीगडच्या आजींची ओळख भारतभर पसरली. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटमुळे आजींचा बर्फी बनवण्याचा उद्योग आणखीनच विस्तारला.
When you hear the word ‘start-up’ it brings to mind images of millennials in Silicon Valley or Bengaluru trying to build billion dollar ‘unicorns.’ From now on let’s also include a 94 yr old woman who doesn’t think it’s too late to do a start-up. She’s my entrepreneur of the year https://t.co/N75BxK18z4
— anand mahindra (@anandmahindra) January 7, 2020
96 वर्षीय हरभजन कौर या बेसन बर्फी सोबतच बदामाचं सरबत, टमाट्याची चटणी, लिंबाचं, कैरीचं लोणचं, मूगडाळीचा हलवा, पिन्नी पंजीरी आणि आइस्क्रिमही बनवतात. व्यवसाय चांगलाच वाढल्यानं हरभजन कौर यांनी आता पदार्थ बनवण्यासाठी महिला ठेवल्या आहेत. पण प्रत्येक पदार्थाच्या चवीवर आजींचं बारकाईनं लक्ष असतं. हरभज कौर यांच्या बेसन बर्फीच्या उद्योगाची गोष्ट वाचून प्रत्येकाच्या मनात येतं ते हेच की जिद्द असावी ती हरभजन कौर यांच्यासारखी!