Join us  

बेटा हिंमत रखना! कोरोनात आईवडील दोघे गेले, लेकीने 99% मार्क मिळवत राखला त्यांचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 1:35 PM

१० वीच्या परीक्षेत ९९.८ टक्के मिळवत शहरात पहिली येणाऱ्या विनिशाच्या जिद्दीची गोष्ट

ठळक मुद्देआई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगणारी मुलगी भावासमोरही ठेवतेय आदर्श आई वडील गेल्याचे दु:ख पचवत केवळ पास नाही तर ९९ टक्के गुण मिळवत शहरात पहिले येण्याचा मान

कोरोनामुळे आपल्या जवळच्यांना गमावल्यामुळे अनेक कुटुंबे आणि व्यक्ती उध्वस्त झाल्याचे गेल्या २ वर्षात आपण सगळ्यांनीच पाहीले. पण या परिस्थितीतही वनिशा पाठक नावाच्या मुलीने सर्वच आईवडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करुन आदर्श निर्माण केला आहे. विनिशा १० वी मध्ये असतानाच तिच्या आई वडिलांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र डोंगराएव्हढे दु:ख पचवत या मुलीने ठरल्याप्रमाणे अभ्यास करत १० वीची परीक्षा नुसती पास केली नाही. तर परीक्षेत ९९.८ टक्के मिळवले. तिचे हे यश पाहायला आता जगात आई-वडील नसतील तरी ती हिंमत हारली नाही, तर तिने स्वत:ला सिद्ध करुन दाखवले. भोपाळमध्ये राहणारी वनिशा सर्वाधिक गुण मिळवत शहरात पहिली आली आहे. 

सीबीएसईची परीक्षा देणाऱ्या वनिशाला इंग्रजी, संस्कृत, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयात १०० पैकी ९७ मार्क मिळाले आहेत. तिच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आई-वडील सोबत नसतील तरी तिने त्यांना दिलेलं वचन पूर्ण करत इतके उत्तम मार्क मिळवून दाखवले. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी आई-वडील गेल्यानंतर वनिशाने हे दु:ख पचवत खचून न जाता अभ्यास केला. आई-वडिलांच्या आठवणीने मला अभ्यासाची प्रेरणा मिळाली असे सांगणारी वनिशा तिच्या लहानग्या भावाचाही सांभाळ करत होती. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या दु:खानंतर मला माझ्या भावासाठी प्रेरणा बनायचे आहे, मी ताईसारखा होईन असे उदाहरण त्याच्यासमोर ठेवायचे असल्याचे वनिशा सांगते. 

वनिशाचे वडील जितेंद्र कुमार पाठक हे अर्थसल्लागार होते तर आई डॉ. सीमा पाठक सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. रुग्णालयात नेताना वनिशाने तिच्या आईवडिलांना शेवटचे पाहिल्याचे ती सांगते. ४ मे रोजी तिच्या आईचे निधन झाले तर १५ मे रोजी वडिलांचे. मला दीदीपेक्षाही जास्त मार्क मिळवायचे आहेत असे तिचा लहान भाऊ म्हणतो. त्याला क्रिकेट खेळायलाही खूप आवडत असल्याचे तो सांगतो. वनिशा आणि तिचा भाऊ आता तिचे मामा डॉ. अशोक कुमार यांच्यासोबत राहतात. ते भोपाळच्या एमव्ही महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. वनिशा फायटर असून आई-वडीलांच्या निधनानंतरही तिने डगमगून न जाता हे यश मिळविले असे ते सांगतात. वनिशाने आपल्या आईवडिलांवर एक कविता केली असून मी तुमच्या गौरवाचे कारण बनेन अशा आशयाची ही कविता आहे. माझ्या वडिलांना मला आयआयटीमध्ये किंवा यूपीएससी परीक्षा देऊन उच्च पदस्थ अधिकारी व्हावे असे वाटत होते. त्यांचे स्वप्न आता माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणार असे वनिशा म्हणते.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसीबीएसई परीक्षाकोरोना वायरस बातम्यामहिलासोशल व्हायरल