भारतीय वंशाची असलेली श्री सैनी हिने मिस वर्ल्ड अमेरिका २०२१ होण्याचा बहुमान पटकावला आहे. वॉशिंग्टन येथे झालेल्या एका कार्यक्रमात तिच्या डोक्यावर मिस वर्ल्ड अमेरिकेचा मुकुट घालण्यात आला. अभिनेत्री डायना हेडन हिने हा मुकुट श्री सैनीला घातला. तिने आपल्या कतृत्वावर हा किताब मिळवला असला तरी तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. याचे कारण म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षापासून सैनी हिच्या हृदयात पेसमेकर बसवला आहे. तसेच ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर झालेल्या एका कार अपघातात तिचा चेहरा मोठ्या प्रमाणात भाजला होता. परंतु सैनी या गोष्टीचा कधीही उल्लेख करत नसल्याचे एएनआयने म्हटले आहे. भारतीय वंशाची आणि आशिया खंडातील मी एकमेव अमेरिकन आहे जिला हा किताब मिळाला आहे असे सैनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagramतसेच हा किताब मिळाल्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, हा किताब मिळाल्यामुळे मी आनंदी आहे पण काहीप्रमाणात नर्व्हसही आहे. मी शब्दात माझ्या भावना व्यक्त करु शकत नाही. या किताबाचे सर्व श्रेय माझ्या पालकांना जाते, त्यातही माझ्या आईने मला कायम दिलेल्या पाठिंब्यामुळे मी आज इथवर पोहोचू शकले. तिने मिस वर्ल्ड अमेरिका यांचे आभारही मानले. तिच्याकडे "MWA नॅशनल ब्युटी विथ अ पर्पज अॅम्बेसेडर" हे प्रतिष्ठित पद आहे, जे तिने गरजूंना मदत करण्यासाठी अथक परिश्रमाने कमावले आहे. तसेच युनिसेफ, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स, सुसान जी कोमेन आणि इतर अनेक संस्थांनी सैनीला तिच्या कामासाठी गौरवले आहे.
२५ वर्षांची असलेली सैनी मूळची पंजाबमधील लुधियानाची आहे. १२ वर्षांची असताना तिला हृदयाचा एक दुर्मिळ आजार असल्याचे लक्षात आले. सामान्य व्यक्तीचे हृदय एका मिनिटाला ७० वेळा धडधड करते. तर सैनीचे हृदय एकावेळी २० वेळाच धडधड करायचे. त्यावेळी डॉक्टरांनी तिला सोपन हार्ट सर्जरीचा पर्याय सुचवला आणि तिच्या हृदयात पेसमेकर बसविण्यात आला. ती इतरांसारखे सामान्य आयुष्य जगू शकणार नाही, तसेच तिला असलेली नृत्याची आवड तिला जोपासता येणार नाही कारण या शस्त्रक्रियेमुळे तिला यापुढे सराव करता येणार नाही असे सांगण्यात आले. मात्र तिने आपली आवड कायम ठेवली आणि नव्या जोमाने नृत्याचा सराव सुरू ठेवला. ती साधारण १५ वर्षांची असताना तिची आई आजारी पडली आणि त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवावे लागले. त्यावेळी ती मानसिक आणि शारीरिकरित्या पूर्णपणे ढासळून गेली होती. त्यावेळी श्री सैनीने अशाप्रकारच्या प्रसंगांना तोंड देणाऱ्यांसाठी एक सामाजिक संस्था सुरु करण्याचे ठरवले. याचदरम्यान तिचा चेहरा कार अपघातात भाजल्याने त्यावरही उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिला या सगळ्यातून बाहेर यायला एक वर्ष लागेल असे सांगितले असताना जिद्दीच्या जोरावर ती केवळ एक महिन्यात रिकव्हर झाली. त्यामुळे तिच्यातील जिद्दीची कमाल आहे इतकेच म्हणणे पुरेसे ठरेल.