Join us  

१२ दिवसात १००० किलोमीटर धावण्याचा ५२ वर्षांचा महिलेचा विक्रम, उष्णतेने बूट फाटले पण ती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 8:00 AM

आपल्या क्षमतांचा शोध घेण्याचा ध्यास घेत स्वत:ला चौकटीबाहेर नेण्याचा प्रयत्न.

ठळक मुद्देती चौकट तिने मोडली आणि १२ दिवसात १००० कि.मी अंतर पूर्ण करून तिने विश्वविक्रम केला.

माधुरी पेठकर

स्वत:ला आव्हान देणे, स्वत:कडून अशक्यप्राय वाटणारी गोष्ट घडवून घेणे ही गोष्ट सोपी नाही. नताली दाऊ या ५२ वर्षीय महिलेने मात्र ती करून दाखवली. वयाच्या ३० व्या वर्षी व्यायाम म्हणून पळायला सुरुवात करणारी नताली आज अल्ट्रारनर म्हणून ओळखली जाते. अल्ट्रारनर म्हणून नतालीने थायलंड ते सिंगापूर हे १००० कि.मी अंतर १२ दिवसात पूर्ण केलं.

तिचा हा निर्णय केवळ साहसी होता. आपल्या या ध्येयाची तयारी करण्यासाठी नतालीकडे आठ महिने होते. पण प्रत्यक्षात जेव्हा धावण्यास सुरुवात केली तेव्हा ३५ अंश सेल्सिअस तापमानात पळताना पहिल्या दिवसापासून नतालीला उष्णतेचा त्रास सुरू झाला. तीन दिवसांनी तिला योनी मार्गात संसर्गाचा त्रास सुरू झाला. आपण हे ध्येय गाठू शकू ना, अशी तिला शंका यायला लागली. पण नव्या दिवसाची नवी सुरुवात ती आपण रन पूर्ण करणार याच निर्धाराने करायची. त्यासाठी तिने आपल्या वेळापत्रकात बदल केले. सकाळी पळताना उष्णतेच्या त्रासापासून वाचण्यासाठी तिने रात्रीच पळायला सुरुवात केली. रात्री ८ च्या आत जेवण. आणि नंतर साडेअकरा वाजता ती पळायला सुरुवात करू लागली. एका दिवशी दोन मॅरेथाॅन पळण्याएवढं म्हणजे ८२ ते ८४ कि.मी अंतर नताली पळत होती. दिवसभरात फक्त तीन ते साडेतीन तासच तिची झोप होत होती. शेवटच्या टप्प्यात तिच्या पायाची बोटं फाटली. त्यांना बँडेज करून नताली पळत राहायची. हा सर्व अट्टाहास नतालीने केवळ विक्रमासाठी नव्हे तर स्वत:भोवती तिने आखून घेतलेल्या चौकटीला तोडण्यासाठी केला होता. ती चौकट तिने मोडली आणि १२ दिवसात १००० कि.मी अंतर पूर्ण करून तिने विश्वविक्रम केला.

नताली म्हणते, ‘ एक ध्येय ठेवून पळत असताना मला जाणवलं की, हे जग खूप सुंदर आहे. ते अनुभवताना स्वत:च्या क्षमतांचाही नव्याने शोध लागतो. हा शोधच आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करण्याची ताकद देतो.’ १००० कि.मी अल्ट्रारनच्या आपल्या प्रकल्पातून नतालीने ३७,००० अमेरिकन डाॅलर्स निधी जमवला. हा निधी तिने खेळण्यासाठी महिला आणि मुलींना प्रोत्साहन देणाऱ्या प्रकल्पाला देणगी म्हणून दिला. 

टॅग्स :सायकलिंगमहिला